स्थळ: गोदावरी काठी , महाराष्ट्रात कुठेतरी.
सर्व बाजुला हिरवीगार उभ्या पिकांची मैदाने ,बाजुला दुथडी वाहनारी गोदावरी व मोकळ्या मैदानात आमनेसामने उभे ठाकलेले प्रचंड सैन्य.दोन्ही बाजुला रथावर वजनदार सेनापती होते. एकाच्या रथावर RD लिहीले होते तर दुसर्याच्या रथावर JD. दोन्ही सैन्यांमध्ये महाराष्ट्र भरातुन आलेले व्हाट्सअप ग्रुप चे गटप्रमुख,स्वयंघोषीत आहार तज्ञ , वजनाने व विकारांने बेजार झालेले पांढरपेशे लोक सामिल होते.काही कुडमुडे सुध्दा भविष्यात डायटींगची गरज पडलीच तर माहिती हवी म्हणून वजनदार तलवारी कशातरी पेलत एखाद्या समुहात सामील होते.
गंमत म्हणजे सर्व वयांच्या व विविध आकारांच्या महिला सैनिकांची संख्या लक्षणीय होती.
या गर्दीत गरिब कष्टकरी आभावानेच दिसत होता.
यातच,काय सुरु आहे हे पाहायला सोम्या - गोम्या या गर्दीत सहभागी झाले पण त्यांना कशासाठी युध्द तयारी सुरु आहे काहीच कळेना. न राहवुन त्यांनी एका भराभरा बकने कोंबत असलेल्या ढेरपोट्याला विचारले तेंव्हा तो जोरात खेकसला. ‘ ५५ मिनीटे संपायला १० मिनीटे बाकी आहेत. जरा वेळाने या’.
सोम्या - गोम्या अजुन चक्रावले . ते विरोधी गटात घुसले व तिथे एकाला विचारले. तो पण उत्तर देण्या ऐवजी ‘ माझी २ तास संपलीत मला काहीतरी खाल्लेच पाहीजे म्हणून ‘ तरातरा निघुन गेला.
सोम्या-गोम्यांना काही कळण्याच्या आतच ‘ यल्गार’ झाला व दोन्ही बाजुंचे सैन्य तुटुन पडले.RD गटातील सैनिक दर २ तासांना चरता चरता चढाई करत होते तर JD गटातील ५५ मिनीटा दरम्यान शत्रुने काहीही केले तरी मुग ( किंवा काहीही) गिळुन गप्प होते!
यात काही धुर्त गटबदलु तळ्यात मळ्यात करत दर दोन तासांनी ५५ मिनीटे खात होती.
अखेर दोन महिन्याने अनिर्णीत अवस्थेत युध्द संपले.
अन्नाच्या दुर्भिक्षा मुळे वाचलेल्या सैन्यांना जेमतेम दोन वेळचेच खायला मिळायला लागले. युध्दात परिश्रम झाल्याने बर्याच जनांना आपली जुनी फिगर गवसली होती. काहींनी BP, कोलेस्ट्रॉल, शुगर चेक केली व त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण कमी जेवन किंवा शारिरीक परिश्रम अशा फुटकळ गोष्टींना श्रेय द्यायला कोणी तयार होईना.
काही दिवसांनी सोम्या - गोम्या सैनिकांच्या विरकथा फेसबुक वर वाचु लागले. प्रत्येक जन आपलीच रण( आहार) निती कशी योग्य हे पटवन्यासाठी ‘ युध्दा पुर्वी- युध्दा नंतर’ असे फोटो टाकु लागले.वाद परत वाढत चालला होता.
त्यातच SD नावाचा नविन आहार तज्ञ नवा कोरा डायट प्लॅन घेउन आला ‘ एक दिवस पाहिजे तेवढे खा दुसर्या दिवशी पुर्ण उपवास करा, २ आठवड्यात १० किलो वजन कमी होणारच!’
त्याचेही समर्थक वाढु लागले.
दुसर्या आहार युध्दाच्या ठीणग्या परत पडतायत हे सोम्या - गोम्या ने ओळखले!!
-डॉ. अभिजीत लोणीकर
अबुधाबी.
[ उदघोषणा:लेखकाचा व डायटिंगचा दुरान्वये संबंध नाही व तो कुठल्याही डायट प्लान वर नाहीये.कथेतील नावे काल्पनिक नसुन जानकारांनी त्याचा योग्य संबंध लावावा!]
No comments:
Post a Comment