Saturday, January 30, 2021

माय मराठी---------डॉ. पल्लवी प्रसाद बारटके

 

माय मराठी

माझे विचार, माझी स्फूर्ती,

माझा श्वास,  माझी मराठी

 

माझा अभिमान, अभिमानाचा उत्सव

रंगतो तुजसवे आज मराठी

 

गाऊ गुणगान तुझे किती, कीर्तिवंत तू सर्व जगती

तळपत्या आदित्यासम तेजस्वी मराठी

 

ऋणानुबंध जन्मोजन्मीचे, फेडू कसे पांग मी

तुझाच पाईक हा,  तुला मिरवतो मी मराठी

 

भाग्यवंत आम्हासारखा, नच कुणी या भू वरी

तुझ्याच पोटी जन्मलो, कृतार्थ गे माय मराठी

कृतार्थ गे माय मराठी

-डॉ. पल्लवी प्रसाद बारटके

 

 

 

तेजोमय तारा-------डॉ पल्लवी प्रसाद बारटके

 

तेजोमय तारा

काटेरी रस्त्यावरून चालायचे आहे

मखमली फुले वेचत

मतलबी ह्या दुनियेमध्ये

स्वतःला सिद्ध करत

 

वेगवेगळे मुखवटे इथे

आपले कुणीच नसे

बदकांच्या ह्या गर्दीमध्ये

राजहंस तुला बनायचे आहे

 

पावलोपावली खाचखळगे

दिशाभूल करती सभोवतीचे नजारे

चढ उतारांचा येईल घाट

निश्चयाने त्यातून काढ वाट

 

गरुडझेप तुझी अस्मानी

छाटू पाहतील पंख तुझे

राखेतून नव्याने जन्म घे

पंखांना गगनभेदी बळ दे

 

होऊ नकोस निराश

सोडू नकोस धीर

तू लढ प्राणपणाने

अन बन विजयीवीर

 

तमाच्या घनघोर निशेनंतर

उजळेल आसमंत सारा

कारण आयुष्याच्या क्षितिजावर आता,

उगवला असेल तेजोमय तारा

उगवला असेल तेजोमय तारा

 

-डॉ पल्लवी प्रसाद बारटके

मार्ग------धनंजय मोकाशी



मैफिल------धनंजय मोकाशी

 


आमचे अहो----------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

आमचे अहो

आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी


शॉपिंग चे नाव घेतले की कारणं सांगतात वेगवेगळी .
आता मलाही कळायला लागली त्यांच्या स्वभावातील खोडी,
काही मागाचे असेल तर मलाही करावी लागतात नाटकं थोडी थोडी.
आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी

कार्य प्रसंगात शोभून दिसावी आपली जोडी ,
म्हणून घेवून देत असतात, ड्रेस सोबत सुंदर साडी.
पण तुलातर आहेच नाही साडी नेसायची गोडी,
असे म्हणून देत असतात कारणं निरनिराळी.
आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी

घरी येणाऱ्या पाहुण्यांची करायला आवडते सरबराई,

जेवायला बेत मात्र लागतो विदर्भीय स्टाईल लय भारी, 
अतिथीला देव मानावा अशी भावना आमच्या  घरी.
आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी

स्वभाव शांत आणि साधी आहे बोली,
पण एकदा ओळख झाली की, सांकेतिक भाषा वापरून आवरावे लागते,

अहो आता ओळख खुप झाली.
आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी

पहिला नंबर असतो कुणाला मदत करायच्या वेळी,
घरकामातही करतात मदत मला थोडी थोडी,
नाते जपायला सतत करत असतात तडजोडी.
आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी

क्रिकेट खेळायला जातात उठून भल्या सकाळी,
कारण त्यांना माहीती असते, शुक्रवारच्या सुट्टीची वाट बघत असतात घरची मंडळी.
आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी

सर्वांच्या जपतात आवडी निवडी,
आणि विसरून जातात स्वतः ला असलेली गोडी,
यावरून होते आमच्यात वादावादी थोडी.
आमच्या अहोंची बाई  गोष्टच निराळी


आमच्या घरात सुरू असते अशीच थट्टा  मस्करी,
अशाच आशिर्वादासाठी आम्ही आहोत देवाचे आभारी
या पेक्षा दुसरं काय मागावे देवा जवळी
आमच्या अहोंची बाई अशीच आहे ,गोष्ट निराळी.
अशीच आहे गोष्ट निराळी.

                                 
सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

निवाडा ------आनंद नेवगी

 

निवाडा 

 

शेवटी अगदी हमरी-तुमरीवरच  आले दोघे !

स्वर्गातले देव -देवताही  ठाकले आश्चर्याने उभे !!

 

तो म्हणाला माझीच आत्महत्या श्रेष्ठ !

तुला कल्पना नाही किती पडले कष्ट !!

कितीतरी फिल्म्स , साईन करायच्या बाकी  होत्या,

बँक बॅलन्स अजून ,कोट्यानी  वाढवायचा होता.    !!१ !!

 

तर हा म्हणाला, केंव्हाही माझीच आत्महत्या श्रेष्ठ !

काहीच उरलं नाही , करून एवढें काबाडकष्ट !!

पावसानं  दगा दिला , दुष्काळाची चिन्हं दिसू  लागली पुन्हा !
 
कर्जाचं ओझं पेलवेना झालं  ,कशाची  ही शिक्षा ?काही न करता  गुन्हा  !!   !!२ !!

 

तो म्हणाला , माझं  बरंच आयुष्य भोगायचं राहिलं !

लग्न मुलंबाळं तर ,अनुभवायचं राहूनच  गेलं !! 

दोनचार सख्या क्षणभर येऊन गेल्या, कशासाठी नाही कळलं !

वेळ निघून गेली होती , जेंव्हा  रिक्त  झालो तेंव्हा ते उमजलं  .   !!३ !!

 

हा म्हणाला,भेगा पडलेली जमीन ,जीव खायला उठे !

 बायको ,मुलं  ,आई-बाप उपाशी , जातील तरी कुठे ?

मागील वर्साचं साठवलेलं धान्य कधीच संपून गेलं  !

शेतातलं मोठालं झाड, माझ्या जीवाची सुटका करून गेलं  !!४ !!

 

देव चर्चा करू लागले खरंच आत्महत्या श्रेष्ठ कोणाची ?

ऐषोआरामात जगणाऱ्याची कि उपासमारीने हैराण झालेल्याची ?

सर्व टी व्ही चॅनल्स भरभरून ओथंबून वाहणाऱ्याची, 

की वर्तमानपत्रात कोपऱ्यात  कुठंतरी बातमी आलेल्याची ? !! ५ !!

 

देवदेवता  गोंधळून गेले  ,लक्ष्मीला  कुणीतरी पाचारण केले !

मी तर त्याच्याकडेच  नांदत होते  ,ह्याचा  तर  पत्ताच विसरून गेले !!

चित्रगुप्त  राहिला  उभा  सामोरी,  पाप -पुण्याचे आलेख घेऊन दोन्ही  !

म्हणे , नाही  पापाचे  धनी , ह्या दोघांपैकी  कुणी ही ,    !!६ !!

 

तंटा काही मिटेना ,निवाडा काही होईना !

देव  गेले  वैतागून  ,काय करावे समजेना !!

नारदमुनी आले धावून ,  विनविले  ब्रह्मदेवा !

भूलोकातील  हे  अजब  कोडं, काही करून  सोडवा !!७ !!

 

 

ब्रह्मदेवानी  केला अभ्यास ,संतापाने  उद्विग्न झाले !

दोन्ही  बाजू  ऐकून , निर्णय  देत  उत्तरले !!

हे  तर  हिम्मत हारण्याचं  लक्षण , श्रेष्ठत्वाची कसली करताहेत  अपेक्षा ?

नाही  मिळणार  पुन्हा मनुष्य -जन्म ,नरकात भोगु देत  कठोर शिक्षा   !!८ !!

 

कवी -आनंद नेवगी 

अबु धाबी