Tuesday, April 18, 2023

ई बहर - जून २०२२ ते मे २०२३


मस्कार मंडळी

" लिहिते व्हा " असं आवाहन करत कार्यकारी समिती २०२२-२०२३ ने जून २०२२ ला पहिला ई बहर प्रकाशित केला. 
'शुभारंभ' असा विषय  देऊन सुरुवात करत वेगवेगळ्या सात सदारांमध्ये जसे,

१. दर महिन्याला एक नवा विषय 
२. मुलुख मराठी - महाराष्ट्र आणि  मायबोली मराठी विषयी माहिती देणारा 
३. ललित -अनुभव ,लेख ,कादंबरी,वर्णन ह्यासारख्या विषयांनी परिपूर्ण 
४. पुस्तक परीक्षण - विविध संदर्भातील पुस्तकांची माहिती आणि त्याच्या विषयीचे परीक्षण 
५. स्वाद घराघरातला  - प्रत्येकाच्या घरात विविध पद्धतीने केले जाणारे पदार्थ 
६. कॅमेरा कैद - मोबाईल अथवा कॅमेरात कैद केलेले क्षण
७. छोटयांसाठी खास - लहान मुलांच्या कला,वाचन ह्या संदर्भातील विशेष सदर.
    आणि नुकताच सुरु केलेला आठवा सदर 
८. चलचित्र, 

ह्या सर्व सदारांमध्ये सदस्यांनी अतिशय वाचनीय असे आम्हाला पाठवलेले स्वलिखित साहित्य, साजेश्या संग्रहित इमेजेस, खुलणारे रंग वापरून ह्या वर्षीचा बहर खरोखरच बहरला. 

स्वागत- नवीन सदस्यांचे , कौतुक/शुभेच्छा - शैक्षणिक यश मिळालेल्या लहान मित्रमैत्रिणींचे ,आढावा- समितीने आयोजित केलेल्या प्रत्येक महिन्यातल्या कार्यक्रमाचा आढावा आणि त्याचे टिपलेले क्षण.ही सदरे सुद्धा मंडळातील सदस्यांसाठी आपुलकीची ठरली.

तसेच दिवाळी बहर छापील अंकासाठी लिहिणाऱ्यांचा प्रतिसाद आणि वाचकांचाही वेळोवेळी चांगला अभिप्राय मिळाला. 

ह्या सर्व (जून २०२२ ते मे २०२३ पर्यंतच्या) ई मासिकांचा संग्रह असावा आणि तो कधीही कधीही वाचता यावा,
म्हणूनच आम्ही सगळी मासिके एकत्रित देत आहोत. 

जून २२

जुलै २२ 

ऑगस्ट -  सप्टेंबर २२ 

ऑक्टोबर २२- छापील बहर-दिवाळी अंक 

नोव्हेंबर २२

डिसेम्बर २२ 

जानेवारी २३

फेब्रुवारी २३

 मार्च २३

एप्रिल - मे २३ 


धन्यवाद 
सौ मंजुषा किरण जोशी, सौ उन्नती विकास नाईक
बहर संपादक २०२२ -२०२३

Sunday, October 3, 2021

चित्रकला----स्वानंद नाईक

 


चित्रकला…..:-पियुष धनजंय शितोळे

 


तिचा श्रावण---सौ .नम्रता नितीन देव

 


तिचा श्रावण

 

बारा मासात श्रावण 

तिच्या मनाच्या जवळ 

ऊन -पावसाचा त्याचा खेळ 

तिच्या सुख-दुःखाशी घाली मेळ 

 

बालपणीचा श्रावण 

कागदी होडीतून येतो 

इंद्रधनूच्या रंगात 

तिचे तारुण्य रंगवतो 

 

पंचमीच्या झुल्यावर 

तिला झोका झुलवितो 

भोवती नागांची वारुळे 

त्याची जाणीवही देतो 

 

मग साजण होऊन 

श्रावण बरसतो 

तिच्या लाजऱ्या मनात 

प्रेमांकुर फुलवतो 

 

सासरच्या वळणावर 

डोळ्यांमधून सांडतो 

सणासुदीला प्रेमाने 

तिला माहेरी धाडतो 

 

जसा श्रावण धरणीला 

हिरव्या रुजव्याने सजवितो 

तिचा गर्भ तिच्या सृजनाचे 

तेज अंगभर देतो 

 

असा हा श्रावण 

तिला सतत भेटतो 

आयुष्याच्या वैशाखात 

हिरवळ फुलवतो 

 

सौ .नम्रता नितीन देव  

 

श्रावण सर---डॉ. पल्लवी बारटके

 

श्रावण सर

पल्लवी बारटकेडॉ. 

निळ्या निळ्या आस्मानीतून

डोकावति मेघ गहिरे जरासे

चाहूल पावसाची लागे

मन मनीच उल्हासे

चिंब चिंब न्हाली धरणी

आली श्रावणाची सर

गंधली भूमी, शिंपले अत्तर अत्तर

दवबिंदुंचा रत्नहार लेऊनी, पानपालवी मिरवे

रविकिरणांच्या साथीने, इंद्रधनू ही हासे

निसर्गाची ही अद्भुत किमयागारी

पुन्हा पुन्हा मोहरे तनू सारी

हळूच येऊन वारा मज गेला स्पर्शूनि

आठवांच्या कवेत तुझ्या गेला सुखावूनि.

 

बालपणीच्या आठवणींतला श्रावण---- डॉ. प्रसाद बारटके

 

बालपणीच्या आठवणींतला श्रावण

 डॉ.  प्रसाद बारटके

 

“श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”

श्रावण म्हटलं कि बालकवींची ही कविता ओठांवर येतेच येते आणि मनात दाटून येतात बालपणीच्या असंख्य रम्य आठवणी. ही कविता म्हणजे नुसतेच शब्द किंवा भावना नसून श्रावण महिन्यात असणाऱ्या कुंद आणि आल्हाददायक वातावरणाचे यथार्थ वर्णन आहे. कधी कधी लख्ख उन अन् मधूनच बरसलेल्या जोरदार सरी असा ऊन-पावसाचा लपंडाव म्हणजे श्रावण तर कधी अचानक aहोणारा ऊन पावसाचा संगम म्हणजेच निसर्गाचा इंद्रधनुरुपी चमत्कार दाखवणारा श्रावण. नववधू प्रमाणे हिरवा शालू नेसून रंगीबेरंगी फुलांचा गजरा माळलेली धरा म्हणजे श्रावण. असं हे अत्यंत मोहरून टाकणारं, मनाला नवी ऊर्जा देणारं वातावरण म्हणजे श्रावण. मंडळी आपण यु... मध्ये अत्यंत शुष्क अशा वातावरणात राहत असलो तरी श्रावण महिन्याचे हे वर्णन वाचताना गेलात ना तुम्हीसुद्धा तुमच्या आठवणीत आणि तेही तुमच्या बालपणात.

मला अजूनही आठवतं की शाळेत असताना श्रावण महिन्याची आम्ही वर्षभर वाट बघायचो. त्याचं एक कारण म्हणजे दर श्रावणी सोमवारी, आमची शाळा अर्धा दिवस असायची. शाळेच्या बाहेर लागणारा अर्धा दिवस सुट्टीचा फलक आजसुद्धा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यानंतर होणारा आनंद हा शाळा लवकर सुटून खूप सारी मज्जा करता येईल ह्या विचारांनी असायचा आणि त्याच विचारांमध्येच शाळेचा अर्धा दिवस कसा भुर्रकन संपायचा हे समजायचे नाही.

 हा आनंद द्विगुणित व्हायचा तो श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमी, मंगळागौर, बैलपोळा, रक्षाबंधन,  नारळीपौर्णिमा, दहीहंडी अशा विविध सणांनी. श्रावणी सोमवारी, शुक्रवारी घरातल्यांचे उपवास, साबुदाणा खिचडी, रताळ्याची खीर व अन्य  गोड गोड खाणी ह्या सर्वांमुळे मला श्रावण महिना हा जणू काही सणांचा राजाच आहे आणि तो कधीच संपू नये असे वाटायचे.

श्रावणात  विविध सण उत्सवांच्या निमित्ताने बेल, आघाडा, दुर्वा,  केतकी,  मोगरा,  जास्वंद, रुई हिरडा,बेहडा अशा आरोग्यदायी वनस्पतींची ओळख झाली व निसर्गाबद्दल आपसूकच आत्मीयता निर्माण झाली. .

आम्ही लहानपणी दादरला राहायचो आणि दहीहंडीच्या दिवशी सकाळी पोटपूजा करून आमची स्वारी निघायची दादर रेल्वेस्टेशनकडे असलेल्या  ideal बुक डेपो किंवा छबिलदास शाळेच्याजवळ. तिथे जाऊन एखादा छानसा कोपरा पकडून एखाद्या इमारतीच्या खाली दहीहंडी बघायला उभे राहायचे.  ह्या ठिकाणची अशी खासियत असायची कि एकाच वेळेला एकाच रांगेत सलग तीन ते चार हंडया लागलेल्या असायच्या आणि एकाच ठिकाणावरून अनेक दहिहंड्याचे  थरार एकाचवेळी अनुभवता यायचे. मला अजूनसुद्धा ती सहा-सात थर लावत असतानाची कसरत आणि दहहंडी यशस्वीरित्या फोडल्यानंतर  नाशिक बाजावरती सर्व गोपाळांनी केलेला बेधुंद नाच डोळ्यासमोर येतो.

श्रावणातला एक भावनिक सणजो बहीण-भावाचे प्रेमळ नाते अधोरेखित करतो तो म्हणजे राखीपौर्णिमा. आमच्या बहिणाबाईनी आम्हाला राखी बांधल्यावर आम्ही सुद्धा एक छोटीशी कॅडबरी किंवा वडिलांनी दिलेले पैसे ओवाळणी म्हणून देते असू. त्या दिवशी भाऊ म्हणून रुबाब जास्त असतो. खरी गंमत तर शाळेत यायची. आमचे हात आमच्या मैत्रिणी वजा बहीणींकडून राख्यांनी भरून जायचे. कोणाचा हात किती राख्यांनी भरलेला आहे ह्यावरून त्याची शाळेतील लोकप्रियता दिसून येते असा आमचा समाज असायचा. पण त्यातच कोणी कोणाला मुद्दाम राखी बांधली आणि काटा काढला अशा खमंग चर्चा मग आम्हा मुलांच्यात बरेच दिवस चालायच्या.

श्रावणाच्या अशा भारावलेल्या दिवसात बाजारपेठादुकाने, गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी सजू लागायच्या. आम्हीसुद्धा गणपतीच्या सुट्टीत, रोह्याला म्हणजेच आमच्या गावी कधी एकदा जातोय याची आतुरतेने वाट पाहायचो आणि त्यातच श्रावण महिना कधी संपला हे समजायचेच नाही.

 

Saturday, October 2, 2021

MMAD_गणेशोत्सव २०२१

 


गणपती आरास - मखर २०२१----श्री. महेंद्र गाडगे

 



गणपती आरास - मखर २०२१----सौ. क्षमा कस्तुरे

 










गणेशोत्सव २०२१---सौ .नम्रता नितीन देव

 

गणेशोत्सव २०२१

 

विघ्नहारी विघ्नहर्त्या 

विघ्न हराया या 

संकट साऱ्या जगतावरती 

ते निर्दाया या ll  

रोगराईचे संकट साऱ्या 

जगतावरती आले 

राजा असो वा रंक त्याने 

ना कोणा सोडले 

उपाय सारे हरले आता 

तुम्ही सोडवा या ll 

कसे करावे स्वागत तुमचे 

बंधन अवती भवती 

मुखावरही बंधन असता 

कशी करू आरती 

या साऱ्या बंधनांतुनी 

मुक्ती द्याया या ll 

आशा एकच येता तुम्ही 

संकटे सारी हरतील 

उत्साहाने आनंदाने 

पुन्हा सारे जगतील 

आशावादी तव भक्तांना 

आशिष देण्या या ll 

बुद्धीदात्या तुम्हामुळे  

लसीचे कवच आम्हा लाभले 

आगमन झाले तुमचे 

आणि प्रत्यक्ष दर्शनही घडले 

निरोप घ्यावा पुढल्या वर्षी 

वाजत गाजत या ll 

 

सौ .नम्रता नितीन देव