आपल्या सगळ्या भारतीयांचा, प्रामुख्याने मराठी माणसांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. आपण सगळेच हा सण - उत्सव आप -आपल्या परीने आणि पद्धतीने साजरा करत असतो.
मला गणपती म्हटलं कि महाड ची आणि कोकणची आठवण होतेच. फक्त गणपती नाही तर श्रावण महिना सुरु झाल्यापासून येणारे सगळेच सण-व्रते, सगळ्या गावांत आजही उत्साहाने साजरी केली जातात. महाडला असताना गणपतीच्या आधी ७-८ दिवस घरात साफसफाई, झाडलोट सुरु व्हायची. गावामध्ये घरातील भांडी घासून पुसून स्वच्छ करून ठेवणे हे तर मोठे काम असायचे. त्यात ती चकाकणारी तांब्या पितळ्याची भांडी अशी एकत्र लावून ठेवलेली दिसली कि जाणवायचं सणांचे दिवस जवळ आलेत. त्यावेळी दागिन्यांपेक्षा घरातील भांडी हे भांडवल होते. आज घरातील साफसफाई ही व्हॅक्युम क्लिनर ने आणि ज्याला झाडू पोचा म्हणतात त्या मॉप नी होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सगळ्या सुविधा हाती असताना सुद्धा २ बीएचके किंवा ३ बीएचके घरांची झाडलोट करताना दमछाक होते, तर या लोकांनी मुले, सूना, नातवंडे घरी येणारं म्हणून कसं काय केलं असेल? दारी अंगणात सारवणे त्यावर रांगोळी, घराच्या भिंती सारवणे ही सुरुवातीच्या काळातील कामे बघितली आणि केलीही आहेत. घर सुधारले तसे लादी- फरशी धुणे, घराला रंग लावणे अशी कामे व्यवथित सुरु असायची. गावातले लोक सांगायचे आणि आजही सांगतात की आमच्या कडे पैसे जास्त नव्हते पण हाकेला माणूस हजर राहायचा. हीच त्या लोकांची खरी कमाई होती. एवढंच नाही तर घरी आलेल्या पै पाहुण्यासाठी फराळाचे पदार्थ करून ठेवले जायचे.
हरितालिका पूजनापासून सुरु होऊन गौरींबरोबर विसर्जन असा पाच दिवसांचा गणेशोत्सव. बाप्पांचे वाजत गाजत आगमन, भल्या पहाटे पूजा, घरोघरी आरत्या. खास गणपती साठी मिळणारी फळे, केवडा, अत्तर, अगरबत्ती, या सगळयांनी वेगळेच असे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळायचे. आकर्षण असायचे ते या दिवसांत होणारे विविध कार्यक्रम, आज प्रसिद्ध असलेले "बाल्या नृत्य", भजनी मंडळे, सार्वजनिक मंडळांच्या लेझीम मिरवणुका, रस्त्यावर सिनेमा बघणे. आज सगळ्या स्वीट मार्ट मध्ये प्रसादासाठी अनेक पदार्थ मिळतात, पण खोबरे आणि साखर मिसळून केलेली खिरापत एकदम आठवते.
आज नोकरी निमित्त इकडे असल्यामुळे काही वर्षे आमचा गणेशोत्सव इथेच साजरा होतोय. एक वेगळा आनंद, अनुभव मिळतो. सुरुवातीला असे वाटायचे की सगळ्या गोष्टी मिळतील का नाही? पण बाप्पाना काळजी किंवा देव सगळे व्यवस्थित करून घेतो, तसे काहीच अडले नाही. तीच स्वच्छता मोहीम, तेच पूजा साहित्य, विड्याची पाने ते कमळापर्यंत सगळेच उपलब्ध असते. अगदी घरोघरी गणपतीची स्थापना होत नाही, पण त्यामुळे ज्यांच्या कडे गणपती आहे तिथे दर्शनाला जाणे हा खास कार्यक्रम असतो. या वर्षी गणपतीच्या पाच दिवसात साधारणतः १००-१२५ नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येऊन गेले. एका संध्याकाळच्या आरतीला ४०-४५ जण होते. यावर्षीचा गणेशोत्सव लक्षात राहण्यासारखा आणि आनंदात साजरा झाला. आपल्या मंडळाच्या टॅगलाईन प्रमाणे जयतु जन्मभूमी जयतु कर्मभूमी, आपण कुठे ही असलो तरी हे सगळे यथा शक्ती करायला मिळणे आणि त्या निमित्ताने एवढी माणसं घरी येणे हा अनुभव खूप काही देऊन जातो.
गणपती बाप्पा मोरया.
No comments:
Post a Comment