सध्या भारतामध्ये लोकसभा निवडणुकांचा ज्वर अगदी शिगेला पोहोचलाय. हा लेख तुम्ही वाचेपर्यंत मतदानाचा पहिला टप्पा पार पडलेला असेल. नेत्यांच्या सभा, दौरे, आश्वासनं, प्रलोभनं, आरोप, प्रत्यारोप, युत्या, आघाड्या, पक्षप्रवेश, दलबदली आदि राजकीय गोष्टी, घडामोडी चालू आहेत. विविध प्रसारमाध्यमांतून मुलाखती, चर्चासत्रं, लेख, जाहिराती जनमत चाचण्या, तर फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर आदि समाजमाध्यमांतून पक्षाच्या, नेत्याच्या समर्थनार्थ वा विरोधात्मक पोस्ट्स, खरे खोटे व्हिडिओ, फोटो, मेसेजेस, ट्रोलिंग या गोष्टी जोरावर आहेत. एकूण काय तर मतदाराला विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेण्यासाठी भरपूर स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. आता प्रश्न असा आहे कि सर्वसामान्य मतदार खरोखर अभ्यास करून मत देतो का? किंबहुना तेवढा अभ्यास करायला मतदाराला वेळ आहे का? याच प्रश्नांच्या अनुषंगाने निवडणूक, मतदार आणि मतदान यांचा अभ्यास केला.
सर्वसाधारणपणे, माझ्या दृष्टीने मतदारांचं वर्गिकरण करायचं झालं तर ते एकनिष्ठ, भावनिक, अभ्यासू आणि उदासीन अश्याप्रकारे करता येईल. एकनिष्ठ हा जो प्रकार आहे तो म्हणजे पाठिंबा दिलेल्या पक्षाशी वा नेत्याशी इतके एकनिष्ठ असतात कि त्यांच्या निष्क्रियतेची देखील पाठराखण करतात आणि विरोधक पक्षाच्या, नेत्यांच्या चांगल्या गोष्टीमधेही चुका शोधतात. या एकनिष्ठांची ठरलेली मतं कोणत्याही परिस्थितीत मिळणारच असल्यामुळे त्या त्या नेत्यांना व पक्षाला हि मतं मिळण्याची काळजी नसते. 'भावनिक' मतदार असतो. हा त्या त्या वेळच्या निवडणुकीच्या लाटेवर स्वार होतो आणि वर नमूद केलेल्या स्टडी मटेरियलच्या प्रभावाखाली येऊन वाहत, नव्हे, वाहवत जातो आणि त्याप्रमाणे मतदान करतो. 'अभ्यासू' मतदार नावाप्रमाणेच वरील स्टडी मटेरियलचा पूर्ण अभ्यास करून सारासार विचार करून मतदान करतो. यानंतरचा प्रकार म्हणजे 'उदासीन' मतदार. या प्रकारचा जो मतदार आहे त्याला एकतर राजकारण, निवडणूक या गोष्टीमधे रस नसतो किंवा या गोष्टींवरून विश्वास उडालेला असतो. मतदारांच्या या वर्गीकरणाचा तार्किक विचार केला तर असं वाटतं कि एकनिष्ठ जेंव्हा निराश होतो तेंव्हा तो भावनिक होतो, त्यानंतरही जेंव्हा निराशा पदरी पडते तेंव्हा तो अभ्यासू होतो आणि हे सर्व करून झाल्यावर त्याचा जेंव्हा विश्वास उडून जातो तेंव्हा तो उदासीन होतो.
राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना एकनिष्ठ आणि उदासीन मतदारांची फारशी काळजी नसते, कारण एकनिष्ठांची मतं हमखास मिळणार असतात तर उदासीन मतदारांची कुणालाही मिळणार नसतात. निकालावर परिणाम करणारे म्हणजे भावनिक आणि अभ्यासू मतदार. निवडणुकीमध्ये पक्षांची आणि नेत्यांची तारांबळ, धावपळ, कवायत असते ती केवळ या मतदारांचे मन आपल्याकडे वळविण्यासाठी आणि परिणामी मत मिळविण्यासाठी. मग सुरु होतात नेत्यांच्या सभा, प्रचार फेऱ्या, वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतीं, चर्चां, चर्चासत्रं, जाहिराती. इतकंच काय तर भावनिक मतदारांच्या मनांचा ठाव घेऊन त्याप्रमाणे प्रचाराची रणनीती आखण्यासाठी व्यावसायिक रणनीतीकार नियुक्त केले जातात. हे रणनीतीकार आपापल्या पक्षाची, नेत्याची प्रतिमा उजळविण्यासाठी मतदारांचा अभ्यास करून प्रचाराची रणनीती आखातात. मग पुढे जाऊन व्हॉट्सअँप फॉरवर्ड्स, फेसबुक पोस्ट्स यांसारख्या प्रभावी माध्यमांचा प्रचारासाठी सर्रास वापर केला जातो. याचाच आधार घेऊन मतदारांचा बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न देखील होतात. आता प्रश्न असा कि बुद्धिभेद म्हणजे काय? उदाहरणादाखल सांगायचे तर एकाच विषयावरील बातम्या चर्चा जर विविध वृत्तवाहिन्यांवर बघितल्या तर सूत्रधारांनी ठराविक पद्धतीने वापरलेली भाषा, चर्चेला दिलेली दिशा या गोष्टी निष्पक्षतेवर शंका उपस्थित करतात. व्हाट्सअँप फॉरवर्ड्स, फेसबुक पोस्ट्स यांच्या माध्यमातून छेडछाड केलेले फोटो, विडिओ मतदारांपर्यंत पोहोचवले जातात. विकास कामे दाखविण्यासाठी चक्क परदेशातील फोटोंचा वापर केल्याचही बऱ्याच वेळा उघड झालय. याची प्रभावशीलता लक्षात घेऊन आता तर राजकीय पक्षांचे समर्थक (एकनिष्ठ) आपापल्या पक्षाला, नेत्याला सुसंगत वातावरण निर्माण करण्यासाठी इमेजेस, व्हिडीओ आणि लिखित स्वरूपाच्या पोस्ट्स तयार करून व्हायरल करतात आणि शिकलेसवरलेले लोक देखील या बुद्धिभेदाचा शिकार होतात आणि कसलाही विचार, शहानिशा न करता पटवूनही घेतात आणि इतरांना फॉरवर्ड करत राहतात.
अभ्यासू मतदार मात्र या सर्व गोष्टींचा अभ्यास करतो. आता अभ्यास म्हणजे नेमकं काय, तर विकसित माहिती तंत्रज्ञानामुळे, इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या भरपूर माहितीचा उपयोग करून बातम्यांची, फॉरवर्ड केलेल्या पोस्ट्स, फोटो, विडिओ यांची शहानिशा करता येते. आधी सांगितल्याप्रमाणे एकाच विषयावरील चर्चा विविध वृत्तवाहिन्यांवरून बघितली तरी वेगवेगळ्या पक्षांच्या बाजूने आणि विरोधात असे सर्व मुद्दे लक्षात येतात. अहो, एखादा फोटो छेडछाड केलेला आहे कि नाही याचीही खात्री इंटरनेटवर रिव्हर्स इमेज सर्च द्वारे करता येते. याच बरोबर इंटरनेटवर बातम्यांची सत्यासत्यता पडताळून योग्य बातमी देणाऱ्या वाहिन्यादेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जर सतर्क राहिलो तरच आपण योग्य त्या माहितीच्या आधारावर आपल्यासाठी काम करणाऱ्यांची योग्य निवड करू शकतो. पण, दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी आणि एका सर्वसाधारण राहणीमानाची जुळवाजुळव करण्यासाठी अहोरात्र धावपळ करणाऱ्या सर्वसामान्य मतदाराला, शहानिशा वगैरे गोष्टी करण्यासाठी वेळ कुठे आहे? मग याच गोष्टीचा फायदा उचलला जातो आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो..
दुसरं म्हणजे, निवडणुका आल्या कि मतदानाच्या अधिकाराची जाणीवही आवर्जून केली जाते, मतदानाचं महत्व वगैरे सांगून मतदान करण्याचं आवाहन केलं जातं. मागे, निवडणूक आयोगाने मतदानाची सक्ती केल्याची बातमी वाचनात आली होती, ती म्हणजे, मतदान नाही केलं तर बँकेच्या खात्यातून किंवा मोबाईलच्या रिचार्जमधून पैसे कापले जातील. शहानिशा केल्यानंतर हि सक्तीची बातमी अपेक्षेप्रमाणे खोटी निघाली. दुसरी एक बातमी वाचली होती कि मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी एका शाळेने मतदान केल्यानंतर मतदारांच्या पाल्यांना एक गुण अतिरिक्त देण्याचे जाहीर केले. एकीकडे या बातम्या तर हा लेख लिहीत असतानाच पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी बातम्या आल्या कि वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या काही मतदारांची नावेच मतदार यादीत नाहीत. हि बातमी ऐकल्यानंतर पहिली प्रार्थना केली ती त्या शाळेतल्या सर्व मुलांसाठी, कि त्यांच्या पालकांची नावे मतदार यादीत असूदेत. नाहीतर पालकांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांच्या मुलांचा एक गुण उगाच कमी व्हायचा. एकीकडे मतदानाचा अधिकार वापरण्याचं आवाहन तर दुसरीकडे तोच अधिकार हिरावला जाण्याची नामुष्की, किती हा विरोधाभास. मतदानाच्या अधिकाराबद्दल जसे मतदाराला जागरूक केले जाते तशीच मतदान यादीत नाव नसल्यावर किंवा आपल्या नावावर दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केल्याचे लक्षात आल्यावर नियमानुसार काय करायचे याबद्दल देखील मतदारांना जागरूक केले गेले पाहिजे. मतदानाची सक्ती आणि मतदान न करणाऱ्यांना दूषणं देण्याआधी, व्यवस्थेमध्ये सुधारणा करून नियमितता आणणे गरजेचे आहे.
एकूणच निवडणुकीबद्दल बोलायचं तर व्यवस्थेमध्ये सुधारणेची गरज तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त मतदारांमध्ये मतदार म्हणून सुधारणेला वाव आहे. महत्वाचे म्हणजे एक नागरिक म्हणून सदैव जागरूक राहण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क आणि साशंक राहण्याची गरज आहे. एखाद्या आजाराची लक्षणं दिसल्यावर इंटरनेटवर शोधाशोध करून मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात पारंगत असलेल्या डॉक्टरला जसे आपण प्रश्न विचारून बेजार करतो, अगदी तसेच व्यवस्थेतील आजारी घटकांवर रिसर्च करून राजकीय पक्षांना, नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि मग त्या प्रश्नांच्या मिळणाऱ्या, न मिळणाऱ्या उत्तरांवर निवडणुकीत कुणाला मत द्यायचे हे ठरवले पाहिजे. नाहीतर, काही आश्वासनं, काही व्हॉट्सअँप फॉर्वर्डस, काही फेसबुक पोस्ट्स, काही ऐकायला बारी वाटणारी आणि तोंडवळणी पडणारी घोषवाक्ये याचा वापर करून रणनीतीकार जर निकालाची दिशा ठरवणार असतील तर मतदाराने काय केवळ ईव्हीएम मशीनचं एक बटन दाबून बोटावर शाई लावून घेण्यासाठी मतदान करायला जायचं? याला मतदानाचा अधिकार म्हणायचा कि मतदानाची औपचारिकता? शेवटी इतकंच म्हणेन कि, मतदानाची केवळ औपचारिकता न करता त्याचा अधिकार म्हणून वापर करायचा असेल तर, मत मागताना जेवढा अभ्यास हे राजकीय पक्ष, नेते, रणनीतीकर मतदाराचा करतात, किमान तेवढा किंवा त्याहीपेक्षा जास्त अभ्यास मत देताना मतदाराने राजकीय पक्षांचा, नेत्यांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि एकूणच देशाच्या व्यवस्थेचा केला पाहिजे.
श्री. सचिन राजे .
No comments:
Post a Comment