IIश्रीII
नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम वर्ष २०१७-१८ च्या "बहर"ची जबाबदारी आमच्यावर सोपविल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारी समिती (२०१७-१८) चे मनःपुर्वक आभार आणि आपणा सर्व वाचक सभासदांना विनम्र अभिवादन.
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी हा बहरलेला वटवृक्ष गेल्या अनेक वर्षांपासुन अबुधाबीमध्ये घट्ट पाळे-मुळे रोऊन उभा आहे. या वृक्षासाठी फ़ुल ना फुलाची पाकळी येवढं कार्य करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळतेय याचा खरंच आनंद होत आहे. बहरच्या माध्यमातून आपल्याशी हितगुज करण्याची गोड जबाबदारी आम्ही आपल्या अपेक्षांनुसार पार पाडू अशी आशा व्यक्त करतो.
आपण सर्व नवे-जुने अबुधाबीकर आपल्या रोजच्या रहाट गाडग्यात, इथल्या उष्ण-दमट वातावरणात मश्गुल असतो, तरीही नकळत अदृष्य असा एक हृदयात गच्च गाठ मारलेला दोर आपल्याला महाराष्ट्राच्या मातीकडे खेचत असतो. आणि म्हणुनच आपल्या मंडळाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतो. जुन्या आठवणींचा कॅलिडोस्कोप असो की नव्या किश्शांचा कोलाज असो, एकमेकांच्या भेटीतील गोडी तसूभरही कमी होत नाही. पुरणपोळीपासुन सूरु झालेल्या गप्पा ठसकेबाज तांबडा-पांढरा रस्सा ते उकडीचा मोदक...करंजी...कैरीचे पन्हंयापासुन पुणेरी पाट्या आणि बंबैया हिंदीपर्यंत कधी येउन पोहोचते ते ओघात कळतच नाही....
महाराष्ट्र मंडळ हे आपल्या सर्वांचे आहे व त्याची भरभराट होण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन नेटाने प्रयत्न करणे तेवढंच महत्वाचे आहे. आपल्या पुढच्या पिढीला अस्सल मराठी बाण्याचं बाळकडु आपणच पाजायला हवं. शेवटी या परक्या मुलुखात हे मंडळच आपल्या पाठीमागे उभे राहणार आहे. गरज भासेल तेव्हा सामुदायिक मराठी आवाज देण्याचे आणि आपणा सर्वांचे प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य या मंडळात आहे.
याच आपल्या लाडक्या मंडळाने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षात तुमच्या आमच्या मैत्रीचे हात एकमेकांसाठी वाऱ्याच्या वेगाने धावत येतील, बुर्ज खलिफ़ा सारखे गगनाला जाउन भिडतील, वाळुच्या रोज बदलणाऱ्या टेकड्यांप्रमाणे सुबक मोहक असतील अशी आशा करुया.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र मंडळ वर्षभर काहीतरी नवीन देण्याचा मानस घेऊन कार्यरत राहील.
याचाच एक भाग म्हणून नेहमीच्या ई-बहरच्या ऐवजी या वर्षी आम्ही आपल्या समोर बहर हे ब्लॉग च्या रूपात घेऊन येत आहोत. ई-बहर ऐवजी ब्लॉग का?
असा प्रश्न पडेलच कदाचित. आज सर्व जग प्रत्येकाच्या तळहातावर असते. एका बोटाच्या साहाय्याने आपण ते स्क्रोल करत असतो.
बहरही असाच आपल्याला केव्हाही विनासायास वाचनास उपलब्ध व्हावा म्हणूनच हा सारा खटाटोप. हा ब्लॉग आपल्याला mmadbahar.blogspot.ae या संकेतस्थळावर पाहता/वाचता येईल. आशा आहे की बहर चे हे नवं रुपडं आपल्या पसंतीस उतरेल.
आपले लेख, कविता, प्रवासवर्णनं, खादाडी, बालकलाकारांची चित्रे .... या सर्वांचा ओघ सतत चालू राहील
आणि आपल्या नवीन कल्पना, सूचना, शाबासकी यांच्यामार्फत आपला पाठिंबा राहील याची खात्री आहेच..
आपल्या सर्वांची ही नाती अशीच सतत "बहर"त राहोत हिच सदिच्छा...
सौ. रुपाली किर्तनी
श्री. अजय पडवळ
खुप छान सुरवात!
ReplyDeleteमजकुर मस्त लिहला आहे.
खुप शुबेच्छा!
Very good initiative, way to go..
ReplyDelete