Wednesday, July 25, 2018

प्यालेस ऑफ अस्यसिन्स : द राईस ऑफ अश्वत्थामा-पुस्तक परीक्षण - श्री. मंदार आपटे

प्यालेस ऑफ अस्यसिन्स : द राईस ऑफ अश्वत्थामा
लेखक : आदित्य अय्यंगार
प्रकाशक : हशेट इंडिया
पाने : २२३
प्रकाशन : सन २०१६
भाषा : इंग्रजी

महाभारताचं युद्ध संपलं आहे. अश्वत्थामा वाळवंटात शुद्धीवर येतो. त्याच्या अंगावर फोड आले आहेत. त्यातून रक्त व पू वहातो आहे. त्याला त्या गवळ्याने दिलेला शाप आठवतो. या युद्धात विधवा झालेली कस्तुरी नावाची एक तरुणी, आश्चर्यकारकरीत्या त्याची शुश्रुषा करते. प्रकृती सुधारल्यावर त्याला युद्धातून जिवंत राहिलेले काही कौरव सैनिक भेटतात.

अश्वत्थाम्याची प्रतिशोधाची तहान भागली आहे का ? त्याने युद्धानंतर केलेल्या कुकर्माचा त्याला पश्चाताप होतो आहे का? श्रीकृष्णाच्या शापाबद्दल तो त्याच्यावर खार खाऊन आहे का ?

लेखकाने एक चित्तवेधक कल्पना मांडली आहे. अश्वत्थामा आपला पूर्ण न झालेला प्रतिशोध घेऊ इच्छितो का? चिरंजीव होण्याकडे तो शाप म्हणून पहातो की वर म्हणून ? लेखकाला पडलेल्या प्रश्नातूनच ही काल्पनिका जन्माला आली असली पाहिजे. मला वाटते कि हे एक उत्तम कथबीज आहे.

कथा मनोरंजक आहे. तत्वाची संकल्पना, स्यमंतक व कालकमणी ही शक्तिशाली रत्ने आणि चिरंजीव झाल्यानंतरचे परीणाम वगैरे गोष्टींचा प्रभावीपणे वापर केला आहे. आपण जेव्हा अश्वत्थाम्याची गोष्ट वाचतो तेव्हा आपली अशी अपेक्षा असते की तो या कथेचा नायक असेल आणि घडणाऱ्या गोष्टींवर त्याचे नियंत्रण असेल. परंतु या कथेचा तो नायक असला तरी घडणाऱ्या गोष्टींवर त्याचे नियंत्रण नाही. तो समसप्तकांच्या मागे  फरफटत जातो. खरा अश्वत्थामा असा सामान्य माणसांच्या मागे दुय्यम भूमिका बजावेल का? तो इतका असहाय्य असेल का? त्याला सहजसहजी ब्ल्यक्मेल करणे शक्य आहे का?

या कथेत अश्वत्थामा गोंधळून गेलेला दिसतो. आपले विधिलिखित स्वतः घडवण्यापेक्षा तो इतरांचे अनुसरण करतो आणि आपल्या नियतीचा प्रभारी वाटत नाही. सेनापती हे पात्र थोडे आतिशयोक्त वाटते. तो सर्वज्ञ आहे. त्याला सगळे काही कसे काय माहिती आहे? कन्या बदला घेऊ इच्छिते पण सर्वप्रथम ती एक आई आहे. सिंह हा एक तरुण आहे आणि तो अश्वत्थामाच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली आहे.

पुस्तकाच्या नावाप्रमाणे ही अश्वत्थामाची गोष्ट आहे. पण या गोष्टीत एक वेगळेपणा आहे. महाभारताशी संबंधीत सर्व गोष्टी या महाभारत काळात घडतात व कुरुक्षेत्राच्या युद्धाबरोबर संपतात. पण ही कथा कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर सुरु होते. लेखकाच्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. त्याने महाभारताच्या संदर्भाने ही कथा रचली आणि ती कुरुक्षेत्राच्या महायुद्धानंतर मांडली.

चिरंजीव अश्वत्थाम्याने बऱ्याच लेखकांच्या कल्पनाशक्तीला पंख दिले आहेत. अश्वत्थाम्याच्या आयुष्यावर कितीक कादंबऱ्या झाल्या. कथा झाल्या. पण या लेखकाने एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. कृष्ठरोग आणि चिरंजीव होण्याचा शाप मिळाल्यावर अश्वत्थाम्याने आपले प्रारब्ध स्विकारले का? त्याने या शापातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला का? त्याने आपला
पुस्तकाच्या शेवटी लेखकाने या पुस्ताच्या दुसऱ्या भागाची तयारी करून ठेवली आहे. जर दुसरा भाग प्रसिद्ध झाला तर आपण हजारो वर्षानंतर ट्रौय या शहरात ट्रोजन युद्धात अश्वत्थाम्याला भेटू. तेव्हांही अश्वत्थामा चिरंजिवीत्वाच्या शापातून मुक्त होण्यासाठी स्यमंतक मणी हुडकताना दिसेल.

मी हे पुस्तक का वाचले ?                  ब्लर्ब.
काय आवडले नाही ?                        कोमट शेवट.
काय आवडले ?                                कल्पना.
शिफारस                                        वाचनीय.



 मंदार आपटे.



No comments:

Post a Comment