Friday, September 8, 2017

श्रावण

     दिव्याच्या अमावास्येला लख्ख घासून पुसून स्वच्छ केलेल्या दिव्यांच्या प्रकाशात चाहूल लागायची ती पाऊसपैंजण बांधून रूणझुणत्या पावलांनी येणाऱ्या हसऱ्या, नाचऱ्या, लाजऱ्या श्रावणाची आणि त्याच्या ओंजळीतील उत्सवफुलांची मी इस्लामपूरसारख्या छोट्याश्या गावातली आणि पारंपारिक चालीरीती सांभाळणाऱ्या कुटुंबातील त्यामुळे प्रत्येक सण माझ्या माहेरी मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा... आजही त्याच्या नुसत्या आठवणींनीही fresh व्हायला होते 
      
         श्रावणी सोमवार शाळा दुपारी लवकर सुटयाचिम्हणून आम्हां मुलांना त्याचं खूप अप्रूप असायचे. आमच्या घराजवळ महादेवाचे देऊळ होते. अंघोळ झाल्यावर शाळेत जायच्या आधी compulsory महादेवाला जाऊन यायला लागायचं त्याशिवाय फराळाचे मिळायचे नाही. शेवटच्या सोमवारी शाळेला सुट्टी असायची. त्यामुळे शनिवारच्या शाळेनंतर दुपारच्या एस.टी ने आम्ही सांगलीला आत्याकडे जायचो. सांगलीजवळील हरिपूरला श्रावणी सोमवारी जत्रा भरायची. मग सोमवारी भल्यापहाटे उठून आंघोळी करून आमची वानरसेना डबे घेऊन चालत हरिपूरच्या दिशेने सुटायची. वाटेत चिंचेची, वडाची झाडे होती. मग चिंचा खत, पारंब्यांना झोके घेत हरिपूरला पोहोचायचं. त्या जत्रेत मिळणाऱ्या साखरेची चित्रे, पिपाण्या, पिसाच्या टोप्या, पायातल्या मासोळ्या, बांगड्या, रिबिनी, मण्यांच्या माळा यांचे खूप आकर्षण असायचे. देवळात बसून डबा खायचा, नदीचं थंड पाणी प्यायचे, जत्रेत फिरायचे, बोटिंग करायचे आणि संध्याकाळी टांग्याने पिपाण्या वाजवत सांगलीला परतायचे. दरवर्षी खरंतर हेच रुटीन असायचे पण त्यातील मजा कधी ही कमी नाही झाली.
           मंगळवारी मंगळागौरीचे वेध लागायचे. आमच्या घराच्या आवारात मोगरा, गुलाब, प्राजक्त, चाफा, पेरू, जांभूळ, सीताफळ अशी विविध फुल आणि फळ झाडे होती. त्यामुळे गल्लीतल्या जवळजवळ सगळ्या मंगळागौरींसाठी पत्री आणि फुले आमच्या आवारातून जायची. मला ही सोळा प्रकारची पत्री गोळा करायला खूप आवडायचे. एकतर त्यानावाखाली मनसोक्त भटकायला मिळायचे आणि वरून अभ्यासही करायला लागायचा नाही. शिवाय सोळा प्रकार जमावले की खूप काहीतरी साध्य केल्याचा आनंद मिळायचा. खरचं लहानपणी target, achievement च्या कल्पना किती सध्या आणि छोट्या असतात नाही, आणि मला वाटतं त्यामूळेच त्यातून मिळणारा आनंद निखळ आणि निरागस असतो.
संध्याकाळी देवीची आरती नंतर मुगाची खिचडी, कढी, पापड, मटकीची उसळ अश्या हलक्या जेवणानंतर विविध प्रकारच्या फुगड्या, झिम्मा, पिंगा, गोफ असे मंगळागौरीचे खेळ रंगायचे.खेळताना दमले की भेंड्या, विविध गुणदर्शन, उखाणे असे बैठे खे व्हायचे. यामध्ये पहाट कधी व्हायची कळायचेच नाही. मग चहा घेऊन सगळ्याजणी आपापल्या घरी परतायच्या. पूर्वी लग्न खूप लहान वयात व्हायची त्यामुळेच  मंगळागौरीच्या बहुतेक गाण्यातून सासुरवाशिणीच्या तक्रारी, नवपरिणीतेची थट्टा असते.मधल्या काळात VCR वर सिनेमा पाहूनही मंगळागौरीचे जागरण करायची फॅशन आली होती.
         श्रावणाला खेळगडी म्हटले तरी वावगे ठरू नये. करण मंगळागौरी प्रमाणेच नागपंचमीलाही खेळ रंगायचे. इतर खेळांबरोबर झाडांना बांधलेले झोके हे नागपंचमीचे विशेष आकर्षण असायचे.नागपंचमीला नागोबाला व्हायला लाह्या लागतात म्हणून मुद्दाम भट्टीतून लाह्या फोडून आणल्या जायच्या त्याच्याबरोबर खरे शेंगदाणे आणि फुटाणेही आणले जायचे.या भट्टीत फोडून आणलेल्या लाह्यांना एक वेगळीच चव असायची. फ्रॉकच्या खिशात भरलेल्या लाह्यांशेंगदाण्याची चव आजही ओठावर रेंगाळते आहे..
         महाराष्ट्रात नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेले बत्तीस शिराळा हे गाव इस्लामपूर पासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर होते.शिराळ्याला नागपंचमीला मोठी जत्रा भरायची त्यामध्ये नागांच्या विविध स्पर्धा, मिरवणूक ही मुख्य आकर्षणे होती. शिवाय गारुडी लोक घरोघरी टोपलीतून नाग घेऊन यायचे. त्याच्या हातातील पुंगीवर डोलणारा नाग आणि तो ज्या पध्दतीने नाग हाताळायचा ते पाहिलं की लहानपणी गारुडी मोठा हिरो वाटायचा. हे गारुडी लोक हक्काने घराघरातून साडीचोळी आणि कपडे मागून घ्यायचे . पुढे प्राणिसंरक्षण कायद्याने या नागांच्या स्पर्धा आणि नाग पकडण्यावर बंदी आली.
श्रावणातील अजून एक महत्वाचा सण म्हणजे राखीपौर्णिमा. मला भाऊ नसल्यामुळे दरवर्षी या सणाला मैत्रिणींना त्यांच्या भावांना राखी बांधताना पाहून खरतरं मनाला खूप रुखरुख वाटायची. नारळीभाताचा नैवेद्य देवाला दाखवला जायचा. त्यावेळी स्पंजच्या राख्या खूप चालायच्या. ह्या स्पंजचा वापर आम्ही नंतर पाटी पुसायला करायचो.
          दुसऱ्या दिवसापासून आमच्या इथल्या विठोबाच्या देवळात कृष्णजन्माचे कीर्तन सुरू व्हायचे. आजोबांबरोबर कीर्तनाला जायला खूप आवडायचे. त्यावेळी TV  चे एवढे फॅड नव्हते . त्यामुळे कीर्तनकार गीत, नाट्य आणि वक्तृत्व यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या कथा उभ्या करायचे. शिवाय हे क्रमशः असायचे त्यामुळे उद्या कुठली गोष्ट सांगणार याचीही उत्सुकता असायची. दहीहंडी दिवशी कीर्तनात दहीहंडी फोडली जायची.त्यानंतर प्रसाद म्हणून मिळणाऱ्या त्या मटकीतील गोपाळकाल्याची चव काही अनोखीच असायची.गावात दहीहंडीच्या स्पर्धा ही असायच्या त्यासाठी कित्येक हजारात बक्षिसे असायची गावोगावची गोविंदा पथके यात भाग घ्यायची. पुढे कायद्याने यावर बंदी आली. या विषयावर कान्हा नावाचा एक अतिशय सुंदर सिनेमा आहे गावाकडे श्रावण अमावास्येला बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्याला शेतीच्या कामात मदत करणाऱ्या त्याच्या सच्च्या मित्रविषयी बैलाविषयी आदर व्यक्त करायचा हा दिवस. या दिवशी त्याला कामाला जुंपता, छान न्हाऊमाखू घालायचे. शिंगे रंगवायची त्यांना झुली पांघरायच्या आणि त्यांची पूजा करून पुरणपोळीचा पहिला घास त्यांना भरवायचा.यावरती कवी यशवंतांची एक सुंदर कविता आहे

                    शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार                                        
 कुणाच्या शिंगांना बांधीयले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत
                  वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सण बैलपोळा ऐसा चाले

          खरच आपल्या संस्कृतीत आपल्याला मदत करणाऱ्या पशुपक्ष्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे सॅन आहेत. आणि त्याचा केंद्रबिंदू हा बळीराजा आहे उदा. नागपंचमी, बैलपोळा, नवान्न पौर्णिमा, वसुबारस. आजकाल whatsapp येणारे बैलपोळ्याचे जोक्स पाहिले की आपल्या कोत्या विनोदबुद्धीची खरच कीव करावीशी वाटते.या दिवशी संध्याकाळी बैलांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघायची..या सगळ्या धामधुमीत उत्सवराज श्रावण कधी संपायचा तेच कळायचं नाही तोपर्यंत गणपतीबाप्पांचे वेध लागायला सुरवात ही झालेली असायची.
     आजच्या Whatsapp व Facebook च्या Virtual युगात हे सगळे कुठंतरी हरवणार तर नाही ना अशी एक अनामिक हुरहूर सतत मनाला लागलेली असते.
                                    
-----विद्या भट 

     

No comments:

Post a Comment