Wednesday, July 12, 2017

पाऊस म्हणाला..

सांग बरे विचारात तुझ्या असतो ना मी पाऊस,
नाही नको म्हणतांना भिजायची तुला भारी हौस..

बरे झाले तेव्हा,(भारतात)तू पावसात भिजलास..
मायेच्या ओलाव्यात, नात्यांच्या गुंफणात,
पुन्हा पुन्हा अडकूनही, सुटण्यास माहीर तू ठरलास,
म्हणून तर आज फोनवरच पाऊस पाहून हळहळीतूनही हसलास..

बरे झाले तेव्हा पावसात तू भिजलास..
मातीच्या चिखलागाळात, गढूळपाण्याच्या डबक्यात,
चप्पलेच्या त्या रुतण्यात, कपड्याच्या त्या मळण्यात,
तरीही हिरवळीच्या त्या असण्यात, मला पुरेपूर अनुभवलास,
म्हणून तर आज पावसाच्या साध्या वि चारातही सुखावलास..

बरे झाले तेव्हा पावसात तू भिजलास..
सायकलची चैन तुटण्यात,मातीमध्ये चाक फसण्यात,
मदतीचा हात देण्याघेण्यात, नाही तू मागे हटलास,
म्हणून तर आज तू अनेक पावसाळयांतून शिकलास..

बरे झाले तेव्हा पावसात तू भिजलास..
आईने केलेल्या गरम भजीत, बाबांबरोबरच्या चहा आणि गप्पांत,
भावंडाबरोबरच्या मौजमस्तीत, आजही तू रमलास,
म्हणून तर स्वप्नांमागे धावूनही किंचितही नाही दमलास..

बरे झाले जेव्हा पावसाच्या आठवणीपेक्षा,
आठवणींच्या पावसात, करून कप्पा हळव्या मनात,
पुन्हा अगदी तसाच पण नव्याने चिंब भिजलास
म्हणू तर मी पाऊसच म्हणतोय तुला,
आज खऱ्या अर्थाने तू मोठ्ठा झालास.

                                 
सौ.उन्नती विकास नाईक

No comments:

Post a Comment