Sunday, October 3, 2021

चित्रकला----स्वानंद नाईक

 


चित्रकला…..:-पियुष धनजंय शितोळे

 


तिचा श्रावण---सौ .नम्रता नितीन देव

 


तिचा श्रावण

 

बारा मासात श्रावण 

तिच्या मनाच्या जवळ 

ऊन -पावसाचा त्याचा खेळ 

तिच्या सुख-दुःखाशी घाली मेळ 

 

बालपणीचा श्रावण 

कागदी होडीतून येतो 

इंद्रधनूच्या रंगात 

तिचे तारुण्य रंगवतो 

 

पंचमीच्या झुल्यावर 

तिला झोका झुलवितो 

भोवती नागांची वारुळे 

त्याची जाणीवही देतो 

 

मग साजण होऊन 

श्रावण बरसतो 

तिच्या लाजऱ्या मनात 

प्रेमांकुर फुलवतो 

 

सासरच्या वळणावर 

डोळ्यांमधून सांडतो 

सणासुदीला प्रेमाने 

तिला माहेरी धाडतो 

 

जसा श्रावण धरणीला 

हिरव्या रुजव्याने सजवितो 

तिचा गर्भ तिच्या सृजनाचे 

तेज अंगभर देतो 

 

असा हा श्रावण 

तिला सतत भेटतो 

आयुष्याच्या वैशाखात 

हिरवळ फुलवतो 

 

सौ .नम्रता नितीन देव  

 

श्रावण सर---डॉ. पल्लवी बारटके

 

श्रावण सर

पल्लवी बारटकेडॉ. 

निळ्या निळ्या आस्मानीतून

डोकावति मेघ गहिरे जरासे

चाहूल पावसाची लागे

मन मनीच उल्हासे

चिंब चिंब न्हाली धरणी

आली श्रावणाची सर

गंधली भूमी, शिंपले अत्तर अत्तर

दवबिंदुंचा रत्नहार लेऊनी, पानपालवी मिरवे

रविकिरणांच्या साथीने, इंद्रधनू ही हासे

निसर्गाची ही अद्भुत किमयागारी

पुन्हा पुन्हा मोहरे तनू सारी

हळूच येऊन वारा मज गेला स्पर्शूनि

आठवांच्या कवेत तुझ्या गेला सुखावूनि.

 

बालपणीच्या आठवणींतला श्रावण---- डॉ. प्रसाद बारटके

 

बालपणीच्या आठवणींतला श्रावण

 डॉ.  प्रसाद बारटके

 

“श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”

श्रावण म्हटलं कि बालकवींची ही कविता ओठांवर येतेच येते आणि मनात दाटून येतात बालपणीच्या असंख्य रम्य आठवणी. ही कविता म्हणजे नुसतेच शब्द किंवा भावना नसून श्रावण महिन्यात असणाऱ्या कुंद आणि आल्हाददायक वातावरणाचे यथार्थ वर्णन आहे. कधी कधी लख्ख उन अन् मधूनच बरसलेल्या जोरदार सरी असा ऊन-पावसाचा लपंडाव म्हणजे श्रावण तर कधी अचानक aहोणारा ऊन पावसाचा संगम म्हणजेच निसर्गाचा इंद्रधनुरुपी चमत्कार दाखवणारा श्रावण. नववधू प्रमाणे हिरवा शालू नेसून रंगीबेरंगी फुलांचा गजरा माळलेली धरा म्हणजे श्रावण. असं हे अत्यंत मोहरून टाकणारं, मनाला नवी ऊर्जा देणारं वातावरण म्हणजे श्रावण. मंडळी आपण यु... मध्ये अत्यंत शुष्क अशा वातावरणात राहत असलो तरी श्रावण महिन्याचे हे वर्णन वाचताना गेलात ना तुम्हीसुद्धा तुमच्या आठवणीत आणि तेही तुमच्या बालपणात.

मला अजूनही आठवतं की शाळेत असताना श्रावण महिन्याची आम्ही वर्षभर वाट बघायचो. त्याचं एक कारण म्हणजे दर श्रावणी सोमवारी, आमची शाळा अर्धा दिवस असायची. शाळेच्या बाहेर लागणारा अर्धा दिवस सुट्टीचा फलक आजसुद्धा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यानंतर होणारा आनंद हा शाळा लवकर सुटून खूप सारी मज्जा करता येईल ह्या विचारांनी असायचा आणि त्याच विचारांमध्येच शाळेचा अर्धा दिवस कसा भुर्रकन संपायचा हे समजायचे नाही.

 हा आनंद द्विगुणित व्हायचा तो श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमी, मंगळागौर, बैलपोळा, रक्षाबंधन,  नारळीपौर्णिमा, दहीहंडी अशा विविध सणांनी. श्रावणी सोमवारी, शुक्रवारी घरातल्यांचे उपवास, साबुदाणा खिचडी, रताळ्याची खीर व अन्य  गोड गोड खाणी ह्या सर्वांमुळे मला श्रावण महिना हा जणू काही सणांचा राजाच आहे आणि तो कधीच संपू नये असे वाटायचे.

श्रावणात  विविध सण उत्सवांच्या निमित्ताने बेल, आघाडा, दुर्वा,  केतकी,  मोगरा,  जास्वंद, रुई हिरडा,बेहडा अशा आरोग्यदायी वनस्पतींची ओळख झाली व निसर्गाबद्दल आपसूकच आत्मीयता निर्माण झाली. .

आम्ही लहानपणी दादरला राहायचो आणि दहीहंडीच्या दिवशी सकाळी पोटपूजा करून आमची स्वारी निघायची दादर रेल्वेस्टेशनकडे असलेल्या  ideal बुक डेपो किंवा छबिलदास शाळेच्याजवळ. तिथे जाऊन एखादा छानसा कोपरा पकडून एखाद्या इमारतीच्या खाली दहीहंडी बघायला उभे राहायचे.  ह्या ठिकाणची अशी खासियत असायची कि एकाच वेळेला एकाच रांगेत सलग तीन ते चार हंडया लागलेल्या असायच्या आणि एकाच ठिकाणावरून अनेक दहिहंड्याचे  थरार एकाचवेळी अनुभवता यायचे. मला अजूनसुद्धा ती सहा-सात थर लावत असतानाची कसरत आणि दहहंडी यशस्वीरित्या फोडल्यानंतर  नाशिक बाजावरती सर्व गोपाळांनी केलेला बेधुंद नाच डोळ्यासमोर येतो.

श्रावणातला एक भावनिक सणजो बहीण-भावाचे प्रेमळ नाते अधोरेखित करतो तो म्हणजे राखीपौर्णिमा. आमच्या बहिणाबाईनी आम्हाला राखी बांधल्यावर आम्ही सुद्धा एक छोटीशी कॅडबरी किंवा वडिलांनी दिलेले पैसे ओवाळणी म्हणून देते असू. त्या दिवशी भाऊ म्हणून रुबाब जास्त असतो. खरी गंमत तर शाळेत यायची. आमचे हात आमच्या मैत्रिणी वजा बहीणींकडून राख्यांनी भरून जायचे. कोणाचा हात किती राख्यांनी भरलेला आहे ह्यावरून त्याची शाळेतील लोकप्रियता दिसून येते असा आमचा समाज असायचा. पण त्यातच कोणी कोणाला मुद्दाम राखी बांधली आणि काटा काढला अशा खमंग चर्चा मग आम्हा मुलांच्यात बरेच दिवस चालायच्या.

श्रावणाच्या अशा भारावलेल्या दिवसात बाजारपेठादुकाने, गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी सजू लागायच्या. आम्हीसुद्धा गणपतीच्या सुट्टीत, रोह्याला म्हणजेच आमच्या गावी कधी एकदा जातोय याची आतुरतेने वाट पाहायचो आणि त्यातच श्रावण महिना कधी संपला हे समजायचेच नाही.

 

Saturday, October 2, 2021

MMAD_गणेशोत्सव २०२१

 


गणपती आरास - मखर २०२१----श्री. महेंद्र गाडगे

 



गणपती आरास - मखर २०२१----सौ. क्षमा कस्तुरे

 










गणेशोत्सव २०२१---सौ .नम्रता नितीन देव

 

गणेशोत्सव २०२१

 

विघ्नहारी विघ्नहर्त्या 

विघ्न हराया या 

संकट साऱ्या जगतावरती 

ते निर्दाया या ll  

रोगराईचे संकट साऱ्या 

जगतावरती आले 

राजा असो वा रंक त्याने 

ना कोणा सोडले 

उपाय सारे हरले आता 

तुम्ही सोडवा या ll 

कसे करावे स्वागत तुमचे 

बंधन अवती भवती 

मुखावरही बंधन असता 

कशी करू आरती 

या साऱ्या बंधनांतुनी 

मुक्ती द्याया या ll 

आशा एकच येता तुम्ही 

संकटे सारी हरतील 

उत्साहाने आनंदाने 

पुन्हा सारे जगतील 

आशावादी तव भक्तांना 

आशिष देण्या या ll 

बुद्धीदात्या तुम्हामुळे  

लसीचे कवच आम्हा लाभले 

आगमन झाले तुमचे 

आणि प्रत्यक्ष दर्शनही घडले 

निरोप घ्यावा पुढल्या वर्षी 

वाजत गाजत या ll 

 

सौ .नम्रता नितीन देव 

 

चित्रकला----स्वानंद नाईक

 


चित्रकला…..:- धृति आशिष देहणकर

 


आठवण____अबू धाबीतला पहिला गणेशोत्सव (१९७८)__श्री. रसिक शेलवनकर

 

अबू धाबीतला पहिला गणेशोत्सव (१९७८)


१९७८ मध्ये अबू धाबी मध्ये महाराष्ट्र मंडळाच्या पहिल्या गणेश स्थापनेची आठवण 

१९७८ साली गणेशोत्सवाचे सुरुवातीला सर्वात आधी ही छोटीशी पत्रिका स्क्रीन प्रिंटिंग करून गिरगावातून मागवली होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी अबुधाबीत एकमेकांना तोंडी निरोप देऊन वर्गणी गोळा करण्यात साधारण महिना गेला. गणेशोत्सवाची एकूण वर्गणी दिरहाम ३०००/- जमली होती.

१९७८ मध्ये अबू धाबी मध्ये महाराष्ट्र मंडळाच्या पहिल्या गणेश स्थापनेची आठवण  म्हणून त्यावेळचे काही फोटो पाठवत आहे.

रसिक शेलवनकर

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी चे ज्येष्ठ सभासद






महाराष्ट्र मंडळ अबुधाबी: परंपरा 45 वर्ष गणेशोत्सवाची----श्री. प्रशांत कुलकर्णी

 

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी: परंपरा 45 वर्ष गणेशोत्सवाची

परदेशात दोन मराठी माणसे एकत्र आली की ते पहिल्यांदा एक संस्था काढतात.त्याला महाराष्ट्र मंडळ आणि त्या गावाचे नाव देऊन आपले कार्य चालू करतात.बाकीचे कार्यक्रम होवो न होवोत पण गणेशोत्सव मात्र नक्की साजरा करतात.अबुधाबी मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्यालाही आता 45 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

सत्तरच्या दशकात मराठी माणसाने पोटापाण्यासाठी देशांतर करायला सुरुवात केली.उच्च शिक्षण आणि चरितार्थासाठी काही जणांनी आधीच अमेरिका,इंग्लंड ची वाट धरली होती. तर केवळ नौकरी साठी आखाती देशानी आपली दारे उघडली होती.केरळ सारख्या राज्यातील लोकांनी भारतातल्या आपल्या नोकऱ्या सोडून इकडे यायला सुरुवात केली.सुट्टीवर आल्यावर त्यांच्या तिथल्या सुरस कथा ऐकून हळूहळू मराठी माणसाचे कुतूहल जागे होत  इकडे येण्याची मानसिक तयारी होत होती.

अशा वेळी अबुधाबी मध्ये अबुधाबी विमानतळ बांधण्याचे काम लार्सन अँड ट्युबरो ला मिळाले .भारतात L & T त काम करणाऱ्या मराठी माणसांना डेप्युटशन वर अबुधाबीला यायची संधी मिळाली.

इथेच त्यांना नौकरी निम्मित आलेली  चार मराठी माणसे भेटली .नौकरी नंतर च्या वेळात भेटीगाठी होऊ लागल्या आणि अनौपचारिक दृष्ट्या मंडळाची स्थापना झाली. मग गणेशोत्सव साजरा करण्याची करण्याची कल्पना काहींच्या डोक्यात आली.

पण सर्वात मोठा प्रश्न होता तो गणेशाची मूर्ती कशी  आणायची हा.एअर इंडिया तील अधिकाऱ्यानी भारतातून  मूर्ती आणून द्यायला मदत केली .एअर इंडिया ची ही साथ पुढची 20-25 वर्षे  दुबईत मंदिरा जवळच्या दुकानात गणपती च्या मूर्ती मिळेपर्यंत कायम होती.दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मूर्ती चा प्रश्न यायचा आणि त्यावेळी जुलै ऑगस्ट मध्ये भारतात सुट्टी वर गेलेल्या फॅमिलीवर ही जबाबदारी दिली जायची.फॅमिलीवर यासाठी की फॅमिली बरोबर असली तर अबुधाबी एअरपोर्ट वर सामानाची जास्त तपासणी व्हायची नाही.मुंबईहून  एका आंब्याच्या वा तत्सम पेटीत थर्माकोल चे तुकडे वा कुरमुरे मूर्तीच्या आसपास भरून ती मूर्ती सुरक्षित पणे पॅक करायची आणि इथे एअरपोर्ट वरून बाहेर काढायची ही मोठी कसरतच होती.मुंबईहून ती मूर्ती लगेज मध्ये न टाकता 'हॅण्डबॅगेज'म्हणून जवळ ठेवायला परवानगी मिळायची पण अबुधाबी त स्क्रिनिंग च्या वेळी टेन्शन यायचे .अशावेळी एअर इंडिया चे कर्मचारी मदतीला धावायचे आणि मूर्ती घेऊन येणाऱ्या कुटुंबाला विमानतळावरील ओळखीतून सही सलामत बाहेर काढायचे.विमानतळा बाहेर मूर्ती येईपर्यंत चिंतेत उभे असलेल्या कार्यकर्त्याच्या जीवात जीव नसायचा.एकदा का ती मूर्तीची पेटी हातात आली की जीव भांड्यात पडायचा.मूर्ती सुखरूप बाहेर आली की एअर इंडियाच्या माणसाबरोबर नेत्र पल्लवी चे इशारे व्हायचे आणि डोळ्यातले थॅंक्यु चे भाव सर्व काही सांगून जायचे.

      मूर्ती चे आगमन झाल्यावर दुसरा प्रश्न स्थापना कुठे करायची हा असायचा.सुरवातीच्या कालखंडात इंडिया सोशल सेन्टर मध्ये स्थापना होत होती, पण एकेवर्षी भारतात सांप्रदायिक दंगली झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून ISC ने गणपती स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली.त्यानंतर बाप्पाला ISC मध्ये पुनरागमनासाठी तब्बल तीन दशके वाट पाहावी लागली.पण त्यावर्षी ISC ने अगदी शेवटच्या क्षणी नकार  दिल्यावर सर्वांची धावपळ झाली आणि एका कार्यकर्त्याच्या घरीच गणपतीची स्थापना झाली.त्यानंतर 2010 पर्यंत गणपती बाप्पा अनेकांच्या घरी असे विराजमान झाले.त्यावेळेस गणपती स्थापनेसाठी जागेची फक्त एकच अट असायची ती म्हणजे ज्याच्याघरी स्थापना करायची तो जास्तीत जास्त पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर राहणारा असावा.ही अट अशासाठी की दर्शनाला येणारा भक्तगण हा सहजपणे जिन्यातून  ये जा करू शकेल. जेणेकरून त्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होऊन त्यांनी पुढे तक्रार करू नये.दर्शनासाठी येणारे भक्तगण हे नुसते मराठी समुदायापुरते मर्यादित नव्हते तर गुजराती,सिंधी,तामिळ,कानडी असे सर्व प्रकारचे गणेशा वर श्रद्धा,भक्ती असलेले लोक असायचे. फारशी पब्लिसिटी न करताही त्यांना यावेळेस गणपती कुठे आहेत याचा पत्ता लागायचा आणि संध्याकाळी गर्दी व्हायची.

दरवर्षी गणपतीची जागा बदलत राहायची.त्यानंतर लागोपाठ चार पाच वर्षे मनोज धुत यांच्या टुरिस्ट क्लब मधील घरात गणपतीची स्थापना झाली.त्यानंतर बी आर शेट्टींनी आपल्या फूडलॅन्ड रेस्टॉरंट च्या दुसऱ्या मजल्यावरील जागा कैक वर्ष मंडळाला दिली.यासर्व ठिकाणी संध्याकाळची गर्दी आटोक्यात ठेवण्याचे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत असे निभावले आहे की आजही बाहेरची माणसे मंडळाच्या crowd मॅनेजमेंट चे कौतुक करतात.

          सुरवातीच्या काळात मंडळात पूजा सांगायला भटजी चा शोध घ्यावा लागे. अशावेळी काही हिंदी भाषिक भटजी  देखील पूजा सांगायला चालायचे.पण नव्वद च्या दशकात गुरुदत्त जोशी नावाचे शास्त्रशुद्ध पूजा सांगणारे भटजी मंडळाला लाभले आणि पुढील दहा वर्षे निर्विघ्नपणे गणपतीची पूजा पार पडली .पुढे 'आडीया' मध्ये नौकरी करणारे जोशी नव्याकोऱ्या मर्सिडीज मधून पूजा सांगायला दुबई अबुधाबी ला जाऊ लागले आणि आमची कॉलर ताठ झाली.त्यानंतर आजतागायत धनंजय मोकाशी आणि नरेंद्र कुलकर्णी यांनी ही जबाबदारी यथोचित पार पाडली आहे.

       एकेवर्षी गणपतीची मूर्ती भारतातून आणणे शक्य झाले नाही तेव्हा मंडळाच्या  गायडोळे नी  त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या फिलिपीनो कलीग कडून गणपती चा फोटो दाखवून हुबेहूब तशीच मूर्ती करवून घेऊन मोठा प्रश्न सोडवला होता.(काही शंकेखोरांना मूर्तीची सोंड फिलिपीनो नाकाप्रमाणे थोडी चपटी वाटली होती हा भाग वेगळा!)

     2010 नंतर  बी आर शेट्टींच्या साह्याने बाप्पाची स्थापना परत ISC च्या मोठया सभागृहात व्हायला सुरुवात झाली जी प्रथा आजतागायत सुरू आहे.

       अबुधाबी मंडळाच्या गणेशोत्सवाचे वर्णन करताना त्याच्या सजावटीचा,मखराचा उल्लेख झाला नाही तर ते वर्णन अधुरे राहील.नव्वदच्या दशकात गजाभाऊ वऱ्हाडकर नावाचा अतुलनीय कलाकार मंडळाला लाभला आणि दरवर्षी गणपती बरोबरच गणपतीचा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली.गजाभाऊ च्या अफाट कल्पनाशक्ती तुन मुंबई-पुण्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे लोकांच्या डोळ्यांची पारणं फेडू लागले.गणपती जवळ आला की 2-3महिने आधी गजाभाऊ च्या घरी त्यांना मदतीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होई.गजाभाऊ च्या मार्मिक टिपण्या ऐकत, त्यांच्या देखरेखीखाली कामाला सुरुवात होत असे.गजाभाऊ चा मोठेपणा असा की एवढया वर्षात डेकोरेशन च्या खर्चाव्यतिरक्त एकही पैसा न घेता तीन महिने आपले घर त्यांनी या कार्यासाठी दिलेले असायचे.वर्षानुवर्षे त्यांनी निस्वार्थीपणाने आपली सेवा गणपतीच्या चरणी वाहिली.त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवून मंडळाने त्यांना सन्माननीय सभासदत्व बहाल केले होते.गजाभाऊ नंतर अनिल आणि अनुजा सावंत यांनी असेच दिमाखदार देखावे उभारून मंडळाची परंपरा जपली आणि मंडळाची शान वाढवली.

      दीड दिवसाच्या गणपती नंतर वेध लागायचे ते गणपती विसर्जनाचे. अधिकृत रित्या वा परवानगीने काही होत नसल्याने विसर्जनही तसे सांभाळूनच करावे लागे.अशावेळी मंडळातले वरिष्ठ आपले कॉन्टॅक्टस वापरून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलत सहाय्य करायचे.कधी अबुधाबी इंटरकॉन्टिनेंटल च्या मागे गुजराती मच्छिमारांच्या बोटी उभ्या असत. दोन बोटीतून बाप्पा ला समुद्राच्या मध्यभागी घेऊन जात.मग बोटीतच बाप्पाची आरती करून तिथूनच विसर्जन करायचे ,तर कधी एखाद्या निर्जन किनाऱ्यावर  बोटीतून उतरून विसर्जन व्हायचे.नंतर काही वर्षे टुरिस्ट क्लब च्या मेरिडीएन हॉटेल च्या मागून 50-60 माणसे मावतील अश्या मोठया बोटीतून ढोलकी वाजवत,गजाननाचा जयजयकार करत सादियात आयलंड वर जायचे आणि तिथे जेट्टीवर उतरून किनाऱ्यावर  उतरायचे मग जोरजोरात आरत्या म्हणून बाप्पाला निरोप द्यायचा.अशावेळी तिथे कोणीही आजूबाजूला नसल्याने सगळ्यांचे कंठ जरा जास्तच सुटायचे.

विसर्जनानंतर लगेच  आवराआवरीला लागायचे आणि त्यानंतर मनोज धुतांकडे मंजूभाभीनी सर्व कार्यकर्त्यांसाठी आग्रहाने केलेल्या श्रम परिहाराला हजर राहायचे हा वर्षानुवर्षांचा जणू  शिरस्ताच बनला होता.मनोज धुतांच्या आधी ही जिम्मेदारी अग्निहोत्री काकांनी सांभाळली होती.स्थापनेच्या दिवशी दुपारच्या  भोजन प्रसादासाठी काका काकूंचे सर्वांना अगत्याचे आमंत्रण असे.तिथे भारतीय राजदूतापासून ते छोटेमोठे उद्योगपती,मंडळाचे कार्यकर्ते  हजर असत.

        आता गेली दहा वर्षे ISC मध्ये न चुकता बाप्पा चे आगमन होत आहे.काळाप्रमाणे आता उत्सवात खूप  स्वागतार्ह बदल झाले आहेत.जागा मोठी असल्याने मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात,स्टेज वर लेझीम,ढोल ताशाच्या साथीने नृत्यसंगीताचे कार्यक्रम होतात.मंडळाचे सभासद त्यात उत्साहाने भाग घेतात. भारतात साजऱ्या केलेल्या गणपतीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या होतात.सासर -माहेरच्या गणपतीची आठवण,हुरहूर काही प्रमाणात दूर होते.परदेशातील माहेरघर म्हणून मंडळाबद्दल एक आपलेपणा,आपुलकीचा भाव निर्माण होतो .दीड दिवसाचा गणपती वर्षभराचा आनंद पदरात देऊन जातो.विसर्जना ला जाताना घरातल्या गणपतीच्या आठवणीने मन व्याकुळ होते.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना आवाज कातरतो,डोळे पाणावतात आणि जड पावलांनी सर्व घरी परततात ते पुढच्या वर्षीच्या गणपतीची वाट पहात.

 

प्रशांत कुलकर्णी

"परदेशी भूमीवरील माहेरचा गणपती"__श्री. प्रशांत कुलकर्णी

 

"परदेशी भूमीवरील माहेरचा गणपती" अशी ज्याची ओळख आहे असा महाराष्ट्र मंडळ, अबुधाबीचा गणपती दोन वर्षांनी पुन्हा एकदा इंडिया सोशल सेन्टर च्या सभागृहात स्थापन झाला. गेल्या वर्षी कोरोनाच्या आगमनाने गणरायाचे आगमन सार्वजनिक न करता खाजगीरीत्या मंडळाला आयोजित करावे लागल्या मुळे सभासदांना दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. यावर्षी देखील गणराज च्या दर्शनाची आस मराठी मनाला लागली होती. इथल्या सरकारने कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि वॅक्सीनेशन च्या तिसऱ्या, चौथ्या डोस साठी स्थानिक रहिवाश्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी यामुळे नियमात थोडी शिथिलता आली. मंडळाने इंडिया सोशल सेन्टर ला गणपती स्थापनेसाठी साद घातली आणि त्यांनीही येथील मिनिस्ट्री ऑफ इंटेरिअर यांच्याशी संवाद साधून काही अटींसह परवानगी मिळवली. सोशल डिस्टनसिंग, एकावेळी फक्त 20 भक्तांना दर्शनासाठी परवानगी आणि ७२ तास आधी केलेली पीसीआर टेस्ट, या अटी मान्य करण्यात आल्या आणि त्याची कडक अंमलबजावणीही करण्यात आली

          पण त्या आधी गेला महिनाभर, मंडळाची समिती, गणपती च्या आगमनाची तयारी करण्यात गुंतली होती. मंडळाच्या अध्यक्षा प्रिया पाकळे यांच्या संकल्पनेतून शनिवार वाडा ची प्रतिकृती उभारण्यात पूर्ण कमिटी कामाला लागली होती. अक्षय फणसे, यशश्री जोशी आणि सुवर्णा देशपांडे यांच्या कुशल कामगिरी ला सुशील गुरव, चिनार पाटील, अनिल पाकळे, दर्पण आणि पद्मिनी सावंत, प्रशांत मोहिते, सोनाली आणि ऊर्जा माजगावकर, सचिन अमृतकर, दीप्ती राव, निलेश आणि भूमिका उज्जैनकर, यांची साथ मिळाली आणि कल्पनेतील शनिवार वाडा मूर्त स्वरूपात तयार होऊ लागला. मंडळाचे विश्वस्त मंदार आपटे, प्रकाश पाटील आणि नरेंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सचिव जितेंद्र बाचल यांच्यासह सर्वांची अथक मेहनत, अपार कष्ट घेऊन केलेला शनिवार वाडा जेव्हा उभा राहिला तेव्हा त्यातील मुख्य प्रवेश द्वारात उभी राहिलेली गणेश मूर्ती, दोन्ही बाजूचे बुरुज, त्यावर दिमाखात  फडकणारा भगवा, त्याच्या बाजूला तुतारी वाजवत उभे असलेला मर्द मराठा मावळे पेशवाई काळाची आठवण करून देत होता. दीप्ती आणि अजित राव यांनी गुरुजी नरेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राण प्रतिष्ठा केली. गणराया समोर स्मिता सरप यांनी काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. संध्याकाळी भारतीय दूतावासातील पदाधिकारी, माननीय सभासद आणि प्रमुख उद्योग व्यावसायिक, देणगीदार यांच्या उपस्थितीत आरती पार पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी  अथर्वशीर्ष आणि संध्याकाळी विसर्जन साधेपणाने पण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत उत्साहाने पार पडले.

अखिल मानवजातीवर आलेले कोरोनाचे सावट हळूहळू दूर होत असताना गणरायाचे आगमन हे मनाला ऊर्जा देणारे, आत्मविश्वास वाढवणारे ठरले. विघ्नहर्ता गणराया या संकटावर मात करण्याची उमेद देत असतानाच पुढील वर्षी कोरोनाचे अस्तित्व च नसावे. म्हणजे पूर्वीसारखे, हे सारे नियम बाजूला सारून, बाप्पाचे स्वागत करण्याची मनोकामना प्रत्येकाने व्यक्त केली. बाप्पाच्या दर्शनासाठी कशाला हवेत नियम?

 

प्रशांत कुलकर्णी

अबुधाबी

Saturday, July 10, 2021

चित्रकला-----वंशिका निलेश उज्जैनकर

 


चित्रकला----स्वानंद नाईक

 



चित्रकला…..:-पियुष धनजंय शितोळे




 

चित्रकला-------पावनी प्रसाद बारटके

 


चित्रकला…..:- धृति आशिष देहणकर

 


चित्रकला-------भूमिका निलेश उज्जैनकर

 


चित्रकला--------आदित बलदावा