Sunday, October 3, 2021

बालपणीच्या आठवणींतला श्रावण---- डॉ. प्रसाद बारटके

 

बालपणीच्या आठवणींतला श्रावण

 डॉ.  प्रसाद बारटके

 

“श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”

श्रावण म्हटलं कि बालकवींची ही कविता ओठांवर येतेच येते आणि मनात दाटून येतात बालपणीच्या असंख्य रम्य आठवणी. ही कविता म्हणजे नुसतेच शब्द किंवा भावना नसून श्रावण महिन्यात असणाऱ्या कुंद आणि आल्हाददायक वातावरणाचे यथार्थ वर्णन आहे. कधी कधी लख्ख उन अन् मधूनच बरसलेल्या जोरदार सरी असा ऊन-पावसाचा लपंडाव म्हणजे श्रावण तर कधी अचानक aहोणारा ऊन पावसाचा संगम म्हणजेच निसर्गाचा इंद्रधनुरुपी चमत्कार दाखवणारा श्रावण. नववधू प्रमाणे हिरवा शालू नेसून रंगीबेरंगी फुलांचा गजरा माळलेली धरा म्हणजे श्रावण. असं हे अत्यंत मोहरून टाकणारं, मनाला नवी ऊर्जा देणारं वातावरण म्हणजे श्रावण. मंडळी आपण यु... मध्ये अत्यंत शुष्क अशा वातावरणात राहत असलो तरी श्रावण महिन्याचे हे वर्णन वाचताना गेलात ना तुम्हीसुद्धा तुमच्या आठवणीत आणि तेही तुमच्या बालपणात.

मला अजूनही आठवतं की शाळेत असताना श्रावण महिन्याची आम्ही वर्षभर वाट बघायचो. त्याचं एक कारण म्हणजे दर श्रावणी सोमवारी, आमची शाळा अर्धा दिवस असायची. शाळेच्या बाहेर लागणारा अर्धा दिवस सुट्टीचा फलक आजसुद्धा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यानंतर होणारा आनंद हा शाळा लवकर सुटून खूप सारी मज्जा करता येईल ह्या विचारांनी असायचा आणि त्याच विचारांमध्येच शाळेचा अर्धा दिवस कसा भुर्रकन संपायचा हे समजायचे नाही.

 हा आनंद द्विगुणित व्हायचा तो श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमी, मंगळागौर, बैलपोळा, रक्षाबंधन,  नारळीपौर्णिमा, दहीहंडी अशा विविध सणांनी. श्रावणी सोमवारी, शुक्रवारी घरातल्यांचे उपवास, साबुदाणा खिचडी, रताळ्याची खीर व अन्य  गोड गोड खाणी ह्या सर्वांमुळे मला श्रावण महिना हा जणू काही सणांचा राजाच आहे आणि तो कधीच संपू नये असे वाटायचे.

श्रावणात  विविध सण उत्सवांच्या निमित्ताने बेल, आघाडा, दुर्वा,  केतकी,  मोगरा,  जास्वंद, रुई हिरडा,बेहडा अशा आरोग्यदायी वनस्पतींची ओळख झाली व निसर्गाबद्दल आपसूकच आत्मीयता निर्माण झाली. .

आम्ही लहानपणी दादरला राहायचो आणि दहीहंडीच्या दिवशी सकाळी पोटपूजा करून आमची स्वारी निघायची दादर रेल्वेस्टेशनकडे असलेल्या  ideal बुक डेपो किंवा छबिलदास शाळेच्याजवळ. तिथे जाऊन एखादा छानसा कोपरा पकडून एखाद्या इमारतीच्या खाली दहीहंडी बघायला उभे राहायचे.  ह्या ठिकाणची अशी खासियत असायची कि एकाच वेळेला एकाच रांगेत सलग तीन ते चार हंडया लागलेल्या असायच्या आणि एकाच ठिकाणावरून अनेक दहिहंड्याचे  थरार एकाचवेळी अनुभवता यायचे. मला अजूनसुद्धा ती सहा-सात थर लावत असतानाची कसरत आणि दहहंडी यशस्वीरित्या फोडल्यानंतर  नाशिक बाजावरती सर्व गोपाळांनी केलेला बेधुंद नाच डोळ्यासमोर येतो.

श्रावणातला एक भावनिक सणजो बहीण-भावाचे प्रेमळ नाते अधोरेखित करतो तो म्हणजे राखीपौर्णिमा. आमच्या बहिणाबाईनी आम्हाला राखी बांधल्यावर आम्ही सुद्धा एक छोटीशी कॅडबरी किंवा वडिलांनी दिलेले पैसे ओवाळणी म्हणून देते असू. त्या दिवशी भाऊ म्हणून रुबाब जास्त असतो. खरी गंमत तर शाळेत यायची. आमचे हात आमच्या मैत्रिणी वजा बहीणींकडून राख्यांनी भरून जायचे. कोणाचा हात किती राख्यांनी भरलेला आहे ह्यावरून त्याची शाळेतील लोकप्रियता दिसून येते असा आमचा समाज असायचा. पण त्यातच कोणी कोणाला मुद्दाम राखी बांधली आणि काटा काढला अशा खमंग चर्चा मग आम्हा मुलांच्यात बरेच दिवस चालायच्या.

श्रावणाच्या अशा भारावलेल्या दिवसात बाजारपेठादुकाने, गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी सजू लागायच्या. आम्हीसुद्धा गणपतीच्या सुट्टीत, रोह्याला म्हणजेच आमच्या गावी कधी एकदा जातोय याची आतुरतेने वाट पाहायचो आणि त्यातच श्रावण महिना कधी संपला हे समजायचेच नाही.

 

No comments:

Post a Comment