Sunday, June 9, 2019

चित्रकला - कुमारी सारा पटवर्धन



चित्रकला - कुमार आयुश मनीष चिटणीस




कॅनव्हास चित्रकला - श्री अमित पाटील






Mobilography - श्री. मनोज करंदीकर

दुबई मिरॅकल गार्डन

















रोहतांग पास


कविता : अंगठा - सौ क्षमा आठवले



हरवेलेलं सापडलं - श्री. मनोज करंदीकर



मार्च २०१९ मध्ये पुण्याला सुट्टीला गेलो होतो. एका पूजेच्या निमित्ताने खूप जण जेवायला आले होते.
शेवटची पंगत आमची घरच्या मंडळींची होती. आमच्या बरोबर एका मामाची सून पण होती. ती श्रुती सडोलीकरांकडे गाणे शिकते. मग तिला गाण्याचा आग्रह झाला आणि गाणं संपल्यावर जेवायचं असं फर्मान निघालं. तिने "पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे" हे गाणं खूपच सुंदर म्हटलं. चांगलीच तयारी आहे गाण्याची. हे गाणे ऐकून सुट्टीचे पुढचे काही दिवस तेच गाणं गुणगुणण्यात गेले. अर्थात घरी कार्यक्रम व्हायचे तेव्हा या गाण्याची अक्षरशः उजळणी झालेली आहे.
इकडे परत आलो तरी पण मन त्या गाण्यातच. मग सुरु झाला तो आवडता प्रकार, एखादे गाणे/कविता रोज ऐकायची. आता तर गाणे ऐकणे वा गाणे बघणे खूपच सोप्पे आहे. गुगल मावशी किंवा युट्युब मावशी ला सांगायचं की आपले गाणे सुरु. २५-३० वर्ष मागे बघितलं तर फक्त रेडिओ आणि मग आलेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. खरं तर हे गाणे १९७९ च्या "सोबती" या चित्रपटातील. गीतकार - गंगाधर महाम्बरे, संगीतकार - श्रीनिवास खळे आणि गायिका- आशा भोसले. श्रीनिवास खळे यांच्याबद्दल आपण काय बोलणार? गाणे कसं सुंदर आणि श्रवणीय होईल हे त्यांचे तत्व. भीमसेनजी, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, अरुण दाते, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी खळे काकांकडे गाणी गायली आहेत. आपण सगळेच या सगळ्यांची गाणी ऐकताच मोठे झालोय. उदा: निज माझ्या नंदलाला, या चिमण्यांनो परत फिरा, सर्व सर्व विसरू दे, पहिलीच भेट झाली .............. ते अगदी जेव्हा तुझ्या बटांना पर्यंत.
"पाण्यातले पहाता" या गाण्याबरोबरच अजून दोन गाणी आहेत " सोबती" मध्ये. ती म्हणजे "आली आली सर ही ओली" आणि "सावलीस का कळे उन्हामधील यातना". तिन्ही गाण्याची नजाकत, बाज पूर्ण वेगळा आहे. आशा भोसले यांची दोन गाणी आणि एक साक्षात लता मंगेशकरांचे. गंगाधर महाम्बरे यांनी किती सुंदर रचना केल्या, त्याला उत्तम संगीत देऊन श्रीनिवास खळेंनी आपल्याला आनंद दिला. बरेच वेळा एखादा सिनेमा येऊन जातो कळत देखील नाही, पण त्यातील गाणी कायम लक्षात राहतात.
"सावलीस ना कळे" हे गाणे ऐकून तेच जाणवलं की आपण किती तरी वर्षांपासून ऐकत होतो पण आज तीच गाणी नव्याने सापडली. आज या निमित्ताने गीतकार, संगीतकार आणि गायिका अशा थोर मंडळींना सलाम.

लेखन - श्री. मनोज करंदीकर

माधुरी दिक्षित :१५ मे १९६७ - श्री मनोज करंदीकर


हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अभिनेत्रीचा विचार केला तर त्यात दक्षिण आणि उत्तर भारतीय जास्त आहेत.  दक्षिण म्हटलं तर वैजयंती माला, पद्मिनी, वहिदा ते अलीकडच्या शिल्पा शेट्टी पर्यंत. उत्तर भारतीय म्हटलं तर मीना कुमारी, नर्गिस पासून अगदी आताच्या अनुष्का पर्यंत. मराठी अभिनेत्री पण होत्याच, पण सुपर स्टार कोणी नव्हतं
१९८० ते १९९० या काळात खूप नवीन अभिनेत्री नावारूपास आल्या. त्यात महत्वाची नांवे म्हणजे श्रीदेवी, जयाप्रदा. यांच्या बरोबरच एक मराठी मुलगी हिंदी चित्रपटात काम करायला लागली होती. अबोध, स्वाती हे खूप सुरुवातीचे सिनेमे केल्यानंतर तिला संधी मिळाली "हिफाजत" मध्ये अनिल कपूर च्या समोर काम करायची (बटाटा वडा हे गाणे याच सिनेमातील). तेव्हा कोणाला माहित होतं कि पुढे या कलाकारा बरोबर जोडी जमेल आणि आपण मोठे स्टार होऊ. थोडा फार नाव होतं असताना एक अजून सिनेमा आला "दयावान", हा फिरोज खान बॅनरचा आणि त्याच्या खास स्टाईलचा. हा फेमस झाला तो अभिनया पेक्षा "आज फिर तुमसे प्यार आया है" या गाण्याने. हे सगळं सुरु होते, पण अजून यश म्हणजे काय ते मिळालं नव्हतं.  
१९८८ मध्ये एन.चंद्रा या मराठी दिग्दर्शकाने "तेजाब" सिनेमा तयार केला आणि त्यात मोहिनी हा रोल दिला  आणि एका दिवसात ती स्टार झाली. "एक दोन तीन…" या गाण्याने आणि तिच्या मनमोहक नृत्याने सगळयांना वेडे केले. हा सिनेमा चांगला, सगळे उत्कृष्ट कलाकार अनुपम खेर, अनिल कपूर, सुहास जोशी. जितकी गाणी चांगली तितकेच सुमधुर संगीत दिलाय एल.पी. नी.
तेजाब नंतर एक हुकमी एक्का म्हणून तिची घोडदौड सुरु झाली. "दिल" सिनेमाने तर तिला मोठं यश दिलं. राम लखन, परिंदा, खेल, किशन कन्हैया मध्ये अनिल कपूर बरोबर जोडी जमली.  "बेटा" सिनेमा आणि त्याची गाणी, प्रामुख्याने "धक धक करने लगा" या गाण्याने तर किती तरी जणांची धड धड वाढली. "साजन" चित्रपट हा प्रेक्षणीय आणि संगीतमय होता. उत्तम कथानकाच्या साथीला चांगले कलाकार, तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. एकेक सिनेमे करत असताना सुभाष घईंचा "खलनायक" आला, "चोली के पीछे क्या" या गाण्याला लोकांनी काय कपडे घातलेत आणि खूप लाजिरवाणे नृत्य म्हणून नांवे ठेवली. हा सिनेमा तिला खूपच महत्वाचा ठरला. यानंतर जॅकी बरोबर १०० डेज, संगीत, सचिन दिग्दर्शित "प्रेम दिवाने" आले. तसेच संजय दत्त सोबत ठाणेदार, १९९४ मध्ये सुरज बडजात्यांचा "हम आपके है कौन" या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीला चार चांद लागले. लगेच १९९७ ला यश चोप्रांच्या "दिल तो पागल है" संगीतमय सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. जर तिच्या सिनेमांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल. पण तिचे अजून काही चांगले रोल म्हणा किंवा सिनेमे आहेत, इलाका/प्रेमप्रतिज्ञा मिथुन बरोबर, अंजाम कोण विसरेल? लग्नानंतर केलेल्या देवदासचा पारोचा रोल केवळ लाजवाब.
कधी ती अभिनेत्री म्हणून तर कधी डान्सर म्हणून लक्षात राहिली. आपल्या सगळ्यांना तिचे काही गाणी डान्स जास्त आवडली ती म्हणजे, "तुमसे मिलके ऐसा लगा, हमको आज कल है इंतजार, बडा दुःख दिना तेरे लेखन ने, अठरा बरस की ते अगदी देवदास".
अशा या अभिनेत्रीला म्हणजेच " माधुरी दीक्षित" ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
१९६७ मध्ये अजून एका हॉलीवूड अभिनेत्रीचा जन्म झाला ती म्हणजे जुलिया रॉबर्ट्स. तिचं पण करिअर १९८७-९० या काळात सुरु झाले. मिस्टिक पिझ्झा, स्टील मॅग्नोलियास या सुरुवातीच्या चित्रपटानंतर १९९० मध्ये तिला भूमिका मिळाली ती "प्रेट्टी वुमन" ची. त्या भूमिकेचं जुलियाने सोन केलं. ती रातो रात स्टार झाली आणि मग एका पाठोपाठ एक माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग, एरिन, असे सुपर हिट सिनेमे दिले.
माधुरी आणि जुलिया या दोघींच्या बाबतीत हे साम्य. दोघीनींही मग काही काळ बॉलीवूड/हॉलिवूड वर राज्य केलं.

लेखन  - श्री मनोज करंदीकर

आपली मराठी... आपल्या म्हणी - सौ. विद्या भट


दिलेल्या अर्थाची म्हण ओळखा. अट एकच ती म्हणजे ही म्हण अ किंवा आ नेच सुरू झाली पाहिजे. .... चला तर मग लागा कामाला...

१.   गरज एका ठिकाणी असणे आणि मदत दुसरीकडे पोचवणे.

२. कसलीही मेहनत न घेता नशिबावर विसंबून राहणे.

३. चुकीच्या व्यक्तीशी केलेली मैत्री, प्रसंगी खूप धोकादायक ठरू शकते.

४. बुद्धिमान माणसालाही अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

५. जेव्हा एखाद्या माणसाकडून फायदा होणार असतो तेव्हा त्याच्याभोवती गर्दी जमा होते.

६. मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या आळसाला खतपाणी घालणारी परिस्थिती निर्माण होणे.

७. आपल्या भविष्याचे आपणच शिल्पकार असतो.

८. अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.

९. स्वतःची चूक मान्य न करता त्याचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणे.

१०. स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत मात्र न ठेवण्याची वृत्ती असणे.

उत्तरे:

१.  आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी

२. असेल हरी तर देईल खाटल्यावरी

३. असंगाशी संग प्राणाशी गाठ

४. अडला हरी गाढवाचे पाय धरी

५. असतील शिते तर जमतील भुते

६. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

७. आपला हात जगन्नाथ

८. आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

९. अग अग म्हशी मला कुठे नेशी

१०. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारटं

महाराष्ट्र माझा : विशेष गोष्टी - श्री. नरेंद्र कुलकर्णी


·         महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त रस्त्यांचे जाळे आहे - एकूण अंतर २,६७,५०० किमी.
·         महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (११२,३७४,३३३ - २०११ जनगणना) असणारे जगात केवळ १० देश आहेत.
·         १८८८ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
·         संपूर्ण विश्वातील खाऱ्या पाण्याचा एकमेव तलाव महाराष्ट्रात आहे - लोणार सरोवर.
·         नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील गुराखी गडावर दरवर्षी आगळेवेगळे गुराखी साहित्य संमेलन भरवले जाते.
·         नवापूर हे रेल्वे स्टेशन एकमेव असे स्टेशन कि जे दोन राज्यात विभागले गेले आहे - महाराष्ट्र आणि गुजरात.
·         महाराष्ट्रयीन जनता आयकर (इनकम टॅक्स) भरण्यात भारतात अग्रेसर आहे.
·         मुंबई, परळ, माझगाव, माहीम, कुलाबा, वरळी आणि छोटे कुलाबा या ७ बेटांनी मुंबई बनली.
·         २६०० ( डब्बे) - ३५०० (१२ डब्बे) जणांसाठी बनवलेली मुंबई ची लोकल, गर्दीच्या वेळो ५००० च्या वर लोकांना घेऊन जाते. रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. इस्राईल ची लोकसंख्या तेवढी आहे.
·         भारतामध्ये आरमार हि संकल्पना शिवाजी महाराजांनी पुढे आणली.
·         औरंगाबाद मध्ये एकूण ५२  दरवाजे (gates) होते. आता १७ शिल्लक आहेत.
·         बॅडमिंटन चा शोध ब्रिटिशांनी पुण्यात लावला. इतके कि त्याचे नाव पूना  (POONA) होते.
·         हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म पुण्याचा आहे.
·         महाराष्ट्रात एकूण ४२ वन्य जीव अभयारण्ये आहेत.
·         महाराष्ट्रात एकूण ३५० किल्ले आहेत. जे कधीतरी युद्धनीती साठी वापरले गेले.
·         विश्वातील सर्वात मोठे नियोजित शहर नवी मुंबई आहे.
·         देशाच्या २०% औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रातून होते.

Friday, June 7, 2019

कविता: जशी मला भावली - श्री. मंदार आपटे

१३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी या सणाच्या दिवशी अमृतसरच्या जालियनवाला बागेमध्ये सत्यपाल आणि सैफुद्दीन या क्रांतिकारकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या निशस्त्र भारतीयांवर ब्रिगेडियर जनरल डायरच्या आज्ञेवरून गुरखा रायफल्सने अमानुष गोळीबार केला. अपरिमित जीवितहानी झाली. भारतीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. डायर इंग्रजांसाठी हिरो ठरला आणि भारतीयांसाठी निर्दयी सैतान. त्यात रुडयार्ड किपलिंगने "डायर त्याच्या दृष्टीने त्याचे काम करत होता" असे वादग्रस्त विधान केले. उद्विग्न रवींद्रनाथ टागोरांनी "सर" हा ब्रिटिशांनी देऊ केलेला किताब धुडकावून लावला. असे म्हणतात की जालियनवाला बाग हत्याकांड इंग्रजांच्या भारतातल्या राज्याच्या शेवटची सुरुवात होती.
या एप्रिल मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाली. मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मानकरी कुसुमाग्रज यांनी या घटनेवर लिहिलेली कविता निवडण्याचे हेच प्रयोजन. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"
प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

कवितेची सुरुवात कुसुमाग्रज थेट येशू ख्रिस्तापासून करतात. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील बलिदानाची, त्याने सांडलेल्या रक्ताची आणि त्याने जगाला दिलेल्या प्रेम शांती आणि क्षमेच्या संदेशाची ते आपल्याला आठवण करून देतात. पण आज येशूच्या पताका (वारसा) ज्यांच्या हातात आहे ते, म्हणजे ब्रिटिश सरकार, मात्र निशस्त्रांच्या रक्त-मांसामध्ये बुडाले आहे. एकीकडे ते ब्रिटिशाना त्यांच्या उदात्त परंपरेची आणि शिकवणीची आठवण करून देत आहेत तर दुसरीकडे ते या शिकवणीपासून दूर गेल्याचे सांगत आहेत. या पंक्तीमध्ये ते खेद व्यक्त करत आहे.
एकीकडे कवी ब्रिटिशाना मर्द म्हणत आहे, पण हे मर्द मुला-बायकांवर गोळ्या चालवणारे मर्द आहेत असे उपहासात्मक विधान करत आहेत. निशस्त्रांवर गोळीबार करण्यात कसली मर्दुमकी? हा गोळीबार म्हणजे ब्रिटिशांचा पॅरानॉईया होता. या गोळीबारात त्यांना भारतीयांबद्दल (जरी निशस्त्र असले तरी) वाटत असलेली भिती प्रक्षिप्त झाली होती.
कवी देवाला देखील आवाहन करतो. पाला पाचोळ्या सारख्या पडलेल्या प्रेतांच्या राशी पाहून देवा तू देखील डोळे झाकुन घेतले असशील. हा अत्याचार, हे मरण तांडव, हा अन्याय देव देखील पाहू शकत नाही इतका भयानक होता. या देवाच्या आळवणीत आपल्याला कवीची कळकळ आणि तळमळ दिसते.
शेवटच्या पंक्तींमध्ये कवी विस्मय करतो आहे की ही घटना म्हणजे सैतानाची देवावर मात तर नसेल ना? इथे आपल्याला कवीचे नैराश्य दिसते. झाल्या घटनेबाबत आपण काही करू शकत नसल्याची उद्विग्नता दिसते, वैफल्य दिसते. आणि अगदी शेवटी कवी आपल्याला परत जेथून सुरुवात झाली त्या येशू ख्रिस्ताकडे घेऊन जातो आणि ही घटना ही येशूच्या काळजात आणखी एक जखम आहे असे म्हणतो.
या कवितेचे एक वैशिष्ट्य असे आहे की या कवितेत खेद आहे, राग आहे, असहाय्यता आहे, उपरोध आहे, उद्विग्नता आहे पण बदल्याची भावना किंवा प्रतिशोधाची मागणी नाही. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संदेशाची संपूर्ण अंमलबजावणी आहे. आजही भारतीय लोक ब्रिटिशांनी या घटनेची माफी मागावी अशी मागणी करत आहेत. आजही गांधीजींचा संदेश भारतीयांनी अंगिकारलेल्या आहे. पण आजही ब्रिटिश माफी मागायला तयार नाहीत. आजही ते येशूच्या वाटेवर चालायला तयार नाहीत. आजही त्यांनी येशूची शिकवण अंगिकारलेली नाही.