Saturday, May 1, 2021
फ्रुट श्रीखंड पुरी-------सौ. शीतल अमित झळकीकर
फ्रुट
श्रीखंड पुरी
श्रीखंडासाठी चे साहित्य
साहित्य
दही एक किलो
पिठीसाखर दोन वाट्या
वेलची पूड
आवडीप्रमाणे ड्राय फ्रुट्स
कृती
एक किलो दही एका कापडात रात्रभर बांधून ठेवावे.
रात्रभर बांधून ठेवल्याने त्याच्यातले सगळे पाणी
निथळून जाईल आणि आपल्याला चांगला चक्का मिळेल.
आता याचक यामध्ये पिठीसाखर वेलची पूड घालून
थोडेसे हलवून आपल्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर ते चांगले मिक्स करून घ्यावे.
श्रीखंड तयार.
पूर यांसाठी साहित्य
कणिक
थोडासा रवा
तेल
आणि आणि कणीक मळण्यासाठी पाणी.
पुऱ्या साठीचे साहित्य म्हणजे कणिक थोडा रवा
चिमुटभर मीठ आणि थोडं थोडं करून पाणी घालून आणि व्यवस्थित मळून घ्यावी.
आता या कणकेचे छोटे छोटे गोळे करून पुर्या
लाटून छान तळून घ्याव्यात.
फ्रुट श्रीखंडासाठी
वरील सर्व कृती करून त्यात आपल्या आवडीप्रमाणे फळं
घालावी.
गुढीपाडवा २०२१----------सौ.नम्रता नितीन देव.
गुढीपाडवा २०२१
चैत्र पाडवा सण पहिला
नव वर्षाचा नव हर्षाचा
मंगलमय हा शुभदिन आहे
श्रीरामांच्या विजयाचा
विजयपताका त्या विजयाची
गुढीच्या रूपे पुजण्याचा
गोडधोड नैवेद्यासोबत
कडुनिंब मंत्र आरोग्याचा
आरोग्यम धनसंपदा हा
मंत्र अगदी पटतो आहे
सारे जग त्या देवापाशी
फक्त आरोग्य मागते आहे
गुढी उभारू निश्चयाची
या संकटावर मात करू
मने जोडुनी अंतर राखू
एकमेका साह्य करू
आरोग्यपूर्ण हे वर्ष असू दे
याच शुभेच्छा देऊया
सुखरूप ठेव साऱ्यांना देवा
हेच मागणे मागुया
सौ.नम्रता
नितीन देव.
गुढीपाडवा-----सौ अंजली निलेश उज्जैनकर
मराठी नवीन वर्षाची सुरुवात करतो चैत्र,
शुद्ध प्रतिपदेपासुन सुरु होते नऊरात्र.
पाडव्याला गुढी उभारून करावे लक्ष्मीचे पुजन,
सुख, शांती ,समृद्धी चे सदैव व्हावे आगमन.
मराठमोळ्या परंपरांसोबत जपाव्या चालीरूढी,
अंगणात रांगोळी घालून उभी करावी मोठी गुढी.
साडेतीन मुहूर्तात गुढीपाडव्याचाही आहे मान,
शुभ कार्यासाठी पलटावे लागत नाही पंचांगातील पान.
वस्त्र जरतारी, कडुनिंबाची पाने,सोबत गाठी साखरेची,
घ्यावी बांधून लोटी तांब्या किंवा चांदीची.
पुष्प हारानी सजवून, बोटे ओढावी हळदीकुंकवानी,
गोडाचा दाखवून नैवेद्य करावी आरती मनोभावानी.
नात्यातील मऊपणा राहू दे,
मनातील कटूता निघू दे,
शब्दातील गोडवा वाढू दे,
हीच भावना सदैव मनी असु दे.
गुढीपाडव्या च्या शुभेच्छा
सौ अंजली निलेश उज्जैनकर
अबुधाबीकर-----प्रशांत कुलकर्णी
अबुधाबीकर
पुलं देशपांडे यांचा मुंबईकर, पुणेकर
आणि नागपूरकर हा लेख, त्याचे कथाकथन
आतापर्यंत तुमच्या पैकी अनेकांनी वाचले-ऐकले असेल.प्रत्येक शहराची वैशिष्ट्ये
सांगत तिथे राहणाऱ्या माणसांचा स्वभाव, गुणदोष
अगदी हसत हसत सांगत, कधी चिमटे घेत पण अत्यंत
खेळकरपणे पुलं नी सांगितलं आहे. या मध्ये पुलंची निरीक्षण शक्ती,
मानवी
स्वभावाचे एक एक नमुने पुलं नी उभे केलेत. असाच एक पुलं चा अप्रकाशित लेख आमच्या
हाती लागला. अनेक वर्षांपूर्वी पुलं अबुधाबी ला येऊन गेले असताना काही काळाच्या
वास्तव्यात त्यांनी जे पाहिले, अनुभवले
आणि ऐकले त्यावरून त्यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीने काही टिपणे लिहून
काढली असावी. असा हा लेख शोधून काढणाऱ्याचा दावा आहे. तर त्या टिपणात सद्यस्थितीत
काही काल्पनिक भर घालून केवळ आणि निव्वळ चार क्षण आनंदात जात चेहऱ्यावर एखादे तरी
स्मित झळकावे हा हेतू मनी बाळगून हे लिखाण केले आहे.(चुभुद्याघ्या)
पुलं च्या मुपुना (मुंबईकर, पुणेकर,नागपूरकर)या
लेखाला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातील जनतेने दिला.मुपुना ऐकताना उर्वरित
महाराष्ट्रातील जनता त्यांना खदाखदा हसत होतीच पण मुंबईकर हा नागपूर-पुणेकरांना,पुणेकर हा मुंबई- नागपूरकरांना आणि नागपूरकर हा मुंबई-
पुणेकरांना खाजगीत एकमेकांना खिजवायला मागेपुढे बघत नव्हते.उर्वरित महाराष्ट्रातील
शहरांवर आणि तेथील नमुन्यावर पण असेच लेख लिहा असे अनेक पत्र आणि फोन पुलंना आले.
त्यात मुपुना च्या लोकांचा भरणा अधिक होता हे सांगायला नको.
गेली तीन दशके मी संयुक्त अरब
अमिरातीच्या अबुधाबी या राजधानीच्या शहरात वास्तव्य करून आहे.बघताच क्षणी प्रेमात
पडावे असे हे शहर आहे.इथले भव्य आणि सुबक रस्ते,नयनरम्य
कॉर्निश ,शेख
झायेद मॉस्क,फेरारी वर्ड,वॉटर
पार्क,वॉर्नर स्टुडिओ,लुव
म्युझियम ,हे तर बघितल्यावर इथेच राहून
त्याचा वारंवार अनुभव घ्यावा ,इथेच
टाका तंबू म्हणत कायमचे वास्तव्य करावे असे तुम्हास वाटले तर नवल नव्हे .पण थांबा.
तुम्हाला अबुधाबी कर व्हायचे आहे का?जरूर
व्हा.महाराष्ट्राच्या राजधानी पासून फक्त तीन तासाच्या अंतरावर असलेले एवढे शांत
आणि सुंदर शहर नाही.एकदा का अरबी समुद्र ओलांडला की आपल्या देशाच्या एवढा जवळ
असलेला परदेश माझ्या तरी पाहण्यात नाही.
पण नुसते अबुधाबीत जाऊन तिथे एखादी नोकरी मिळवून
तिथे राहिले की अबुधाबीकर होता येईल अशी तुमची कल्पना असेल तर ती चुकीची आहे.एखाद्या
शहरात नुसते शरीराने हजर असणे म्हणजे तुम्हाला त्या शहराचे होता येत नाही,त्यासाठी
त्या शहराचे गुणधर्म तुम्हाला अंगी बाळगावे
लागतात.त्या शहराचे गल्लीबोळ तुम्हाला तोंडपाठ असावे लागतात.त्याबाबतीत
अबुधाबी फार सोपे आणि सुटसुटीत शहर आहे.एअरपोर्ट पासून कॉर्निश पर्यंत जाणारे चार उभे आणि आठ आडवे रस्ते लक्षात ठेवले
की तुम्ही अबुधाबी च्या भूगोला ची परीक्षा उत्तीर्ण होता.एकदा हे भौगोलिक पाठांतर
झाले की इतिहासातील अबुधाबीचे स्थान शोधायला तुम्ही मोकळे.मग येथील कल्चरल सेन्टर ला जाऊन गेल्या 70-80
वर्षापूर्वीचे जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघून अबुधाबी चा उत्कर्ष कसा
झाला.ब्रिटिश काळातील बदोईन लोकं आपापल्या टोळ्या सह सरदार यांच्या बरोबर राहणारे
कबिले,वाळवंटातून उंटावर फिरणारे अरब
,मग हळूहळू तेल विहिरींचा लागलेला शोध,त्यातून
झालेला उत्कर्ष याची कल्पना येते.
पण
आता तुम्हाला इतिहास-भूगोल माहीत झाला म्हणजे तुम्ही अबुधाबी कर झालात असा तुमचा
समज असेल तर तो चुकीचा आहे.तुम्हाला पक्के अबुधाबी कर व्हायचे असेल तर इथे नुसते
वास्तव्य करून चालणार नाही तर इथल्या महाराष्ट्र मंडळाचे सभासद होणे आवश्यक आहे.पण
नुसते सभासद होऊनही तसे तुम्ही कोणाला ओळखत नसाल तर तुम्हाला पण कोणी ओळख दाखवणे
शक्य नाही.इथे ओळख ही आपणहून करून घ्यायची असते.ती करून घेताना तुम्ही कुठले?(मुंबई,पुणे,नागपूर
इतर),तुमची शाळा,कॉलेज
ह्या गोष्टी खूप मायने राखतात.त्यातील काही गोष्टी जुळून आल्या तर संभाषण पुढे
सरकते. नाहीतर पुढच्या प्रोग्राम ला तुम्ही कोण ?असे
प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर असू शकते. पण एकदा गोत्र जुळले की 'या
नं एकदा आमच्या घरी'या वाक्याने सुरवात
होते.पण शहाण्या माणसाने हे वाक्य चुकूनही गंभीरपणे घ्यायचे नसते हे लक्षात
ठेवायचे.या वाक्याची दोन-तीन भेटीगाठीत तीन-चार वेळा उजळणी झाली की त्यांना
बोलावण्याचा पुढाकार तुम्हाला घ्यावा लागतो.मग सहा एक महिन्यानंतर त्यांच्या
वीकएंड पार्टीत तुमचा नंबर लागू शकतो.
इथे एकमेकांकडे जायला यायला एक कोड language
आहे.ती तुम्हाला आत्मसात करता आली पाहिजे.तिला 'एकी'ची
भाषा असे म्हणतात. म्हणजे असे की तुम्हाला जर कोणी त्यांच्या घरी आमंत्रित केले
असेल तर तिसऱ्याला सांगताना ज्यांनी
बोलावले आहे त्यांचे नाव न सांगता 'या
गुरुवारी आम्हाला 'एकी'
कडे
जायचे आहे' असे सांगावे. हाच नियम
तुम्ही कोणाला आपल्या घरी बोलावले असेल तर त्यांच्या बाबतीतही
लागू होतो.'या गुरुवारी आमच्याकडे 'एक'जण
येणार आहेत' ! हे तंत्र,ही
भाषा तुम्हाला जमली की अबुधाबी कर होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल यशस्वी
ठरलेच म्हणून समजा.अस्मादिकांच्या अबुधाबी च्या सुरुवातीच्या वास्तव्यात मी असाच
ही भाषा शिकायचे ट्रेनिंग घेत असताना माझ्या घरी मला भेटायला आलेल्या एका मित्रास 'मला
एकीकडे जेवायला जायचे आहे'असे
सांगून कटवले होते.त्या मित्रानेही 'मला
पण एके ठिकाणी बोलावले आहे'असे
ताठ मानेने सांगत घरचा रस्ता नापला होता.थोड्या वेळानंतर आम्ही दोघे ही एका कॉमन
मित्राच्या घरी समोरासमोर आलो
तेव्हा आमचे दोघांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.या 'एकी'ने
घोटाळा केला होता नाहीतर दोघे एकत्रच घरून निघालो असतो.पण असे प्रसंग विरळ असले
तरी कोणावर येणारच नाही असे छातीठोकपणे कोणी सांगू शकत नाही.
इथल्या पार्टीत पाळायचा आणखीन एक अलिखित नियम म्हणजे आपण कोणाच्या किती
क्लोज आहोत हे एकतर दाखवायचे नसते नाहीतर असे दाखवायचे की तुमची दोस्ती पाहून
दुसऱ्याच्या मनात ईर्षा निर्माण व्हावी.मित्राला मिठी मारताना अशी मारायची की जणू
शोले तील जय आणि विरु.बघणाऱ्याने डोळे विस्फारून तोंडात बोटे घातलीच पाहिजे.ह्यात
तुम्ही पारंगत झालात की अबुधाबीकर होण्यासाठी तुमचे दुसरे पाऊल
यशस्वी ठरलेच म्हणून समजा.
तरीपण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.तुमचा अशा प्रकारचा बाणा जोपर्यंत
सार्वजनिक समारंभात उठून दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला अबुधाबी कर म्हणून कोणीही
स्वीकारणार नाही.पण त्यासाठी तुम्हाला मंडळाच्या वर्षभरातील विविध कार्यक्रमात
हिरीरीने भाग घ्यायला हवा.त्यात तुमच्याकडे जर अभिनय,नृत्य,गायन,वादन,
क्रिडा नैपुण्य हे पाचपैकी दोन तरी गुण असले तर
वर्षभरात तुमची ओळख निर्माण होऊन पुढच्या वर्षी कमिटी वर काम करणार का?अशी
आपसूकच विचारणा होते. एकदा कमिटीवर गेलात की
स्वतःचा ठसा उमटवायची संधी मिळते.तुमचे कर्तृत्त्व वर्षभरात सिद्ध झाले की
पुढच्या वर्षी सचिवपदी आणि नंतर अध्यक्ष असे पर्याय उपलब्ध होतात.मग तुम्ही
रूढार्थाने स्वतः ला छातीठोकपणे अबुधाबी कर म्हणून घेऊ शकता. अबुधाबी कर होण्याचा
हा पर्याय लांबचा आणि कष्टदायक असला तरी यशाची हमखास गॅरंटी देणारा आहे.पण तुम्ही
शॉर्टकट चे भोक्ते असाल तर नुसते सभासद होऊन वर्षानुवर्षे फक्त लांबून प्रोग्राम पहायचे
आणि निघून जायचे आणि फक्त दर AGM ला
हात वर करून नुसते प्रश्न विचारायचे हे पुणेरी धोरण ठेवले तरी तुमची ओळख निर्माण
होते.
महिला वर्गासाठी तर सकाळी नवरा ऑफिसात आणि मुले(एकदाची) शाळेत गेली की ते
परत येईपर्यंत च्या फावल्या वेळात तुम्हाला
मैत्रिणीबरोबर Etisalat च्या
सहकार्याने मिळणाऱ्या फ्री लँडलाइन वर तासनतास गप्पा मारण्याची कला अवगत असायला
हवी.या गप्पात मंडळाचे कार्यक्रम, कमिटी
या बरोबरच ,भारतातील सासु,सासरे,दिर,नणंद याविषयी कौटुंबिक गप्पा ही मारता यायला
हव्यात.मंडळ हे 'परदेशातील माहेरघर'
असेल
तर अबुधाबी हे परदेशातील' सासर
नसलेलं माहेर'असे म्हणायला हरकत नाही.
नवरे
मंडळींना कुटुंबाला खुश ठेवायचे असेल तर वर्षातून 8-10
भारी किमतीच्या साड्या सौ.ला घेऊन द्याव्याच लागतात.पण या साड्या चा कुठल्याही
सणाशी संबंध जोडत बसायची गल्लत करत बसलात तर फसाल.या साड्या ह्या मंडळाच्या
कार्यक्रमा प्रमाणे घ्यायच्या असतात.म्हणजे हळदी कुंकुवाला नक्षीदार बुट्टे असलेली
काळी साडी(बरं ही दरवर्षी वेगळी असावी लागते,नाहीतर
मागच्याच वर्षीचीच साडी नेसली हे मैत्रिणी फेसबुक वरील फोटो बघून शोधून काढतात).RFD
साठी
तर 2-4 पैठण्या आणि दागिन्यांचा
स्टॉक जवळ बाळगावाच लागतो.त्याला नाईलाज आहे.दिवाळी पहाट ची पैठणी वेगळी आणि AGG
ला
पंचतारांकित हॉटेल मध्ये घालायची पैठणी वेगळी.त्यात तुम्ही कमिटीवर असाल तर गणपती,सत्यनारायण
पूजा यासाठीचा वेगळा स्टॉक राखून ठेवावा लागतो.पुरुष मंडळींना देखील 2-4
सलवार कुर्ताचा स्टॉक कार्यक्रमाप्रमाणे घालावा लागतो.सत्यनारायण पूजेला बरमुडा
घालून येणारा सभासद हा लक्षवेधी ठरून नंतर चर्चेचा विषय ठरू शकतो.मंडळाच्या
वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी(AGG) दरवर्षी
ठेवणीतला सूट ड्राय क्लीन करून घ्यावाच लागतो.फक्त आतला शर्ट आणि टाय बदलत
राहायचा.वर्षांनूवर्ष तेच तेच कपडे घालून जुने झालेले शर्ट पँट बायकोने भारतात
गेल्यावर बोहरणीला द्यायला म्हणून बॅगेत भरून ठेवलेले असतात.त्यातील काही कपडे
होळी-रंगपंचमी साठी कामाला येतात.उरलेले सध्याच्या कोरोना काळात "तोंडावर
मास्क लावल्यावर तुम्हाला कोण ओळ्खतंय?हे
जुने कपडे घालूनच सुपर मार्केट ला जाऊन या.उगाच चांगले कपडे सारखे सारखे धुवायला
नकोत."असे म्हणत परत बॅगेतून वर आले आहेत.शिवाय पिकनिक ला त्या वर्षीची कमिटी
ठरवेल त्याप्रमाणे ड्रेस कोड पाळावा लागतोच.एकावर्षी तर सभासदांनी शाळकरी मुलांचे
युनिफॉर्म घालून या असा फतवा निघाल्यावर मित्राच्या पत्नीने त्याने त्याच्या
शाळेतील युनिफॉर्म जपून न ठेवल्याबद्दल तास तास तासले होते.
वरील सर्व गोष्टींची पूर्तता झाली की इतरांनी तुम्हाला अबुधाबीकर
म्हणायच्या आधीच तुम्ही स्वतःला अबुधाबीकर म्हणायला मोकळे.पण मंडळाचे सभासद न
होताही अबुधाबीकर होता येते.सभासद नसलेली पण अबुधाबीत वास्तव्य असलेली अशी अनेक
मराठी कुटुंब -मराठी बॅचलर आहेत की जे अनेक वर्षे इथे आहेत.त्यांचे स्वतःचे छोटे
छोटे ग्रुप्स तयार झालेत.एकमेकांकडे जाणे येणे आहे.ते सणावरी,
मुलांच्या
वाढदिवसानिमित्त एकत्र येतात. एकमेकांवर काही संकट ओढवले तर त्यांना मदत
करतात.अडीअडचणी ला त्यांच्या पाठीशी उभे राहतात.जगाच्या पाठीवर कुठेही जा.मराठी
धर्म हा पाळला जातोच.इथे तुमच्या अश्या वागण्या बोलण्यातून देखील तुमचे अबुधाबी
तील वास्तव्य सुखावह होऊ शकते. आणि अबुधाबीकर म्हणून ताठ मानेने जगायला मोकळे
असता.इथे येताना उत्तम पगार,कंपनी
चा फ्लॅट,फिरायला गाडी,वर्षातून
एकदा एक महिन्याची पेड सुट्टी आणि कुटुंबाचे जाण्या येण्या चे तिकीट.जमलंच तर
कंपनी तर्फे मुलांची शैक्षणिक फी ची सोय या सर्व गोष्टी जमेस धरून भविष्याची सुंदर
स्वप्ने बघत तुम्ही इथे पाऊल ठेवता.सचोटी आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या मराठी
माणसाच्या वृत्तीमुळे ही नगरी पण तुम्हाला निराश करत नाही.प्रत्येक ब्लॉक मध्ये
सुपर मार्केट ची व्यवस्था असली तरी तुमच्या बिल्डिंग च्या खाली असलेल्या ग्रोसरी
शॉप मधून एक दिरहाम्स ची कोथिंबीर पाच मिनिटात इथेच घरपोच मिळू शकते.हे सुख
गृहिणींना फक्त इथेच मिळू शकते.
पिकतं तिथे विकत नाही असे म्हणतात. पण अबुधाबी हे एकमेव शहर असे आहे की
जिथे पिकत काहीच नाही पण जगात पिकलेले सर्व इथे विकले मात्र जाते.पण तुम्हाला
त्याची किंमत मोजावी लागते.तसेच एकदा का अबुधाबीकर हे नाव तुमच्या नावाशी जोडले
गेले की जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही तुम्ही गेलात तरी Abudhabian
नावाची
किंमत कमी तर होतच नाही पण वाढत मात्र नक्कीच राहते.सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून
बघाल तर अबुधाबी सारखे सुरक्षित शहर नाही.रात्री-अपरात्री जर चुकून कुठे जावे
लागले तर पोलिसांकडून हटकले जाऊ शकते पण तुमचे एमिरेट्स आयडी बघून आणि तुमच्याकडे
बघून तुमच्या प्रामाणिकणाची खात्री पटल्यावर इप्सित स्थळी जायची परवानगी मिळू
शकते.सार्वजनिक ठिकाणी इथे स्त्री वर्गाला मिळणारा आदर व
प्रेफेरन्स उल्लेखनीय आहे.एखादी स्त्री रस्ता
क्रॉस करत असेल तर स्त्रीदाक्षिण्य म्हणून पुरुष गाडी थांबवून तिला जायला इशारा
करू शकतो पण पुरुष रस्ता क्रॉस करत असेल
आणि स्त्री गाडी चालवत असेल तर तिच्याकडून 'पुरुषदाक्षिण्याची'
अपेक्षा
ठेवाल तर अपेक्षाभंगाची शक्यता जास्त.
मग काय विचार आहे?होताय
का अबुधाबी कर?
प्रशांत कुलकर्णी
अबुधाबी
गुढीपाडवा--------नरेंद्र कुलकर्णी
गुढीपाडवा
दर वर्षी आपण न चुकता या दिवशी गुढी उभी करतो आणि
श्रीखंडाचा आस्वाद घेतो. जरी आपल्याला माहित असले तरी पाडव्याबद्दल एक उजळणी करूया.
चेदी देशाचा राजा वसू याने इंद्रपदासाठी तप केला. इंद्र प्रसन्न झाला व इंद्राने त्याला
वेळूची काठी, ध्वज, विमान, सुवर्ण कमळाची माला भेट देऊन संपूर्ण पृथ्वीचे राज्य दिले.
वसुने ती काठी व ध्वज स्थापन करून नवी सुरुवात केली ती ही गुढी.
कालगणना हा आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग
आहे. आणि आपली कालगणना कित्येक लाख वर्षे जुनी आहे आणि पुढील काही लाख वर्षांची माहिती
उपलब्ध आहे. खरंच आपल्या पंचांगाचा आपल्याला अभिमान आहे.
मोठ्यामोठ्या गणनेबरोबर आपल्याला रोज दिसते ते म्हणजे
दिवस, महिना व वर्षात घडणारी कालगणना. चंद्राच्या कलांप्रमाणे दिवसाची तिथी बदलते.
(प्रतिपदा, द्वितीया वगैरे) चंद्र पौर्णिमाला ज्या नक्षत्रात आहे, त्या नक्षत्राचे
नाव त्या महिन्याला दिले जाते.
चैत्र - चित्रा
वैशाख - विशाखा
जेष्ठ - जेष्ठा
आषाढ - आषाढा
श्रावण - श्रवण
भाद्रपद - भाद्रपदा
अश्विन - अश्विनी
कार्तिक - कृतिका
मार्गशीर्ष - मृगशीर्ष
पौष - पुष्य
माघ - मघा
फाल्गुन - फाल्गुनी.
या शिवाय ऋतू जे हवामानावर अवलंबून आहेत. आणि अगदी
सेकंदाच्या १००० व्या भागाची मोजमाप पहायला मिळते.
एका वर्षाला संवत्सर म्हणतात. एकूण ६० संवत्सर मोजमापात
धरली जातात. नवे वर्ष झाडाला येणाऱ्या नव्या पालवीपासून सुरु होते. वसंत ऋतू आणि चैत्र
महिना यांचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा किंवा गुढी पाडवा.
विश्वाची निर्मिती याच दिवशी झाली आणि त्याची आधुनिक
शास्त्रज्ञांनी ग्वाही दिली आहे.
१. सत्य युगाची सुरवात ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीला
सुरवात करून केली.
२. मत्स्यावतार याच दिवशी झाला.
३. त्रेता युगामध्ये राजा रामने याच दिवशी अयोध्येत
प्रवेश केला.
४. द्वापार युगामध्ये युधिष्ठिराने युधिष्ठिर संवत
सुरु केले. ज्याला युगाब्द असेही म्हणतात. या वर्षी ५१२२ वर्षे पूर्ण होऊन ५१२३ वे
वर्ष पाडव्याला सुरु होत आहे.
५. कलियुगात सम्राट विक्रमादित्याने विक्रम संवत
सुरु केले. ज्याला २५४७ वर्षे झाली.
पैठणला शालिवाहनाने स्वतःचा शक सुरु केला जो पाडव्याला
नवे वर्ष सूरु करतो. या वर्षी १९४३ वे वर्ष सुरु होत आहे.
आपणा सर्वांना नवे वर्ष आनंदाचे, सुखासमाधानाचे,
भरभराटीचे जावो व विश्वातून करोनाचा समूळ नायनाट होवो या शुभेच्छा.