माझे गाव
माझ्या गावाची वाट
जाई नदीच्या काठोकाठ
उसळती धुळीचे लोट
रस्ता जाई वळत वळत
रस्त्याच्या कडेला
पसरले गुलमोहर
सावली देई आल्या गेल्या
उन्हामध्ये थंडगार!
गावामध्ये एकेक घर
डोकावता मिळे आदर
मायेचा ओलावा
जाणवे अपरंपार!
माझ्या गावाचा पाणवठा
भरतसे हंडा लोटा
बारमाही भरलेला
कधी नसे त्याला तोटा!
माझ्या गावात चिंचेचा पार
बसती मंडळी वडील थोर
गावाच्या हकिकती सार
कानोकानी जाती दूरदूर!
माझ्या शाळेचे विद्यामंदिर
मुले जाती होण्या साक्षर
घडविती नवी पिढी
जीव लावून मास्तर!
गंगामाईच्या काठी
माझ्या गावाचे मुक्तिधाम
झाले गेले इथे ठेऊन
जन म्हणती रामराम!
आसा हा गांव माझा
लावितसे हुरहुर
जीव होई बेचैन
अंतरी उठते काहुर!
माझ्या गावाचा गणपत वाणी
घालतसे तुळशीची माळ
माप तोलता तोलता
गाई सावळ्याची गाणी!
गावाचे बारा बलुतेदार
आम्हा असे त्यांचा आधार
पाय शिवून त्यांचे
मानावे उपकार!
माझा हा गाव
नांदतो एकोप्याने
सुखदुःखाचा सोबती
घ्यावा विसावा विश्वासाने!
मनोज करंदीकर