तिचा श्रावण
बारा मासात श्रावण
तिच्या मनाच्या जवळ
ऊन -पावसाचा त्याचा खेळ
तिच्या सुख-दुःखाशी घाली मेळ
बालपणीचा श्रावण
कागदी होडीतून येतो
इंद्रधनूच्या रंगात
तिचे तारुण्य रंगवतो
पंचमीच्या झुल्यावर
तिला झोका झुलवितो
भोवती नागांची वारुळे
त्याची जाणीवही देतो
मग साजण होऊन
श्रावण बरसतो
तिच्या लाजऱ्या मनात
प्रेमांकुर फुलवतो
सासरच्या वळणावर
डोळ्यांमधून सांडतो
सणासुदीला प्रेमाने
तिला माहेरी धाडतो
जसा श्रावण धरणीला
हिरव्या रुजव्याने सजवितो
तिचा गर्भ तिच्या सृजनाचे
तेज अंगभर देतो
असा हा श्रावण
तिला सतत भेटतो
आयुष्याच्या वैशाखात
हिरवळ फुलवतो
सौ .नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment