Tuesday, September 10, 2019

कविता: जशी मला भावली - श्री. मंदार आपटे




ब्रह्मवैवर्त पुराणाप्रमाणे त्रेता युगात शूर्पणखा रामाला आपला करू शकली नाही. युद्ध संपले पण तिच्या मनातील राम गेला नाही. तिने तपश्चर्या केली आणि ती कुब्जा म्हणून द्वापार युगात जन्माला आली. 
भागवत पुराणा प्रमाणे कुब्जा एक कुबडी आणि वाकड्या तिकड्या शरीराची तरुणी होती. ती कंसाची दासी होती. मथुरेमध्ये सुवासिक तेल आणि उटणे बनवण्यात तिचा हात कोणीही धरू शकायचे नाही. जेंव्हा कृष्ण कंसाला मारायला मथुरेला आला, तेंव्हा त्याने कुब्जेकडे तिने बनवलेल्या सुगंधी तेलाची आणि उटण्याची मागणी केली. कंसासाठी केलेल्या वस्तू तिने कृष्णाला आनंदाने दिल्या. कृष्णाने तिला स्पर्श करताच तिचे रूपांतर एका निरोगी, सुदृढ सौंदर्यवतीमध्ये झाले. कंसाला मारल्या नंतर तिचे आणि कृष्णाचे मिलन झाले. तिचे वाट पाहणे संपले.

२४ ऑगस्टला कृष्णजन्माष्टमी होती. त्या निमित्त मी इंदिरा संतांची ही कविता निवडली. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो. 

कुब्जा - इंदिरा संत

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भनभन
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
विश्वच अवघे ओठ लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे....
हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव


पहाटेची वेळ आहे, अजून राधा आणि गोकुळ जागे झालेले नाही. पण नदी पलीकडून मंजुळ बासरीचे स्वर ऐकू येत आहेत. चंद्र मावळतोय, वारा सुटला आहे. ती आपले तनमन विसरून पाण्यात उभी आहे. तो वैश्विक मुरलीरव ती मनसोक्त प्राशन करत आहे. तिच्या डोळ्या वाटे आनंद अश्रू रूपाने ओघळतो आहे कारण तिला माहिती आहे की हा मुरलीरव तिच्या साठी आहे, फक्त तिच्या साठी.

किती सुंदर शब्द आणि किती प्रभावीपणे कवयत्री आपल्या समोर दृश्य उभे करते. असे वाटते की कविता वाचता वाचता कल्पनेच्या कुंचल्याने ती आपल्या समोर प्रत्यक्ष चित्र रंगवत आहे. शब्द योजना देखील किती सयुक्तिक आहे. भनभन  हा शब्द मात्र जरा विसंवादी वाटतो. आणि शेवटची ओळ तर किती प्रभावी आहे.

कुब्जा म्हणजे प्रतिक्षेची परिसीमा. आपल्या प्रियकराबरोबर मिलन होण्यासाठी तिने  दोन युगे (दहा लाख वर्षापेक्षा जास्ती काळ) वाट पहिली. बरं इतके थांबूनही कृष्ण तिला मिळेल की नाही याची खात्री नसताना देखील ती थांबली. तो पर्यंत त्याने तिच्यासाठी काहीही केलेले नव्हते. कवितेच्या शेवटच्या ओळीला म्हणूनच अनन्यसाधारण महत्व आहे.

या कवितेमध्ये कवयत्री थोडी साहित्यिक सवलत घेते. कुब्जा गोकुळात नाही तर मथुरेत होती. तिला राधा माहिती असण्याची शक्यता कमीच. कृष्णाने मुरली कधी गोकुळाबाहेर वाजवली नाही त्यामुळे कुब्जेने ती ऐकली असणे शक्य नाही. पण इतक्या सुंदर कवितेसाठी ही साहित्यिक सवलत माफ आहे.

No comments:

Post a Comment