इम्परफेक्ट
लेखक: संजय मांजरेकर
प्रकाशक: हार्पर
स्पोर्ट
पाने: २१०
प्रकाशन: सन
२०१७
भाषा: इंग्रजी
संजय पुस्तकाची सुरुवात
विस्फोटक विधानाने करतो. तो म्हणतो की जे लोक असे समजतात की मी क्रिकेटमध्ये माझ्या
क्षमते इतके यश प्राप्त केले नाही त्यांना मी असे सांगू इच्छितो की जो माणूस खऱ्याअर्थाने
क्रीडा क्षेत्रात बुडलेला नव्हता त्याच्यासाठी १०० हुन जास्ती आंतरराष्ट्रीय सामने
खेळणे हे काही कमी यश नाही.
संजय सांगतो की त्याचे
वडील, प्रतिथयश विजय मांजरेकर, हे निवृत्तीनंतर एक अस्वस्थ, निराश आणि रागीट माणूस
बनले होते. क्रिकेटमधून निवृत्ती नंतरच्या आयुष्याशी त्यांना जमवून घेताच आले नाही
आणि त्याचा घरादारावर परिणाम झाला.
मुंबई फलंदाजी पद्धती
(स्कूल ऑफ बॅटिंग) चे तो खूप कौतुक करतो. एखाद्या मधील प्रतिभेला खत पाणी घालणे, टीका
करणे, उत्तेजना देणे या मुंबईच्या विस्मयकारक क्रिकेट व्यवस्थेमध्ये योग्य व होतकरू
क्रिकेटपटुंचा क्रिकेट मार्ग आखून दिला जायचा. परंतु या व्यवस्थेत फिटनेसला जितके महत्व
द्यायला पाहिजे तितके दिले जात नाही. या फिटनेस बद्दलच्या उदासीनतेला तो स्वतः बऱ्याचदा
धावचीत होण्यासाठी जबाबदार धरतो.
लेखक वेस्ट इंडिसच्या
क्रिकेटपटूंचे कौतुक करतो कारण ते मैदानावर बडबड आणि शिवीगाळ करत नाहीत आणि आपल्या
प्रतिस्पर्ध्यातील प्रतिभेला प्रोत्साहन देतात. तो इम्रान खानची त्याच्यातील नेतृत्वगुणाबद्दल
आणि चिडखोर पाकिस्तानी खेळाडूंना वेसण घालण्यात आलेल्या यशाबद्दल प्रशंसा करतो.
जलदगती गोलंदाजी आणि
बाउन्सर खेळण्यात पटाईत असलेला संजय तीच गोलंदाजी खेळताना असुरक्षित कसा बनला याचे
तो विश्लेषण करतो. तो हेही मान्य करतो की त्याच्या बचावात्मक फलंदाजीचा त्याला अभिमान
होता आणि त्याने सक्रियपणे धावा बनवल्या नाहीत. जर बचावात्मक फलंदाजी करण्याबरोबर त्याने
एकेरी धावा घेतल्या असत्या तर त्याच्या कारकिर्दीने कदाचित वेगळे वळणही घेतले असते.
लेखकाच्या या प्रांजळपणाचे आश्चर्य वाटले ना?
त्याच्या म्हणण्या
प्रमाणे प्रावीण्याने त्याला झपाटून टाकले होते. हा आणि गरज नसताना गोष्टी गुंतागुंतीच्या
करण्याची सवय हे त्याचे दुर्गुण ठरले. त्याला असेही वाटते की जर आजच्या क्रिकेटपटूंसारखा
त्याला वैयक्तिक प्रशिक्षक असता आणि जर त्याच्या कडे संजयला मन मोकळे करता आले असते
तर त्याचा त्याला आणि त्याच्या कारकिर्दीला फायदा झाला असता.
मुंबई रणजी संघामध्ये
संघभावना होती. मुंबईचे क्रिकेटपटु त्यावेळी एकमेकांना सांभाळून घ्यायचे. नेमकी याच
गोष्टीची भारतीय संघात उणीव होती. भारतीय संघामध्ये त्यावेळी उत्तर आणि पश्चिम असे
दोन प्रभावगट होते. स्टार खेळाडूंना संघामध्ये देखील विशेष वागणूक दिली जायची. त्याच्या
म्हणण्या प्रमाणे अझहर हा विशाल हृदयाचा, मर्यादित कल्पनाशक्ती आणि नेतृत्वगुण असलेला
नशीबवान माणूस होता. तो सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर यांची खूप प्रशंसा करतो. पण
तो हे देखील म्हणतो की प्रभाकर सगळ्यात महत्वाच्या कसोटीवर खरा उतरला नाही. सचोटीची
कसोटी. त्याने संजयवर तेहेलकासाठी स्टिंग ऑपेरेशन करायचा फोल प्रयत्न केला.
समालोचक म्हणून काम
करायला लागल्यावरच्या भागात तो डीन जोन्सच्या "टेरोरिस्ट" कांडाबद्दल लिहितो.
त्याच बरोबर तो त्याच्या बरोबर काम केलेल्या इतर समालोचकांबद्दलही लिहितो.
या पुस्तकात काही गोष्टी
वगळल्या आहेत आणि त्या प्रकर्षाने जाणवतात. मॅच फ़िक्सिन्ग बद्दल जवळजवळ काहीच लिहिलेले
नाही. प्रभाकरने मॅच फ़िक्सिन्ग मध्ये कपिलचे नाव घेतले त्याबद्दल काही लिहिलेले नाही.
गावस्कर आणि हर्षा भोगले यांचा उल्लेखही समालोचन विभागात नाही. त्याच्या कुटुंबाबद्दल
(बायको आणि मुले) आणि त्यांच्यात असलेल्या नात्याबद्दल, त्याच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील
त्यांच्या सहभागाबद्दल, स्थानाबद्दलही काही नाही.
आपल्याला माहिती आहे
की संजय मांजरेकर हा परिपूर्णतावादी होता. त्यामुळे त्याच्या आत्मचरित्राचे नाव इम्परफेक्ट
(अपरिपूर्ण) आहे याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मला असे वाटते की प्रावीण्याने
पछाडलेला संजय आत्मटीका जरा जास्तीच करतो. परिपूर्णतेच्या मागे लागल्यामुळे तो सर्वंकष
दृष्टिकोन गमावून बसला आणि त्याच्या क्षमतेइतके यश प्राप्त करू शकला नाही.
थोडक्यात हे पुस्तक
म्हणजे त्याच्या कीर्तीचा उदय, प्रसिद्धीतील दिवस, प्रसिद्धी विलय, त्याच्या मनातील
स्वतः विषयीच्या शंका, संघातून वगळल्याच्या यातना, लवकर निवृत्त होण्याचा निर्णय आणि
समालोचक म्हणून त्याची दुसरी खेळी याचा प्रांजळ लेखाजोखा आहे.
मी चरित्र आणि आत्मचरित्राचा
फारसा चहेता नाही. पण रविकिरणने (माझ्या चुलतभावाने) हे पुस्तक
वाचायची जोरदार शिफारस केली आणि मी वाचावे म्हणून मला हे पुस्तक दिले देखील. पुस्तक
वाचायचा निर्णय योग्य होता हे खचितच. पुस्तक छानच आहे.
मी हे पुस्तक
का वाचले: रवीकिरणची शिफारस
काय आवडले नाही: सुसूत्रतेचा अभाव
काय आवडले: प्रांजळपणा
शिफारस: तुम्हाला जर आत्मचरित्र
आवडत असतील तर
नक्की वाचा. आवडत
नसतील तरी वाचा.
मंदार आपटे