Thursday, February 28, 2019

माझे गाव


माझे गाव

माझ्या गावाची वाट
जाई नदीच्या काठोकाठ
उसळती धुळीचे लोट
रस्ता जाई  वळत वळत
रस्त्याच्या कडेला
पसरले गुलमोहर
सावली देई आल्या गेल्या
उन्हामध्ये थंडगार!
गावामध्ये एकेक घर
डोकावता मिळे आदर
मायेचा ओलावा
जाणवे अपरंपार!
माझ्या गावाचा पाणवठा
भरतसे हंडा लोटा
बारमाही भरलेला
कधी नसे त्याला तोटा!
माझ्या गावात चिंचेचा पार
बसती मंडळी वडील थोर
गावाच्या हकिकती सार
कानोकानी जाती दूरदूर!
माझ्या शाळेचे विद्यामंदिर
मुले जाती होण्या साक्षर
घडविती नवी पिढी
जीव लावून मास्तर!
गंगामाईच्या काठी
माझ्या गावाचे मुक्तिधाम
झाले गेले इथे ठेऊन
जन म्हणती रामराम!
आसा हा गांव माझा
लावितसे हुरहुर
जीव होई बेचैन
अंतरी उठते काहुर!
माझ्या गावाचा गणपत वाणी
घालतसे तुळशीची माळ
माप तोलता तोलता
गाई सावळ्याची गाणी!
गावाचे बारा बलुतेदार
आम्हा असे त्यांचा आधार
पाय शिवून त्यांचे
मानावे उपकार!
माझा हा गाव
नांदतो एकोप्याने
सुखदुःखाचा सोबती
घ्यावा विसावा विश्वासाने!

मनोज करंदीकर


माझ्या गावात


कुणी आपल्या गावात गेलाय असं समजतं तेव्हा वाटतं त्याला सांगावं 

गावच्या माझ्या हवे हवेत 
मन माझं अडकलय
श्वासात भरून  घेऊन तिला
जाणीव माझी करून दे

माझ्या घराच्या कान्या कोपऱ्यात 
बसल्या आहेत माझ्या आठवणी
गेलास तिथे तर थोड्याश्या तुझ्या
खिश्यात भरून घेऊन ये

मम्मी पप्पांच्या मिठीत माझं
विश्व समावलेलं आहे
भेटलास त्यांना तर  माझ्यासाठी
त्या प्रेमाच्या सावलीत बसून ये

कामा साठी सोडला गाव
पण अस्तित्व तिथेच रमलं आहे
मी नक्की परत येईन
ह्याची जाणीव त्याला करून ये

खूप काही बदललं असेल
खूप काही बदलत आहे
कितीही बदललं तरी पाठ फिरवणार नाही
असा विश्वास त्याला देऊन ये
असा विश्वास त्याला देऊन ये

--रुपाली मावजो किर्तनी

















देश प्रेम - NRI चे


अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा 
असे म्हणत इथे परदेशात आलो 
पण येताना मनात आणि सामानात
आपला भारत देश घेऊन आलो 
भारतीय दुकाने ,भारतीय माणसं 
भारतीय चॅनल्स ,भारतीय मंडळे 
सगळीकडे भारतीय पाळेमुळे शोधु लागलो
परधर्मी परदेशात आपली संस्कृती रुजवू  लागलो 
मुलांसाठी सारे सणवार यथासांग करू लागलो 
मराठी भाषा ,मराठी कार्यक्रम यांची त्यांना  जाण देऊ लागलो
देशातील घडामोडीनी इथे हळवे होऊ लागलो 
देशावरील हल्ल्यानी इथे त्वेषाने पेटू लागलो 
देशाच्या प्रगतीने इथे आनंदानी उचंबळू लागलो 
प्रत्यक्ष देशसेवा जरी करू शकत नसलो 
देशाच्या आर्थिक विकासात खारीचा वाटा उचलु लागलो 
इथे येताना प्रत्येक वेळी आत काहीतरी तुटत असतं 
हातातुन काहीतरी सुटल्यासारखा वाटत असतं 
असे आम्हीं शब्दशः NRI आहोत 
तिथे शरीराने न राहणारे 
इथले मनाने भारतीय आहोत 

 सौ .नम्रता नितीन देव .
                                     

















मानसी मनोज करंदीकर


मानसी मनोज करंदीकर




श्रुतिका राजन तावडे


श्रुतिका राजन तावडे



Wednesday, January 30, 2019

उकडीचे बहुरंगी मोदक


माझं माहेर जरी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली असलं तरी वडील मूळचे सांगली जिल्ह्य़ातले
असल्यामुळे माहेरी देशस्थी पाककलेचा प्रभाव जास्त आहे. पण ताराबलम् चंद्रबलम् झालं अणि मी पक्क्या खवैय्या कोकणस्थी घरात आले. आज्जे सासुबाईंपासून पाच वर्षांच्या चुलत नणंदेपर्यंत जवळपास चाळीस लोकांचं आमचं हे एकत्र कुटुंब. त्यामुळे सगळे सणावार अगदी सोवळ्या ओवळ्यात पंचपक्वान्नसह साग्रसंगीत पार पडत असत.
     बर्‍याचशा गोष्टी माझ्या सरावाच्या होत्या पण माझ्या माहेरी कणकेचे उकडीचे मोदक बनत आणि इकडे सासरी, तांदळाचे उकडीचे मोदक. ��.. खूप कौशल्याने बनवावे लागतात, उकड जमणे फार महत्त्वाचे असते मळताना हाताला चटके बसले तरच मोदक चांगला जमतो.. असं बरंच काही ऐकलं असल्याने मनात क
कुतूहलमिश्रित भीती होती ��.. त्यात आमच्या घरच्या गणपतीच्या देवळात दर संकष्टील
21 मोदकांचा नैवेद्य असायचा. त्यामुळे कधी ना कधी तरी करणे क्रमप्राप्त होतेच .. तशी करण्याची आवडही होतीच त्यात थोडा धीर केला, म्हटलं बघुया करून अणि गणरायाचं नाव घेवून उकड काढली. छानशी मळून मोदक वळायला बसले, पण कळ्या पाडणे खरंच कसब होतं. त्यावेळेस मात्र आई आठवली. लहानपणी कणकेचे गोळे घेवून त्याला पणतीचा आकार देत कळ्या पाडायला शिकवल्याचं ज्ञान कामी आलं. ‘मोठी झाल्यावर कुठे मोदक बिदक करत बसणारेस’ असं न म्हणता जसं जमेल तसं प्रत्येक बाबतीतलं लहान सहान ज्ञान तर तिने आम्हाला दिलंच पण जर एखादवेळेस काही कमी पडलं तर कसं निभावून न्यायचं तेही तिने आ
म्हाला शिकवलं. त्यामुळे आज डॉक्टर झाल्यावरही इकडे लांब परदेशात राहताना कधी काही अडत नाही.
तिच्या अशा संस्कारांमुळेच अजूनही आमची आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडून ठेवली आहे. ��
आता आवडीला सवडीची जोड देत काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू असतो��.
ह्या वेळेस गणपतीला उकडीच्या बहुरंगी मोदकांचा नैवेद्य दाखवला. ��

उकडीचे बहुरंगी मोदक

डॉ पल्लवी प्रसाद बारटके

Sunday, November 4, 2018

इम्परफेक्ट


इम्परफेक्ट

लेखक:                   संजय मांजरेकर 

प्रकाशक:               हार्पर स्पोर्ट

पाने:                       २१०

प्रकाशन:               सन २०१७ 

भाषा:                     इंग्रजी

संजय पुस्तकाची सुरुवात विस्फोटक विधानाने करतो. तो म्हणतो की जे लोक असे समजतात की मी क्रिकेटमध्ये माझ्या क्षमते इतके यश प्राप्त केले नाही त्यांना मी असे सांगू इच्छितो की जो माणूस खऱ्याअर्थाने क्रीडा क्षेत्रात बुडलेला नव्हता त्याच्यासाठी १०० हुन जास्ती आंतरराष्ट्रीय सामने खेळणे हे काही कमी यश नाही.

संजय सांगतो की त्याचे वडील, प्रतिथयश विजय मांजरेकर, हे निवृत्तीनंतर एक अस्वस्थ, निराश आणि रागीट माणूस बनले होते. क्रिकेटमधून निवृत्ती नंतरच्या आयुष्याशी त्यांना जमवून घेताच आले नाही आणि त्याचा घरादारावर परिणाम झाला.

मुंबई फलंदाजी पद्धती (स्कूल ऑफ बॅटिंग) चे तो खूप कौतुक करतो. एखाद्या मधील प्रतिभेला खत पाणी घालणे, टीका करणे, उत्तेजना देणे या मुंबईच्या विस्मयकारक क्रिकेट व्यवस्थेमध्ये योग्य व होतकरू क्रिकेटपटुंचा क्रिकेट मार्ग आखून दिला जायचा. परंतु या व्यवस्थेत फिटनेसला जितके महत्व द्यायला पाहिजे तितके दिले जात नाही. या फिटनेस बद्दलच्या उदासीनतेला तो स्वतः बऱ्याचदा धावचीत होण्यासाठी जबाबदार धरतो.

लेखक वेस्ट इंडिसच्या क्रिकेटपटूंचे कौतुक करतो कारण ते मैदानावर बडबड आणि शिवीगाळ करत नाहीत आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यातील प्रतिभेला प्रोत्साहन देतात. तो इम्रान खानची त्याच्यातील नेतृत्वगुणाबद्दल आणि चिडखोर पाकिस्तानी खेळाडूंना वेसण घालण्यात आलेल्या यशाबद्दल प्रशंसा करतो.

जलदगती गोलंदाजी आणि बाउन्सर खेळण्यात पटाईत असलेला संजय तीच गोलंदाजी खेळताना असुरक्षित कसा बनला याचे तो विश्लेषण करतो. तो हेही मान्य करतो की त्याच्या बचावात्मक फलंदाजीचा त्याला अभिमान होता आणि त्याने सक्रियपणे धावा बनवल्या नाहीत. जर बचावात्मक फलंदाजी करण्याबरोबर त्याने एकेरी धावा घेतल्या असत्या तर त्याच्या कारकिर्दीने कदाचित वेगळे वळणही घेतले असते. लेखकाच्या या प्रांजळपणाचे आश्चर्य वाटले ना?

त्याच्या म्हणण्या प्रमाणे प्रावीण्याने त्याला झपाटून टाकले होते. हा आणि गरज नसताना गोष्टी गुंतागुंतीच्या करण्याची सवय हे त्याचे दुर्गुण ठरले. त्याला असेही वाटते की जर आजच्या क्रिकेटपटूंसारखा त्याला वैयक्तिक प्रशिक्षक असता आणि जर त्याच्या कडे संजयला मन मोकळे करता आले असते तर त्याचा त्याला आणि त्याच्या कारकिर्दीला फायदा झाला असता.

मुंबई रणजी संघामध्ये संघभावना होती. मुंबईचे क्रिकेटपटु त्यावेळी एकमेकांना सांभाळून घ्यायचे. नेमकी याच गोष्टीची भारतीय संघात उणीव होती. भारतीय संघामध्ये त्यावेळी उत्तर आणि पश्चिम असे दोन प्रभावगट होते. स्टार खेळाडूंना संघामध्ये देखील विशेष वागणूक दिली जायची. त्याच्या म्हणण्या प्रमाणे अझहर हा विशाल हृदयाचा, मर्यादित कल्पनाशक्ती आणि नेतृत्वगुण असलेला नशीबवान माणूस होता. तो सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर यांची खूप प्रशंसा करतो. पण तो हे देखील म्हणतो की प्रभाकर सगळ्यात महत्वाच्या कसोटीवर खरा उतरला नाही. सचोटीची कसोटी. त्याने संजयवर तेहेलकासाठी स्टिंग ऑपेरेशन करायचा फोल प्रयत्न केला.

समालोचक म्हणून काम करायला लागल्यावरच्या भागात तो डीन जोन्सच्या "टेरोरिस्ट" कांडाबद्दल लिहितो. त्याच बरोबर तो त्याच्या बरोबर काम केलेल्या इतर समालोचकांबद्दलही लिहितो.

या पुस्तकात काही गोष्टी वगळल्या आहेत आणि त्या प्रकर्षाने जाणवतात. मॅच फ़िक्सिन्ग बद्दल जवळजवळ काहीच लिहिलेले नाही. प्रभाकरने मॅच फ़िक्सिन्ग मध्ये कपिलचे नाव घेतले त्याबद्दल काही लिहिलेले नाही. गावस्कर आणि हर्षा भोगले यांचा उल्लेखही समालोचन विभागात नाही. त्याच्या कुटुंबाबद्दल (बायको आणि मुले) आणि त्यांच्यात असलेल्या नात्याबद्दल, त्याच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील त्यांच्या सहभागाबद्दल, स्थानाबद्दलही काही नाही.

आपल्याला माहिती आहे की संजय मांजरेकर हा परिपूर्णतावादी होता. त्यामुळे त्याच्या आत्मचरित्राचे नाव इम्परफेक्ट (अपरिपूर्ण) आहे याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मला असे वाटते की प्रावीण्याने पछाडलेला संजय आत्मटीका जरा जास्तीच करतो. परिपूर्णतेच्या मागे लागल्यामुळे तो सर्वंकष दृष्टिकोन गमावून बसला आणि त्याच्या क्षमतेइतके यश प्राप्त करू शकला नाही.

थोडक्यात हे पुस्तक म्हणजे त्याच्या कीर्तीचा उदय, प्रसिद्धीतील दिवस, प्रसिद्धी विलय, त्याच्या मनातील स्वतः विषयीच्या शंका, संघातून वगळल्याच्या यातना, लवकर निवृत्त होण्याचा निर्णय आणि समालोचक म्हणून त्याची दुसरी खेळी याचा प्रांजळ लेखाजोखा आहे.

मी चरित्र आणि आत्मचरित्राचा फारसा चहेता नाही. पण रविकिरणने (माझ्या चुलतभावाने) हे पुस्तक वाचायची जोरदार शिफारस केली आणि मी वाचावे म्हणून मला हे पुस्तक दिले देखील. पुस्तक वाचायचा निर्णय योग्य होता हे खचितच. पुस्तक छानच आहे.

मी हे पुस्तक का वाचले:     रवीकिरणची शिफारस      

काय आवडले नाही:             सुसूत्रतेचा अभाव

काय आवडले:                      प्रांजळपणा

शिफारस:                              तुम्हाला जर आत्मचरित्र आवडत असतील तर नक्की वाचा. आवडत नसतील तरी वाचा.

 

 
 

मंदार आपटे