Saturday, November 16, 2019

आठवणींच्या गावी - श्री. संतोष राक्षे

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

झोपेतुन मला उठविण्या, केस कुरवाळील का आज कोणी
नको ना झोपु दे न थोडा वेळ, असा हट्ट पुरविल का कोणी
चेहरयावरुन हात मायेचा फिरवुन कपाळी, मऊसूत ओठ स्पर्शील का कोणी
ऊठ आता उशीर झालाय, असे म्हणुनी परत थोपटाविल का कोणी

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

तोंड धुता धुता पेस्टसह, ब्रश हाती देईल का परत कोणी
रखरखित झालेल्या कोमल हातांनी, अंघोळ घालेल का कोणी
मिटलेले माझे डोळे तरीही, दोन सुबक वेण्या घालेल का कोणी
बुटाची नाड़ी बांधता बांधता, लुसलुसित पोहे भरवेल का कोणी

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

माझ्या सगळ्या वेड्या प्रश्नांची, उत्तरे पुरवेल का मला कोणी
मेहंदीचे  हात माझे म्हणूनि, आपल्या हाताने वरण भात भरविल का कोणी
माझ्या अंगावर तिची बोटे उमटली, म्हणून स्वतःच रडेल का कोणी
गोड अंगाई ऐकवत कुशीत घेवुन, शांत झोपवेल का मला कोणी

आज का कोणास ठाऊक; आठवणींच्या गावी नेतेय मला कोणी

परिक्षेची वेळ - श्री. संतोष राक्षे

बरे झाले बाप्पा; उद्या पुन्हा येतेय परिक्षेची वेळ
परत घालीन मी; बुद्धि क्षमता आणि चातुर्याचा मेळ
तुम्ही  सारे रहा निश्चिन्त; नका करू जास्त विचार
कोणता का असेना पेपर; घेईन त्याचा नक्की समाचार

बाबा म्हणे भाषा; तर आई म्हणे गणितावर् जोर दे थोडा
कोणी म्हणे समाजशास्त्र; तर कोणी म्हणे भूगोल घालेल खोडा
शेवटी  मीच म्हणालो; आता सारे माझ्यावर तुम्ही सोडा
आता कुठेही अडणार नाही; माझ्या आत्मविश्वासाचा घोडा

दही साखर हाती देवून; आई लावेन माझ्या कपाळी चंदन
त्या अगोदर देवदर्शन; आणि आई बाबांना करीन वंदन
मी मात्र निर्धास्त आहे; मला न आता कसलांच घोर
कारण माझ्या मेहनतीच्या जोड़ीला; तुमच्या शुभेच्छा थोर

आमची दिवाळी - श्री. संतोष राक्षे


आमची दिवाळी खरं तर थोडी वेगळी होती,  छोट्या छोट्या आनंदाने ती भरभरून होती

मामाच्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या कौरव-पांडवांच्या भांडणांइतकी कठीण होती
कधी शेंडेफळ म्हणून आईच्या सोबतीने पदर पकडून जाण्याइतकी लडिवाळ होती
घरी बनविलेल्या पारंपरिक कंदीलाच्या प्रकाशाने चांदण्यांचेही डोळे दिपवणारी  होती
कधी फुलबाजे, पाऊस कधी फुसक्या फटाक्यांच्या दणदणीत आतिषबाजीची होती……. 
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

चाहूल येताच घर गोठा आणि तुळशी वृन्दावन सारखी सारवून स्वच्छ होती
कधी कानाकोपऱ्यातील नैराश्यपूर्ण जळमटे झटकून देत नवचैतन्याची होती 
फराळातील करंजीमधील सारणासारखी तर कधी लाडवासारखी माधुर्याची होती 
कधी खुशखुशीत चकली, आंबूस अनारशे कि झणझणीत चिवडा यांतील पेचाची होती ……….
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

सर्व भावंडाना मिळणाऱ्या एकाच ताग्यातील शर्टइतकी चौकटीत होती 
कधी पिस्तूल आणि टिकल्यासाठीच्या आजी आजोंबांच्या लाडागत वारेमाप होती
बाबांसोबत येणाऱ्या लवंगी-लक्ष्मीबारच्या आवाजासारखी धुमधडाक्याची होती
कधी एका पंगतीत गुण्यागोविन्दाने खाल्लेल्या फराळाइतकीच  साग्रसंगीत होती …………
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती

सकाळी चिरांत फोडल्यानंतर उटण्याचा ओवाळणीने सुंगंधी होती
कधी लक्ष्मीस्वरूप केरसुणीच्या मानाची तर गोमातेच्या ब्रम्हपूजनाची होती
बहिण भावाच्या त्या नात्यातील छोट्या भेटवस्तूही वाट पाहणारी होती
कधी शेतखळ् आणि घरात धनधान्याने भरलेल्या रांजनाएवढी समृद्ध होती ……..
तशी आमची दिवाळी खरंच थोडी वेगळी होती………….

भाऊबीजेच्या स्टीलच्या डब्यावर आपले नाव नाही म्हणून रुसण्याची होती 
कधी आईला पाडव्याला मिळालेल्या त्या लुगड्याच्या काठपदराइतकी भरजरी होती
आजोबांच्या कोऱ्या तलम रेशमी फेट्याइतकी रुबाबात मिरवणारी होती 
कधी वजरटीक पुतळ्यांच्या सुवर्ण अलंकारांनी आजीइतकीच सुरेख नटलेली होती  ………

तशी आज देखील साजरी केलेली हि दिवाळी देखील दिवाळीच आहे

आज देखील घरी  दिवाळीच्या  आठवणीत रमणारी आजोबा-आजी आहे 
सुखदुःखाच्या साथ देणाऱ्या आप्तांची मित्रांची निर्धास्त साथ आहे
आई बाबा आणि  वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाचा आम्हांला मान आहे   
काळाच्या ओघाने बदललेल्या संस्कृतीची आम्हांला आजही जाण आहे ……

ती दिवाळी वेगळी मान्य…. तरीही आजची दिवाळी देखील आगळी वेगळी आहे

श्री. संतोष राक्षे  


गणेशोत्सव २०१९ - श्री. मनोज करंदीकर




आपल्या सगळ्या भारतीयांचा, प्रामुख्याने मराठी माणसांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. आपण सगळेच हा सण - उत्सव आप -आपल्या परीने आणि पद्धतीने साजरा करत असतो. 

मला गणपती म्हटलं कि महाड ची आणि कोकणची आठवण होतेच. फक्त गणपती नाही तर श्रावण महिना सुरु झाल्यापासून येणारे सगळेच सण-व्रते, सगळ्या गावांत आजही उत्साहाने साजरी केली जातात. महाडला असताना गणपतीच्या आधी ७-८ दिवस घरात साफसफाई, झाडलोट सुरु व्हायची. गावामध्ये घरातील भांडी घासून पुसून स्वच्छ करून ठेवणे हे तर मोठे काम असायचे. त्यात ती चकाकणारी तांब्या पितळ्याची भांडी अशी एकत्र लावून ठेवलेली दिसली कि जाणवायचं सणांचे दिवस जवळ आलेत. त्यावेळी दागिन्यांपेक्षा घरातील भांडी हे भांडवल होते. आज घरातील साफसफाई ही व्हॅक्युम क्लिनर ने आणि ज्याला झाडू पोचा म्हणतात त्या मॉप नी होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सगळ्या सुविधा हाती असताना सुद्धा २ बीएचके किंवा ३ बीएचके घरांची झाडलोट करताना दमछाक होते, तर या लोकांनी मुले, सूना, नातवंडे घरी येणारं म्हणून कसं काय केलं असेल? दारी अंगणात सारवणे त्यावर रांगोळी, घराच्या भिंती सारवणे ही सुरुवातीच्या काळातील कामे बघितली आणि केलीही आहेत. घर सुधारले तसे लादी- फरशी धुणे, घराला रंग लावणे अशी कामे व्यवथित सुरु असायची. गावातले लोक सांगायचे आणि आजही सांगतात की आमच्या कडे पैसे जास्त नव्हते पण हाकेला माणूस हजर राहायचा. हीच त्या लोकांची खरी कमाई होती. एवढंच नाही तर घरी आलेल्या पै पाहुण्यासाठी फराळाचे पदार्थ करून ठेवले जायचे. 
हरितालिका पूजनापासून सुरु होऊन गौरींबरोबर विसर्जन असा पाच दिवसांचा गणेशोत्सव. बाप्पांचे वाजत गाजत आगमन, भल्या पहाटे पूजा, घरोघरी आरत्या. खास गणपती साठी मिळणारी फळे, केवडा, अत्तर, अगरबत्ती, या सगळयांनी वेगळेच असे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळायचे. आकर्षण असायचे ते या दिवसांत होणारे विविध कार्यक्रम, आज प्रसिद्ध असलेले  "बाल्या नृत्य", भजनी मंडळे, सार्वजनिक मंडळांच्या लेझीम मिरवणुका, रस्त्यावर सिनेमा बघणे. आज सगळ्या स्वीट मार्ट मध्ये प्रसादासाठी अनेक पदार्थ मिळतात, पण खोबरे आणि साखर मिसळून केलेली खिरापत एकदम आठवते.

आज नोकरी निमित्त इकडे असल्यामुळे काही वर्षे आमचा गणेशोत्सव इथेच साजरा होतोय. एक वेगळा आनंद, अनुभव मिळतो. सुरुवातीला असे वाटायचे की सगळ्या गोष्टी मिळतील का नाही? पण बाप्पाना काळजी किंवा देव सगळे व्यवस्थित करून घेतो, तसे काहीच अडले नाही. तीच स्वच्छता मोहीम, तेच पूजा साहित्य,  विड्याची पाने ते कमळापर्यंत सगळेच उपलब्ध असते. अगदी घरोघरी गणपतीची स्थापना होत नाही, पण त्यामुळे ज्यांच्या कडे गणपती आहे तिथे दर्शनाला जाणे हा खास कार्यक्रम असतो. या वर्षी गणपतीच्या पाच दिवसात साधारणतः १००-१२५  नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येऊन गेले. एका संध्याकाळच्या आरतीला ४०-४५ जण होते.  यावर्षीचा गणेशोत्सव लक्षात राहण्यासारखा आणि आनंदात साजरा झाला. आपल्या मंडळाच्या टॅगलाईन प्रमाणे जयतु जन्मभूमी  जयतु  कर्मभूमी,  आपण कुठे ही असलो तरी हे सगळे यथा शक्ती करायला मिळणे आणि त्या निमित्ताने एवढी माणसं घरी येणे हा अनुभव खूप काही देऊन जातो.  

गणपती बाप्पा मोरया.


दिवाळी आठवणीतली: सौ. नम्रता नितीन देव


आनंद घेऊनि आली दिवाळी दिवाळी 
       करता स्वागत तियेचे मन गेले भूतकाळी 
बालपणीचा तो काळ होता फारच सुखाचा 
         नव्हता फार थाटमाट छोट्या छोट्या आनंदांचा 
पडता सुट्टी दिवाळीची वेध लागती किल्ल्यांचे 
          मोहरीची छोटी शेते आणि मातीच्या मावळ्यांचे    
 फराळाच्या तयारीची चाले धांदल आईची 
          खर्च आणि बोनसची गणिते चालती बाबांची 
फटाक्यांच्या वाट्यासाठी लुटुपुटुची भांडणं  
             आईच्या हाताखाली खमंग फराळ रांधणं 
नसे फार लखलखाट मंद पणत्यांचे तेवणे 
                रांगोळीच्या त्या रंगांनी सारी रंगती अंगणे 
कुडकुडत्या थंडीत अभ्यंगस्नानाला उठणे
               बंबातले उष्ण पाणी आणि सुगंधी उटणे 
फराळाच्या तबकांची चाले शेजारी देवघेव 
             ती जपलेली नाती पिढ्यापिढ्यांची आहे ठेव 
अशी साधेपणातच दिवाळी साजरी व्हायची 
              संस्कृती आणि परंपरा अशी जपली जायची 

सौ .नम्रता नितीन देव

आमच्या घरी आली दिवाळी - कु. पावनी प्रसाद बारटक्के