दुर्ग भ्रमंती - राजगड
‘राजगड’
नावातचं सारं काही समावलेलं, ‘गडांचा राजा, राजियांचा गड’ म्हणजे किल्ले ‘राजगड’.
हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पाहण्यासाठी
आमचे सुट्टीच्या दिवशी पहाटे कॉलेज च्या हॉस्टेल मधूनच जाण्याचे ठरले. कॉलेज
पुणे-सातारा रोडवरच असल्या कारणाने प्रवासाचा काही वेळ नक्कीच वाचणार होता.
माझ्याकडे सेकंड हॅन्ड बजाज चेतक होती. (त्यावेळी “बाईक” हे मध्यमवर्गीय मुलांचे वाहन नव्हते) चार दुचाकी
वाहने काढून आम्ही ७ जणांनी पहाटे हॉस्टेल सोडलं. कात्रज रस्त्यावर वेल्हे फाटा
घेतला आणि थेट गुंजवणे नावाच्या छोट्या गावात पोहोचलो. गावात एका छोट्या घरात
नाश्ता केला आणि त्या घराजवळच वाहने उभी करून तेथून राजगड चढायला सुरुवात केली.
गुंजवणे पासून चढायला साधारण ३ तास लागतात. संपूर्ण ट्रेक ऊन-पावसाचा खेळ चालूच
होता. हिरव्या रंगात नटलेल्या निसर्गाचा पुरेपूर आनंद घेत आणि चढता चढता रंगलेल्या
गप्पांमध्ये लवकरच शेवटच्या पॅच ला पोहोचलो. या पॅच मध्ये काही ठिकाणी लोखंडी
शिड्या आणि रेलिंग आहेत त्यामुळे बराच आधार मिळाला. नाहीतर हि वाट एकंदरीत खूपच
अवघड. गुंजवणे गावातून सुरुवात केली तर आपण चोर दरवाज्याने राजगड मध्ये प्रवेश
करतो. या व्यतिरिक्त गडावर येण्यासाठी इतर वाटा पण आहेत. एक वाट वाजेघर गावातून
पाली दरवाज्यापाशी येऊन पोचते तर अजून एक वाट भुतोंडे गावातून अळू दरवाज्यापाशी
येऊन पोचते.
चोर
दरवाज्यामार्गे गडावर येताच समोर एक सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव दिसतो.
तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. याचे नाव पद्मावती तलाव आणि या बाजूच्या माची चे नाव
पद्मावती माची. राजगडावर एकूण तीन माच्या आहेत. पद्मावती माची, सुवेळा माची आणि
संजीवनी माची. गडावर अनेक शिवकालीन वास्तूंचे अवशेष देखील आहेत. संपूर्ण गड
व्यवस्थित बघायचा झाला तर २ दिवस देखील कमी पडतील. पण आम्हाला संध्याकाळ पर्यंत
परत जायचे असल्या कारणाने आम्ही मर्यादित वेळेत शक्य होईल तेवढ्या
ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले.
तीन
दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याची
रचना आहे.
पद्मावती माची: पद्मावती
माचीवर पद्मावती तलावा खेरीज सईबाईंची समाधी, पद्मावती
मंदिर, राजवाडा, अंबरखाना, दारूगोळ्याचे कोठार
आणि राजसदर यांचे अवशेष पाहायला मिळतात. राजगडावरील सदर म्हणजे जिथे शिवाजी महाराजांनी विविध
युद्धांबद्दल सर्व नियोजन आखले तसेच गुप्त खलबती पार पाडल्या ती जागा. अफझल खानाला
प्रतापगडापाशी यमसदनाला पाठविले, शास्ताखानाला लाल महालात धडा शिकविला, आग्राच्या दरबारात डरकाळी फोडली या आणि
अशा अनेक ठिकाणी केलेल्या कारवायांबद्दल आराखडे आणि मनसुबे इथेच याच सदरेत आखले
गेले.
पाली दरवाजाचा मार्ग प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या
खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे.
यातून हत्ती सुद्धा अंबरीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून पुढे गेल्यावर
भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद
अशा बुरुजांनी केलेले आहे. गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन
प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पाली किंवा गुंजवणे
दरवाजाने आल्यावर देखील आपण पद्मावती माचीवर पोहचतो.
सुवेळा माची : ही पूर्वेकडील माची. पूर्वेकडे ही माची
चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे
म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर प्रथम चिलखती
बुरुज व पुढे खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. खडकातील अशा
नैसर्गिक छिद्राला नेढं असे म्हणतात. या पूर्वीच्या मे महिन्यातील ईरशाळगड च्या लेखात देखील आपण
असं नेढं बघितलं होतं.
संजीवनी माची : ही माची जवळपास
दोन ते अडीच कि.मी. लांब आहे. तोरण्याच्या दिशेने येणारी वाट संजीवनी माचीवर अळू
दरवाज्यातून येते. अळू दरवाजा पासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी
दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७
मीटर आहे. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. या माचीवर अनेक
पाण्याची टाकी आहेत.
बालेकिल्ला :राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला.
या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर
बालेकिल्ल्याचा महादरवाजा लागतो. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे.
बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे
अवशेष आढळतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेर आपल्या लक्षात येतो.
गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
राजगडाकडे
कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. निरा, कानंदी,
गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात असे दुर्गम स्थान व विस्तीर्ण
बालेकिल्ला असल्यामुळे राजगड स्वराज्याचे राजकीय केंद्र बनला. महाराजांचे जवळ-पास
२५ वर्षे येथे वास्त्यव्य होते. मध्यन्तरी एका
वाचनात राजगडाबद्दल चे वर्णन खूप भावले. सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी
माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी, म्हणजे ‘किल्ले राजगड’...!! महाराजांच्या
मर्मबंधांच्या कैक यादगिरी ठेवणारी कातळी कुप्पी, म्हणजे ‘किल्ले राजगड’...!! अनेक सुख दुःखाचे प्रसंग ज्या किल्ल्याने पाहिले आणि अनुभवले
असा ‘किल्ले राजगड’...!! ‘शंभूराजांचे बालपण’, ‘राजाराम महाराजांचा जन्म’,
‘शेकडो यशस्वी मोहिमांगणिक अथांग पसरणारे हिंदवी स्वराज्य’ उभ्या डोळयांनी पाहणारा
बुलंद, बेलाग, अफाट आणि बळकट किल्ला म्हणजे ‘किल्ले राजगड’...!! आजही त्या
अजरामर इतिहासाची साक्ष देत इथली प्रत्येक वास्तू खंबीरपणे उभी आहे. शिवतीर्थ
रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड
त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. याचे वर्णन जितके करावे, आणि गोडवे जितके
गावेत तितके कमीच..!!
चढाई साठी लागणारा वेळ : अंदाजे ३ तास
श्रेणी
: मध्यम
सारंग आपटे