हो बरोबर. महाराष्ट्र मंडळाची घटना
कार्यान्वित होऊन या वर्षी २५ वर्षे होतील. मला अभिमान वाटतो कि या २५ वर्षातल्या सुमारे
२३ वर्षात मी मंडळाचा सभासद आहे. खूप खूप छान आणि सुंदर आठवणी देत आलंय मंडळ.
अगदी सुरवातीला सत्य नारायण पूजा,
गणपती, कोजागिरी, वार्षिक सहल, अधून मधून नाटक व समजा दुबईला कोणी कलाकार भारतातून
आले तर त्यांचा कार्यक्रम असे स्वरूप असायचे. साधारण ४० कुटुंबे सभासद होती. मंडळाची
वाढ व विस्तार खूप छान होत गेला.
१९९४ मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला
सुरुवात झाली. त्याचबरोबर रमझान च्या महिन्यामध्ये बैठ्या खेळांच्या स्पर्धा सुरु झाल्या.
त्यानंतर मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होऊ लागल्या. त्या वेळची सर्व मुले आता संसाराला
लागली. सुरुवातीला लोटस टेबलं वापरली जायची सभासदांची लिस्ट म्हणून. अगदी थोडे सभासद
असल्याने निमंत्रणे फोन वर दिली जायची व त्यामुळे सर्वांचे फोन नंबर तोंडपाठ होऊन जायचे.
एखाद्या प्रोग्रॅमला कोणी जर आले नाही तर लगेच लक्षात यायचे आणि विचारपूस व्हायची.
हळू हळू सभासदांची संख्या वाढत गेली व ती आज पर्यंत वाढतच राहिली. ई-मेल द्वारा
निमंत्रणे सुरु झाली. तरी फोन करणे बंद नव्हते झाले. बहुतेक वेळा कार्यक्रम झाल्यावर सुद्धा फोन वर अभिप्राय घेतला जायचा. कदाचित
त्यामुळे आपुलकी निर्माण व्हायची.
खूप कमी जणांकडे कार असायची. कमिटी
वर जायला कार असेल तर प्राधान्य असायचे.
फार पूर्वीपासून गजाभाऊ वराडकर गणपतीची आरास करत आले. जुलै व ऑगस्ट महिना त्यांच्याकडे
मुक्काम असायचा काही जणांचा. एकाहून एक सरस मखर बनायचे दर वर्षी. बहुतेक वेळा अबू धाबीत
नुकतेच आलेल्या जोडप्याला पूजेचा मान दिला जायचा.
ISC मधे दर वर्षी एक दिवस मंडळाला
आजही मिळतो. रिजिनल फोकस डे या नावाखाली १९९५ पासून आपण करत आहोत. छोट्या मोठ्या नाटकापासून
ते भव्य ३ तासाच्या प्रोग्रॅम पर्यंत अनेक विषय हाताळले गेले. त्या कार्यक्रमात भाग
घेणे ही एक वेगळीच मजा आहे.
जसजसे नवे सभासद समिती वर येत गेले
तसतसे नवीन कल्पना पुढे येऊ लागल्या. यातूनच मग किलबिल, कुकरी स्पर्धा, दांडिया, अंताक्षरी,
वगैरे कार्यक्रम सुरु झाले. अधून मधून फोटो कॉम्पेटिशन, आकाश कंदील व रांगोळी स्पर्धा
याही घडत गेल्या.
January १९९८ मधे मासिक सुरु झाले.
त्याला पुढे बहर हे नाव देण्यात आले. बहरची संकल्पना सर्व सभासदांनी उचलून धरली. एकंदरीत
मराठी भाषिकांसाठी जे जे काही करता येईल ते सर्व मंडळ करत आलंय व करत राहील. मंडळाचा
सभासद असल्याचा मला सतत अभिमान आहे व तो दिवसागणिक वाढत जातोय.
-
नरेंद्र कुलकर्णी.
narendra.v.kulkarni@gmail.com
No comments:
Post a Comment