Wednesday, November 18, 2020

दिवाळी----सौ .नम्रता नितीन देव

 

दिवाळी

  

मनामनांत हर्षाच्या उजळीत चंद्रज्योती 

आली आली सोनपावलांनी आली दीपावली आली 

 

सप्तरंगांची उधळण करी दारात रांगोळी 

पणत्यांच्या प्रकाशात सारी घरे उजळली 

 

दारोदारी नाना रंगांचे आकाशकंदील झुलती 

किल्ले आणि फटाक्यात बालगोपाळ रमती 

 

सुगंधी तेल उटण्याने अभ्यंगस्नाने झाली 

नव्या पोषाखात सानथोर सारी सजलीधजली 

 

लाडू,करंज्या ,चकल्या आणि खमंग कडबोळी 

अनारश्यांच्या जोडीला राजस शंकरपाळी 

 

अश्या फ़राळाने घरोघरी ताटे भरली सजली 

प्रेमाने शेजारी- पाजारी त्यांची देवघेव झाली 

 

लक्षुमीची करू पूजा गाऊ तिचे गुणगान 

जन्म आणि कर्मभूमीसाठी मागू सुखसमृद्धीचे वरदान 

 

भाऊबीज पाडव्याला हक्काची ओवाळणी 

वाट पाहती घरोघरी साजणी आणि बहिणी 

 

अशी चार दिवसांची दिवाळी येते आणि जाते 

जाता जाता वर्षभरासाठी आनंदाची भेट देते 

 

                                सौ .नम्रता नितीन देव

 

दिवाळी-------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

दिवाळी

आली आली दिवाळी, सुरू करा तयारी

खरेदीला येते उधान, फटाक्यांची तर मज्जाच भारी,
घरादाराची करावी साफसफाई, किल्ला बांधावा रायगडापरी.

आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण करूनी,
मांगल्याचे प्रतीक म्हणून बांधावे दारी.

सारवलेल्या अंगणात, इंद्रधनुच्या रंगांची काढा रांगोळी,
जीवनातही असेच रंग भरो हीच प्रार्थना देवाजवळी.

आसमंत प्रकाशमय करणारा कंदील लावा आभाळी,
कर्तुत्वाचा चमकावा तारा कंदिलाच्या प्रकाशातूनी.

दिवसाची सुरुवात करा उटणे लावून अभ्यंगस्नानानी,
मनातील भेद भाव धुवून निघावा या स्नानातुनी.

आरती ओवाळून तोंड गोड करा तिळाच्या वडीनी,
शब्दांतील गोडवा टिकवावा असेच गोड बोलूनी.

मातीच्या पणतीत लावून दिवा उजळून टाका घरदार,
गरिबांच्या कारागरीला करून सलाम, खरेदी करून द्यावा त्यांना आधार .

गोड आणि खमंग फराळ करून परंपरेचा वारसा चालवावा,
सणासुदीच्या निमित्ताने एकत्र भेटून  नात्यातील गोडवा असाच बहरत रहावा.

पाच दिवसांची दिवाळी करावी आनंदाने साजरी,
थोरामोठ्यांचे आशिर्वाद असावे सतत आपल्यावरी.

आली आली दिवाळी करा जल्लोषाने साजरी..


सौ. अंजली निलेश उज्जैनकर

माझं किनई .......आनंद नेवगी

 

माझं किनई .......

 

 

उगीचच आरशा समोर उभी राहून ,

तू मिष्किलपणे स्वतःशीच हसत असशील .

 

वर्गामधे माझ्याशी नजरानजर टाळशील ,

पण मी वळल्यानंतर मात्र ,मागे पाहत रहाशील.

 

माझी वाट पहात , झाडाला टेकून उभी राहून ,

पायाच्या अंगठ्यानं  उगीचच माती उकरत असशील.

 

पेनानं  आडव्या तिडव्या रेघोट्या मारता मारता ,

नकळत माझ नाव वहीत लिहीत असशील .

 

पत्राची सुरुवात कशी करावी, हे न सुचून ,

पेनानं ओठाशी चाळाच करत बसशील .

 

आठवणीनं माझ्या , अगदी कासावीस होत असशील,

मग पर्स मधून माझा फोटो काढून म्हणत असशील "माझं किनई ......... "

 

कवी : आनंद नेवगी ,अबु धाबी

दिवाळी कालची आणि दिवाळी आजची!!--------- श्रेया पटवर्धन

 

दिवाळी कालची आणि दिवाळी आजची!!

 

साधारण पाचवीत असेन मी ..तेव्हा आम्ही चाळीत राहायचो. चाळीत राहण्याची मजा काही औरच होती .दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर मोठी रांगोळी असायची,सगळ्यात मोठी आणि सगळ्यात रेखीव रांगोळी कोणाची याची काही स्पर्धाच असायची. माझी ताई खूप सुंदर रांगोळी काढायची तेव्हा! रांगोळी ताई काढायची ! पण आई मला बरोबर सव्वा चार वाजता उठवायची...का तर तिथे गेरू लावायचा आणि तो वाळल्यानंतर ताईने सांगितलेले असतील तेवढे ठीपके काढून ठेवायचे... मी लहान होते ना ...मला गपचुप ते करायलाच लागायचं. मग ताई छानपैकी पाटावर बसून रांगोळी काढायची.... पांढरी रांगोळी काढून झाली की मग डिस्कशन असायचं की आता कुठचे रंग भरायचे आहेत?? जर तो शेप मोठा असेल तरच मला रंग भरायला मिळायचा नाही तर ताई म्हणायची की तू नीट नाही भरणार ...इथे फक्त बसून बघ! तीन ....साडे तीन तासांनी ती रांगोळी उत्तम प्रकारे तयार असायची. सगळ्यात मोठी जबाबदारी तर नंतरची की कोणी त्या रांगोळीवर पाय तर देत नाहीये ना .....अचानक मध्येच कुत्रा मांजर येऊन रांगोळीवर बसत तर नाहीये ना! दिवसभर ताईच्या रांगोळीची तारिफ व्हायची! किती छान होते ते दिवस आणि किती सुंदर आहेत त्या आठवणी!!!!

 

मग काही वर्षांनी ताईचं लग्न झालं आणि रांगोळी काढायची जबाबदारी माझ्यावर आली. खरं तर त्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मला आनंद झाला होता की अरे वा !आता रांगोळी मी काढणार.. पण रांगोळी काढायला सुरुवात केली आणि मला मुसमुसून रडायला आलं आणि ताई ची खूप आठवण आली.

तेव्हा कळलं नुसती रांगोळी काढण्यात काहीच मजा नाही ,जेव्हा आपली ताई आपल्याबरोबर असते त्यातच ती मजा आहे.

 

बदलत्या परिस्थितीनुसार मग आम्ही चाळीतून फ्लॅटमध्ये shift  झालो मग काय रांगोळी काढायची जागाच बदलली घराच्या बाहेर अगदी छोटीशी जागा होती ,त्रिकोणी रांगोळी काढायला लागायची... आणि काढलेल्या रांगोळी ची तारीफ करायला कोणीच नसायचे सगळ्यांचे दरवाजे फ्लॅट संस्कृतीमुळे कायम बंद असायचे. म्हणतात ना कौतुक करायला जर कोणी नसले तर काम करण्याची पण इच्छा होत नाही तसं झालं माझं ,अगदी छोटीशी नावापुरती रांगोळी मी काढायला लागले. आईला म्हटलं अगं चाळच किती चांगली होती ,तिथे किती छान जागा होती... 

 

काळ पुढे सरकत गेला ....मी मोठी झाले आणि माझंही लग्न झालं मग काय परत आई वरती वेळ आली रांगोळी काढायची! दिवाळसणाचा तो दिवस होता मी घरी गेले बघितलं तर दारावरती फक्त दोन स्वस्तीक काढलेली होती! आईला म्हटलं  छोटीशी तरी रांगोळी काढायचीस ना तू...

 

आई हसत म्हणाली अगं माझे पाय दुखतात आता ...इतकं ओणवं बसून मी कशी काढणार तुमच्यासारखी मोठी रांगोळी? मलाही जाणवलं की आता आपल्या  आाईला नाही जमणार .

 

घरात गेले आणि साईड टेबल वरती लक्ष गेलं आईने कार्डबोर्ड वरती अतिशय सुंदर जशी मी आणि माझी ताई काढायची तशीच रांगोळी काढून त्यात रंग भरले होते .मला म्हणाली अगं खाली बसून नाही पण खुर्चीवर बसून मी काढलीय रांगोळी.... 

 

खूप मस्त वाटलं मला ती रांगोळी बघून ...दिवाळी कालची आणि दिवाळी आजची ! पण रांगोळी जशीच्या तशी!!!

 

 

श्रेया पटवर्धन

 


तारका .......श्रेया पटवर्धन

 

तारका .......

अगदी आत्ताच हवेत गारवा जाणवू लागला होता .
बाहेर बघितलं तर मस्त वारा सुटला होता .
गार वार्‍याच्या स्पर्शाने मन शहारून आले .
मनात म्हटलं चला थोड फिरून येऊ .
हल्ली कोरोनाच्या धास्तीमुळे बाहेर पडावं असं वाटतच नाही .
तरी मास्क लावला आणि पडले बाहेर !
घड्याळावर नजर पडली तर अकरा वाजत आले होते .
life
फार secured आहे हो Abudhabi मधे !
इथे म्हणजे कधीही बाहेर पडा भीतीच काहीच कारण नाही .
समोरच गार्डन मध्ये आले आणि एका बाकावर जाऊन बसले .
सगळी झाडे चंदेरी रंगाची भासत होती .
जणूकाही सगळ्यांनी चंदेरी रंग न्याला आहे .
आकाशीच्या तारकांचा प्रकाश सर्वत्र पसरला होता ..
मोहून गेले मी त्या शीतल प्रकाशात ...
किती सुंदर दिसत होत्या तारका ....
इतक्या दूरवरून पण माझ्यापर्यंत प्रकाशाची उधळण करत होत्या .
मनात म्हटलं या तारकांसारख आपल्यालाही वागता आलं पाहिजे .
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नसुन पण प्रकाशत राहिले पाहिजे .
मी आणि फक्त मी !
अर्ध आयुष्य फक्त माझाच विचार करण्यात व्यतीत होतं ....
त्या तारकांच सगळच जीवन फक्त प्रकाशमान होण्यात जातं .......
किती स्वावलंबी आहेत तारका.....
मनात विचार आला सतत आपल्या गरजा वाढत असतात ,
अगदी मरेपर्यंत काहीतरी इच्छा असतेच !
चला हे परावलंबी विचार आता थांबवूया ....
ह्या तारकांसारखे तेजपुंजाळत दुसऱ्यालाही आनंद देऊया .......


श्रेया पटवर्धन

मला गवसलेली नवदुर्गा माझी आई ......श्रेया पटवर्धन

 

मला गवसलेली नवदुर्गा माझी आई ......

काय धैर्य होतं तिच्यामध्ये ,जणूकाही तिने ध्यासच घेतला होता.... आपल्या मुलींना उत्तम शिकवून मोठं करायचं. ती फार शिकलेली नव्हती पण खूप जिद्द होती तिच्या अंगात! आम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं तिला.
त्यावेळची परिस्थिती अगदी जेमतेम होती आणि तीन मुली तिच्या पदरात होत्या. पण डगमगली नाही ती.
आयुष्यभर खूप काटकसर केली तिने. कसली हौस मौज नाही ..सोनंनाणं नाही. पण आमची प्रगती पुस्तकं बघितल्यानंतरचा तो आनंद तिच्या डोळ्यात दिसायचा मला...
ती म्हणायची मजा नंतर करता येईल पण शिक्षण आणि संस्कार नंतर घेता येणार नाहीत.आम्हा तिघींना उत्तम घडवलं तिने. अगदी तिच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या पायावर उभ्या राहिलो.
अजुनही आठवतोय क्षण मला ,माझ्या मोठ्या बहिणीचा पहिला पगार आणि त्यातून तिने आईला आणलेली साडी! किती ते समाधान आणि किती वाटत होता तिला तो अभिमान!
आम्हाला स्वावलंबी करण्यासाठी तिच्या सगळ्या इच्छा तिने कुठेतरी अंतर्मनात बंद करून ठेवल्या होत्या.
आमचं उत्तम चाललेलं बघून हळूहळू तिची कळी खुलायला लागली. मग आम्ही सुद्धा आमच्या देवीची खूप आराधना केली ,देवी म्हणजे आमची आई. किती रूपे धारण केली तिने ..... प्रसंगी चण्डिके सारखी रागीट तर कधी रेणुके मातेसारखी कोमल ......

प्रणाम तिच्या रुपांना
देवीरूपी आई तू..
मला जन्म दिलास तू...
किती कष्ट सोसलेस तू....
मजसाठी जीवन अर्पिलेस तू....
माझ्या श्वासात तू ....
माझ्या ध्यासात तू...
मला गवसलेली नवदूर्गा तू....


श्रेया पटवर्धन

नरकासुर वध--------रुपाली मावजो किर्तनी

 

नरकासुर वध

 

गेले काही दिवस मन अस्वस्थ होतं. दिवाळी येतेय पण काय करावं सुचत नव्हतं.  दर वर्षी दिवाळीला  मी सगळ्यांना बोलवायचे, गोव्याच्या पद्धतीनुसार पोह्यांचे वेगवेगळे प्रकार करायचे,माझं घर कसं भरलेलं असायचं आणि एक वेगळंच समाधान मिळायचं.

ह्या वर्षी कुणाला बोलवू शकणार नाही ह्या विचारानेच मन अशांत होतं.

अश्या वेळी खूप वाटतं की आपण दिवाळीला आपल्या गावी असायला हवं होतं.

दिवाळी किंवा दीपावली हा कदाचित एकाच असा सण असेल जो आपल्या देशाच्या प्रत्येक प्रांतात साजरा केला जातो.  पद्धती वेगळ्या नक्कीच असतील पण भावना मात्र एकच. हा दीपोत्सव एक वेगळाच आनंद सोबत घेऊन येतो, वाटतं जणू आकाशातील सर्व तारे पृथ्वी वर उतरले आहेत. उटण्याचा सुगंध, रंगोळीतले रंग, आकाशा कडे बघणारे कंदील, झगमगीत दिवे आणि पोह्यांचे विविध प्रकार... दिवाळी कशी शोभून दिसायची. दिवाळीची शोभा वाढवणारा अजून एक प्रकार जो फक्त गोव्यात अजूनही दिसतो  तो म्हणजे कृष्णाच्या हाती नरकासुराचा वध.  हा प्रकार भारतात आणि कुठे आहे असं माझ्या तरी महितीत नाही.

'गोवा' म्हणलं की प्रत्यकाला ख्रिसमस आठवतो. पण दिवाळीचं वेगळेपण जास्त कुणाला माहिती नाही. इतर राज्यांप्रमाणे दिवाळीत इथं झगमगाट असतोच. पण उत्तर भारतात दसऱ्याला जसं रावण दहन असतं, तसंच गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं.

धानोत्रयोदशीच्या रात्री, अंधार पडताच प्रत्येक गल्लीत नरकासुर दिसायला लागतात...  या दिवशी अक्राळविक्राळ नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन ह्याचं सर्वानाच मोठं आकर्षण असतं.  गावोगावी प्रत्येक चौकात मोठे मोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे आणि त्यानुसार एक छोटा मुलगा  बाळकृष्ण बनून ह्या नारकसुरशी युद्ध साधतो. नरकासुर आणि कृष्णाचं युद्ध रात्र भर गल्लो गल्ली चालतं आणि पहाटे नरकासुराला जळवलं जातं. गोव्यात नरकासुराच्या प्रतिमेचं दहन करण्याची परंपरा तशी खूप जुनी नाही... नरकासुर कृष्ण युद्ध बघताना अंगावर शहारे येतात. हे नरकासुर किमान तीन मजली इमारती एवढे मोठे असतात . माझ्या लहानपणी मला आठवतं, नरकासुर नाचवण्यासाठी तालमी असायच्या आणि एक वेळी 6 ते 8 लोकं आपल्या खांद्यावर घेऊन नरकासुर नाचवायचे. ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर ताजं टवटवीत आहे.

दिवाळीचा दिवस म्हणजे 'नरक चतुर्दशी'.पहाटे झालेल्या नरकासुर दहन नंतर अभ्यंग स्नान आणि घरच्या सगळ्यांची दिव्यांची ओवाळणी केली जाते. दिवाळीच्या फराळाची लज्जत खूप निराळी असते. कृष्णाला पोहे आवडायचे म्हणून प्रत्यकाकडे किमान पाच प्रकारचे पोहे बनवले जातात आणि ओवाळणी नंतर सगळे एकत्र बसून ह्या पोह्यांचा फराळ करतात. आकाश कंदील आणि दिवे प्रत्येक घरात लागतातच.

अशी दिवाळी फक्त गोव्यात बघता येते. 

ह्या वर्षी मात्र गल्लोगल्ली नरकासुर दिसणार नाहीत...

पण लोकांच्या उत्साहाला दाद द्यावीशी वाटते मला. काल फेसबुक वर  मिनी नरकासुर पाहिले... गल्लोगल्ली च्या ऐवजी घरोघरी नरकासुर बनायला लागलेत...प्रत्येक जण तयारीला लागलाय. ते मिनी नरकासुर बघून माझं अशांत मन जरा शांत झालं. खरंच, उत्साह मरू न देता लोकं अंधारातून वाट काढायला लागलेत. 

एकच विचार आला, नरकासुर मिनी होऊदेत, कृष्ण मोठे हवेत. घरोघरी नरकासुर बनूदेत, त्याचा नाश करणारे कृष्ण पण घरोघरी हवेत. शेवटी सण साजरा करायला लागतो तो उत्साह - तो तर आहेच. जग भर पसरलेला हा अंधार दूर करण्यासाठी प्रार्थना करूया आणि एक खास दिवा पेटवूया.

 

 

-रुपाली मावजो किर्तनी