Saturday, August 12, 2017

पुस्तक परिक्षण : श्री. मंदार आपटे



युगांत
लेखक : विनोद गायकवाड
प्रकाशक : रिया प्रकाशन
पाने  : ३५२
प्रकाशन  : सन २०१३
भाषा  : मराठी
युगांत ही भीष्माचार्याची कथा आहे. कथेची सुरुवात गंगेला पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळण्यापासून होते आणि शेवट भीष्माचार्यांच्या मरणाने होतो.
ही पुस्तक प्रथमपुरुषात लिहिलेले असले तरी निवेदक बदलत रहातो. सुरुवात गंगेच्या कथनाने होते. त्यानंतर देवदत्त, सत्यवती, अंबा, भीष्म, विदुर आणि कृष्ण अशे पात्रे कथा पुढे नेतात. महाभारताची कथा सर्व वाचकांना माहीत असल्या कारणाने मी या परीक्षणात कथेचा गोषवारा सांगत नाही. जरी भीष्म व महाभारत एकमेकांपासून वेगळे काढता येत नसले आणि जरी भीष्माचे कथा असली तरी ही महाभारताची पुनरुक्ती नाही. कथा ८० टक्के झाल्यावर कौरव आणि पांडवांचा कथेत प्रवेश होतो.
या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय शुद्ध, अलंकारिक, थोडी क्लिष्ट आणि संस्कृतप्रचुर आहे. मराठीप्रेमींसाठी ही पर्वणीच आहे. त्यांच्यासाठी ही पुस्तक फक्त भाषेसाठीच वाचनीय आहे.
भीष्म ही या पुस्तकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. भीष्माच्या प्रत्येक कृतीचे या पुस्तकात पृथःकरण, विवेचन, स्पष्टीकरण आणि समर्थन केले आहे. देवव्रताची भीष्मप्रतिज्ञा. चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या मृत्यूनंतरही राज्यारोहणास नकार - अंबिका आणि अंबालिकेच्या पाणीग्रहणास नकार - द्रौपदीच्या वस्रहरणाच्या वेळेचे मौन - कौरवांच्या बाजूने युद्ध, या सर्वच गोष्टींचे पृथःकरण समर्थन केले आहे.
मला असे वाटले की इतके करूनसुद्धा भीष्म द्रौपदी वस्रहरणाच्या वेळेस गप्प का बसले याचे पटण्यासारखे स्पष्टीकरण देण्यात लेखक कमी पडला आहे. लेखकाने त्या मौनाचा पुरेसा उहापोह पण केलेला नाही आणि स्पष्टीकरणही समाधानकारक नाही. भीष्मांनी कौरवांची बाजू का घेतली याचे अजून विवेचन हवे होते. भीष्म आणि कृष्ण यांच्यामध्ये एक खास नाते होते. लेखकाने या नात्यावर थोडा आणखी प्रकाश टाकला असता तर जास्ती आवडले असते.
या पुस्तकामध्ये काही ठिकाणी आधुनिक मराठीतील शब्द आल्याने पुराणकालीन दुधात मिठाचा खडा पडून रसभंग होतो. कौरव पांडवांच्या जन्मापासून ते कुरुक्षेत्राच्या लढाई पर्यंतचा काळ फार कमी पानांमध्ये दाखवला आहे. यामुळे लेखकाला काही प्रसंग थोडक्यात आटपावे लागले आहेत तर काहींना फाटा द्यावा लागला आहे. जरी हे पुस्तक साडेतीनशे पानांचे असले 'तेरी अजून पन्नास पाने हवी होती असे वाटते.
विनोद गायकवाडांनी भीष्माचे व्यक्तिमत्व उत्तमरीत्या उभे केले आहे. भीष्मांची टाकत, शौर्य, ज्ञान, चातुर्य, निःपक्षपातीपणा, कौशल्य आणि दूरदृष्टी दिसून येते. पित्यासाठी केलेला कल्पनातीत त्याग आणि सिंहासन ग्रहण ना करण्याची व आजन्म अविवाहित रहाण्याची भीष्म प्रतिज्ञा अचंबित करतात. त्यांचा पर्वतप्राय निग्रह व जे वारसा हक्काने त्यांचे होते (हस्तिनापूरचे सिंहासन) त्याचा स्वखुशीने कायमसाठी व्यवस्थापक होणे या गोष्टींचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. तसेच जे काही त्यांनी सांभाळले आणि वाढवले त्या सर्वांचा आणि आपल्या कुळाचा नाश पाहायची वेळ आल्याने त्यांची कीव वाटल्याशिवाय रहात नाही.
वाचनीय. जरूर वाचा.


















मंदार आपटे

आयुष्यगीत : पिनल चाैधरी

आयुष्यगीत.....

सोनसकाळी भूपाळी गाता
जीवनाची मैफिल रंगवता
सुखाचे श्रोते मोजता
आयुष्यगीत गावे.....

असावा किनारा स्वतःच्याच मुल्यांचा
वावरणे तेथे मनास वाटेल तेव्हा
समुद्राच्या खोलात भविष्य-शिंपले उघडावे
आयुष्यगीत गावे....

त्याच किनाऱ्याने...मुठीत धरावे संकट-दुखांना
मग निवांत मनाने
भविष्य-शिम्प्लांतले मोती पांघरावे
आयुष्यगीत गावे....

नको कशाची बंधने, फक्त व्हावे मुक्त वावरणे
पांघरलेल्या मोत्यांची चमकच
उजळवेल गुढ-भविष्याचे..
त्याच भविष्याला मग आयुष्यगीत म्हणावे.

......पिनल चाैधरी

आपुलकी : सौ. निर्मला महाजन

- आपुलकी -

ह्या  परक्या देशात  मला  इथं 
परक परक का वाटत  नाही ?

नसेल हे डोक्यावरचं आकाश माझ्या  ओळखीचं
पण हा सूर्य तर माझा  मित्र  आहे !

नसेल  हे पाणी माझं रोजचं
पण पाण्याची  ओढ तर तीच आहे.

हा वाराही असेल मला  अपरिचित 
पण हा सुखद गारवा तर तोच  आहे .

आणि  नसेल  ही माझी  मातृभूमी
पण माझी  भूमाता तर हीच आहे .

              सौ. निर्मला महाजन,
                                   पुणे.
            +91 9890446708

Sketch By :कु. पावनी प्रसाद बारटक्के