Saturday, January 30, 2021

निवाडा ------आनंद नेवगी

 

निवाडा 

 

शेवटी अगदी हमरी-तुमरीवरच  आले दोघे !

स्वर्गातले देव -देवताही  ठाकले आश्चर्याने उभे !!

 

तो म्हणाला माझीच आत्महत्या श्रेष्ठ !

तुला कल्पना नाही किती पडले कष्ट !!

कितीतरी फिल्म्स , साईन करायच्या बाकी  होत्या,

बँक बॅलन्स अजून ,कोट्यानी  वाढवायचा होता.    !!१ !!

 

तर हा म्हणाला, केंव्हाही माझीच आत्महत्या श्रेष्ठ !

काहीच उरलं नाही , करून एवढें काबाडकष्ट !!

पावसानं  दगा दिला , दुष्काळाची चिन्हं दिसू  लागली पुन्हा !
 
कर्जाचं ओझं पेलवेना झालं  ,कशाची  ही शिक्षा ?काही न करता  गुन्हा  !!   !!२ !!

 

तो म्हणाला , माझं  बरंच आयुष्य भोगायचं राहिलं !

लग्न मुलंबाळं तर ,अनुभवायचं राहूनच  गेलं !! 

दोनचार सख्या क्षणभर येऊन गेल्या, कशासाठी नाही कळलं !

वेळ निघून गेली होती , जेंव्हा  रिक्त  झालो तेंव्हा ते उमजलं  .   !!३ !!

 

हा म्हणाला,भेगा पडलेली जमीन ,जीव खायला उठे !

 बायको ,मुलं  ,आई-बाप उपाशी , जातील तरी कुठे ?

मागील वर्साचं साठवलेलं धान्य कधीच संपून गेलं  !

शेतातलं मोठालं झाड, माझ्या जीवाची सुटका करून गेलं  !!४ !!

 

देव चर्चा करू लागले खरंच आत्महत्या श्रेष्ठ कोणाची ?

ऐषोआरामात जगणाऱ्याची कि उपासमारीने हैराण झालेल्याची ?

सर्व टी व्ही चॅनल्स भरभरून ओथंबून वाहणाऱ्याची

की वर्तमानपत्रात कोपऱ्यात  कुठंतरी बातमी आलेल्याची ? !! ५ !!

 

देवदेवता  गोंधळून गेले  ,लक्ष्मीला  कुणीतरी पाचारण केले !

मी तर त्याच्याकडेच  नांदत होते  ,ह्याचा  तर  पत्ताच विसरून गेले !!

चित्रगुप्त  राहिला  उभा  सामोरीपाप -पुण्याचे आलेख घेऊन दोन्ही  !

म्हणे नाही  पापाचे  धनी , ह्या दोघांपैकी  कुणी ही ,    !!६ !!

 

तंटा काही मिटेना ,निवाडा काही होईना !

देव  गेले  वैतागून  ,काय करावे समजेना !!

नारदमुनी आले धावून विनविले  ब्रह्मदेवा !

भूलोकातील  हे  अजब  कोडं, काही करून  सोडवा !!७ !!

 

 

ब्रह्मदेवानी  केला अभ्यास ,संतापाने  उद्विग्न झाले !

दोन्ही  बाजू  ऐकून , निर्णय  देत  उत्तरले !!

हे  तर  हिम्मत हारण्याचं  लक्षण , श्रेष्ठत्वाची कसली करताहेत  अपेक्षा ?

नाही  मिळणार  पुन्हा मनुष्य -जन्म ,नरकात भोगु देत  कठोर शिक्षा   !!८ !!

 

कवी -आनंद नेवगी 

अबु धाबी 

 

No comments:

Post a Comment