उत्तररंग
लेखक : नारायण धारप
प्रकाशक :
समन्वय प्रकाशन
पाने : २३२
प्रकाशन : आवृत्ती सन २०१२
भाषा : मराठी
विमल अत्रे ही सुंदर, आकर्षक पन्नाशीतली विधवा असते. तारुण्यात वैधव्य आल्यावर
तिने आपल्या मुलांना मोठे केले आणि मार्गी लावले. जाण्यापूर्वी अत्रे साहेबांनी पैशाची
तरतूद करून ठेवलेली असल्याने पुनर्विवाह करून आपले स्वातंत्र्य घालवायची तिची तयारी
नव्हती. ती कधी त्या फंदात पडलीच नाही. मुले आपापल्या संसारात रममाण आहेत, विमलचे त्यांच्याशी
चांगले संबंध आहेत. आपल्या घरात विमल एकटी राहते. कर्मधर्मसंयोगाने एक दिवशी नाट्यगृहात
तिची गाठ संजय उपाध्येंशी (नाना) पडते.
त्यांची भेट नाटकाबरोबर संपेल का? ती सुखी आहे का? त्यांच्या घराचे लोक त्यांच्या
मैत्रीकडे कसे पहातील? त्यांना मान्यता मिळेल का?
विमल एकटी राहते. तिच्या दोन्ही मुलांची लागणे झाली आहेत आणि दोघे त्याच शहरात
राहतात. ते वेळोवेळी आईची मदत घेतात किंबहुना ती गृहीतच धरतात. पण वरचेवर आईला फोन
करावा, आईला भेटावे, तिला आराम करायला म्हणून बोलवावे असे काही त्यांना वाटत नाही.
नानांनी काही वर्षांपूर्वी, त्यांच्या सुनेच्या वागण्यामुळे, आपल्या मोठ्या मुलाला
वेगळे बिऱ्हाड थाटायला सांगितले होते. मधून अधून नाना त्यांना भेटायला जातात, पण ते
येत नाहीत. त्याचा धाकटा मुलगा उत्तरभारतात नोकरीला असतो.
दोघे एकटे आहेत, दोघांची आर्थिक स्थिती चांगली आहे. दोघे सुस्वरूप आहेत. दोघांनी
स्वतःला कसल्यातरी व्यापात गुंतवले आहे. पण तरीही त्यांच्या आयुष्यात एकटेपण आहे, एक
पोकळी आहे. सहचार्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली आहे. पाहता पाहता ठिणगी प्रज्वलित
व्हायला वेळ लागत नाही आणि ते एका निर्णयाप्रत येऊन पोहोचतात, मुलांसाठी जगण्यापेक्षा
स्वतःसाठी जगण्याच्या क्रांतिकारी निर्णयाप्रत.
ही सुखवस्तू कुटुंबातील लोकांची गोष्ट आहे, त्यांना पैशाची चणचण नाही. ही कथा उतारवयातील
एकटेपणा हा विषय हाताळते. एकटेपणात जेव्हा पर्याय निर्माण होतो तेव्हा तो मार्ग चोखाळला
जातो. यातून पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो परंतु संघर्ष हा या कथेचा विषय नाही
तो परिणाम आहे. लेखकाने कथा अतिशय सुबकतेने मांडली आहे. कथा प्रशंसा, आवड, मागणी, प्रेम,
मुलांचा विरोध, लग्न, विरोध मावळणे आणि शेवटी विनाशर्त मान्यता हे सर्व टप्पे पार करत
पैलतीरास पोहोचते. एखाद्याला ब्रूस टकमनच्या मॉडेलची आठवण झाली तर आश्चर्य वाटायला
नको. सगळे काही छान छान वाटू नये म्हणून लेखक एक खलनायिका आणतो. पण तिला थोडासाच वाव
मिळतो आणि तिचा कथेतील कार्यभाग संपतो. तिला अजून ठेवले असते तर आणखी नाट्य निर्माण
झाले असते.
ती एक व्यक्तिरेखा सोडली तर या कथेतील सर्वजण मूलतः चांगले आहेत. काहीजण म्हाताऱ्यांच्या
लग्नाच्या धास्तीने वाईट वागतात पण अंततः परत आपल्या चांगुलपणाकडे वळतात. हे एक कुटुंबनाट्य
आहे. यात फार तणाव नाही, अति भावनाक्षोभ नाही, फार थरार नाही, अति रोमांच नाही व मारामारी
किंवा लढाई देखील नाही पण तरीही हे पुस्तक आल्हाददायी आहे.
ही कथा आपल्याला विमल आणि नाना भेटतात त्या दिवसापासून ते त्यांची कुटुंबे खऱ्या
अर्थाने एक होतात त्या दिवसापर्यंतच्या प्रवासाला घेऊन जाते. कथा जरी वेगवान नसली तरी
ती कुठेही ढिली पडत नाही आणि त्यामुळे वाचकाचे लक्ष विचलीत तर होत नाहीच उलट त्यांना
गोडीच लागते.
विमलचे विचार, भावना आणि तिच्यातली स्थित्यंतरे लेखकाने आपल्या शब्द कुंचल्यात
चपखल पकडली आहेत. विमल आपल्यासमोर एक संवेदनाशील, सक्षम आणि बुद्धिमान पण आधाराची आणि
सहचर्याची गरज असलेली स्त्री म्हणून येते. नाना हे पटापट निर्णय घेणारे, आपल्याला काय
पाहिजे त्याची जाण असणारे यशस्वी उद्योजक असतात. काही वेळा ते विमल आणि स्वतः असे दोघांचे
निर्णय घेतात, विमलला ते आवडते. जर मला या पुस्तकाचा उत्तरार्ध किंवा दुसरा भाग लिहायचा
असेल तर मी या गोष्टीचा कथाबीज म्हणून वापर करेन.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका पुरुषाचा हात मेंदी काढलेल्या स्त्रीच्या हाताच्या
बोटात अंगठी घालताना दाखवला आहे. कथेचा भावार्थ एका चित्रात! परंतु हे हात तरुण माणसाचे
वाटतात, म्हाताऱ्यांचे नाही.
नारायण धारप हे भयकथा, गूढ कथा, थरार व विज्ञान काल्पनिका यांचे लेखक म्हणून ओळखले
जातात. त्यांच्या या शैली बाहेरील जी एका हाताच्या बोटावर मोजता येणारी पुस्तके आहेत
त्यातील हे एक आहे. आपण आपल्या खास शैली पलीकडे जाऊनही तितकेच चांगले लिहू शकतो याचा
धारप आपल्याला प्रत्यय देतात.
मी हे पुस्तक का वाचले? कल्पनारम्यते
पलीकडचे धारप आहेत तरी कसे
काय आवडले नाही? अति चांगुलपणा
काय आवडले? कथा व लेखन
शिफारस वाचनीय. जरूर वाचा.
मंदार
आपटे