Sunday, July 7, 2019

पाऊस आठवणीतला - श्री. अजय पडवळ


"तुझ्यापेक्षा इतके तितके किंवा अमुक तमुक पावसाळे जास्त पाहिलेत मी"..... फुशारक्या मारण्यासाठी हा वाक्प्रचार आपल्याकडे सर्रास वापरला जातो. पण पावसाळा ही केवळ पाहण्याची नाही तर अनुभवयाची गोष्ट आहे. आपल्यातल्या प्रत्येकाने पावसाचा अनुभव लहानपणापासुनच नक्कीच घेतलेला असेलच, पण या बाबतीत मी स्वतःला थोडा भाग्यवान समजतो. तळ कोकणातला ढगफुटीचा अंगावर येणारा पाऊस, तसेच मुंबईतील जनजीवन विस्कळीत करणारा पाऊस, अशी पावसाची विविध रूपे अनुभवता आली. 

पाऊस’ हा शब्द नुसता ऐकला तरीही बालवाडीत शिकवली गेलेली “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा” ही कविता न आठवली तर आश्चर्यच. पावसाची पहिली ओळख झाली ती कोकणातच. मी लहान असतानाची घटना. खूप मोठे वादळ पावसाला घेऊन आले. घरातील जाणती मंडळी भात लावणीसाठी शेतावर गेलेली. घरी आत्या मला सांभाळत होती. वादळाने गावातील घरांवरची, देवळावरची कौले उडवून दिली. पावसाने झोडपले. शेतावरची  मंडळी ओढ्याला आलेल्या पुरामुळे पलीकडेच अडकून पडलेली. अशातच माझी आत्या माळ्याच्या उरलेल्या लाकडाच्या फळ्यांखाली मला छातीशी कवटाळून भेदरलेल्या अवस्थेत तग धरून, जीव मुठीत घेऊन घेऊन उभी होती, पाऊस संपेपर्यंत. हीच माझी पावसाबरोबर झालेली पहिली भेट बहुतेक...

असे असले तरी कोकणातला पाऊस नेहमीच इतका रौद्र, भीषण असतोच असे नाही. कोकणातील पाऊस म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. जणू एक लॅन्डस्केपच. एका बाजूला अरबी समुद्राचा नितांत सुंदर, उधाणलेल्या लाटांचा समुद्र किनारा तर दुसरीकडे अभेद्य सह्याद्रीचे गगनाला भिडणारे कातळकडे. हे डोंगर कडे म्हणजेच पावसाळ्यात खळाळत जमिनीवर झेपावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांचे माहेरघरच. इतर वेळी काळा कभिन्न, राकट असणारा हा सह्याद्री पावसाळ्यात मात्र हिरवाईने नटतो, आणि त्याच्या माथ्यावर साचलेलं पाणी जेव्हा खाली झेप घेते तेव्हा दुरून दिसणारी ती पांढरी शुभ्र रेष म्हणजे सुंदरीच्या काळ्याभोर केसातली जणू रेशमी बटाच भासते. ही बटा अलगद हातात घ्यावी अन तिच्याशी प्रेमालाप करावा असे कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. 


ग्रीष्माचा कडकडीत उन्हाळा सर्वांगी घामाच्या धारा फोडत असतानाच अचानक आकाशात गडगडायला लागतं, काळे ढग दाटून येतात आणि वळवाचा पाऊस पडायला सुरुवात होते. धरणीमाता चिंब ओली होते. त्यावेळी येणारा मातीचा मोहक सुगंध प्रत्येकाच्या मनाच्या कुपीत ठाण मांडून बसतो. 

रातकिड्यांची किरकिर संपून बेडकांची डराव-डराव जुगलबंदी सुरु होते. पहिल्या पावसाचं पाणी पिऊन धरती तृप्त झाली की शेतकरी राजा सर्जा-राजाचं औत बांधतो, पेरणीची तयारी करतो, सगळ्या शिवारात हिरवेकंच कोंब उगवतात. इवली इवली ईरली घेऊन आयाबाया शेतात रांगू लागतात. उन्हाने रखरखलेले डोंगर, माळराने हिरवा शालू नेसतात. कोरड्या ओढ्यांना झऱ्यांचे पाझर फुटतात. त्याच ओढ्यांतून मासे वळचणीस लागतात. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झालेला असतो. त्याच्या वाहनावरून वरूणराजा किती बरसणार याचे आखाडे अनुभवी मंडळींकडून लावले जातात. मृगातून सूर्यदेवाने आर्द्रात प्रवेश केल्यावर पावसाचा अंदाज बघून भात लावणीला सुरुवात केली जाते. या काळात मात्र पावसाची जोरदार हजेरी असते. तशी गरजच असते. पण काही वेळा तर इतका बरसतो की शेतमळे पाण्याने वरपर्यंत भरून वाहू लागतात, पाणी थोपवणे अशक्य होते. भातलावणीचे कामही थांबवावे लागतं, ओढ्यांना पूर येतो, अशा पावसात हौशी मंडळी इंद घेऊन मासे पकडायला धावतात. रात्रीच्या मासेमारीसाठी मात्र संथ वाहणारे निर्मळ पाणी, अजिबात पाऊस नसलेली, चांदणं पडलेली रात्र निवडली जाते.

खरंच कोकणातला पाऊस म्हणजे निसर्गाचं मुक्त नृत्य, पर्वत रांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, दुधाचे घट फोडत खळखळ वाहणारे ओढे, डोंगरांना आच्छादून टाकणारे काळेभोर ढग, घाट रस्त्यांना कवेत घेणारी धुक्याची दुलई, हिरवाई परिधान केलेली माळ-राणे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, वाऱ्यावर डोलणारी भाताची खाचरं, गोड्या पाण्यातले मासे, खेकड्याच्या रस्सा, किल्ल्यांवरचे ट्रेक....



कोकणातल्या पावसाची एक गम्मत आहे, धो धो कोसळला काय किंवा २-३ दिवस सतत रिपरिप लावली काय, एकदा का थांबला की अगदी थोड्याच वेळात सर्व काही पूर्ववत. 

मुंबईतला पाऊस मात्र यापेक्षा बराच वेगळा. जनजीवन विस्कळीत करणारा, पण तरीही मंत्रमुग्ध करणारा. लहानपणी वडाळ्याला, चाळीत राहत असताना अगदी अर्धा तास जरी पडला तरी बाहेर सगळीकडे पाणी तुंबत असे, अजून अर्धा एक तास जास्त पडला की मग बाहेरचे पाणी घरात शिरत असे. मग आम्हा भावंडांची जमिनीवर असलेल्या वस्तू वर उचलून ठेवण्यासाठी धडपड सुरु होत असे.

शाळेत शेवटच्या बेंचवर भिजलेल्या छत्र्या आणि रेनकोट सुकायला टाकायला मुलांमध्ये स्पर्धा लागायची. शाळेचा कंटाळा आला की मात्र खूप मोठा पाऊस पडून बसेस आणि शाळा बंद पडावी अशी मनोमन ईच्छा व्हायची, बऱ्याच वेळा ती अपुरीच राहायची. चाळीतल्या घरावर ऍसबेसटॉसचा पत्रा होता. रात्री झोपायच्या वेळी त्या पत्र्यावर पडणाऱ्या थेंबांचा विशिष्ट आवाज कानात घुमत राहत असे. त्याच्या लयी कमी जास्त होत. त्या संगीतमय वातावरणात डोळे झोपेच्या अधीन होत. मुंबईच्या लोकांना पावसात बस, लोकल बंद पडणे, कामावर गेलेली मंडळी अडकून पडणे हे काही नवीन नाही. शाळेत जाताना दुमजली (डबल डेकर) बसच्या वरच्या मजल्यावरच्या सर्वात पुढच्या सीटवर बसून समोरून येणाऱ्या पावसाच्या तुषारांचा आनंद लुटणे यासारखे दुसरे सुख नसावे. 

बाकी खऱ्या पावसाचा आनंद घ्यायला मुंबईकर मंडळी वरळी सीफेस, बॅण्डस्टॅण्ड, मरीन ड्राईव्ह अशा ठिकाणी हजेरी लावतात. भर पावसात उधाणलेल्या समुद्राच्या फूटच्या फूट उंच उडणाऱ्या लाटांच्या सानिध्यात मंडळी कधी कुटुंबासोबत तर कधी मित्र मंडळींसोबत बेभान होऊन जातात. मुंबईचा पाऊस म्हणजे खरंच एक रोमांचित करणारा अनुभव असतो. आमच्या पिढीने पावसाचे असे अनेक अनुभव घेतले. यापुढची पिढी मात्र आमच्या सारखी ये रे ये रे पावसा म्हणण्यापेक्षा “rain rain go away” असे म्हणण्यात खुश आहे असे वाटते. अशाने आयुष्यातल्या आनंद देणाऱ्या अविस्मरणीय क्षणांना मुकणार की काय अशी भीती नक्की वाटते.

No comments:

Post a Comment