नरकासुर वध
गेले काही दिवस मन अस्वस्थ
होतं. दिवाळी येतेय पण काय करावं सुचत नव्हतं.
दर वर्षी दिवाळीला मी सगळ्यांना
बोलवायचे,
गोव्याच्या पद्धतीनुसार पोह्यांचे वेगवेगळे प्रकार करायचे,माझं घर कसं भरलेलं असायचं आणि एक वेगळंच समाधान मिळायचं.
ह्या वर्षी कुणाला बोलवू
शकणार नाही ह्या विचारानेच मन अशांत होतं.
अश्या वेळी खूप वाटतं की
आपण दिवाळीला आपल्या गावी असायला हवं होतं.
दिवाळी किंवा दीपावली हा
कदाचित एकाच असा सण असेल जो आपल्या देशाच्या प्रत्येक प्रांतात साजरा केला
जातो. पद्धती वेगळ्या नक्कीच असतील पण
भावना मात्र एकच. हा दीपोत्सव एक वेगळाच आनंद सोबत घेऊन येतो, वाटतं जणू आकाशातील सर्व तारे पृथ्वी वर उतरले आहेत.
उटण्याचा सुगंध, रंगोळीतले रंग, आकाशा कडे बघणारे कंदील, झगमगीत दिवे आणि पोह्यांचे विविध प्रकार... दिवाळी कशी
शोभून दिसायची. दिवाळीची शोभा वाढवणारा अजून एक प्रकार जो फक्त गोव्यात अजूनही
दिसतो तो म्हणजे कृष्णाच्या हाती
नरकासुराचा वध. हा प्रकार भारतात आणि कुठे
आहे असं माझ्या तरी महितीत नाही.
'गोवा' म्हणलं की प्रत्यकाला ख्रिसमस आठवतो. पण दिवाळीचं वेगळेपण
जास्त कुणाला माहिती नाही. इतर राज्यांप्रमाणे दिवाळीत इथं झगमगाट असतोच. पण उत्तर
भारतात दसऱ्याला जसं रावण दहन असतं, तसंच गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं.
धानोत्रयोदशीच्या रात्री, अंधार पडताच प्रत्येक गल्लीत नरकासुर दिसायला
लागतात... या दिवशी अक्राळविक्राळ
नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन ह्याचं सर्वानाच
मोठं आकर्षण असतं. गावोगावी प्रत्येक
चौकात मोठे मोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. या दिवशी
श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे आणि त्यानुसार एक छोटा मुलगा बाळकृष्ण बनून ह्या नारकसुरशी युद्ध साधतो.
नरकासुर आणि कृष्णाचं युद्ध रात्र भर गल्लो गल्ली चालतं आणि पहाटे नरकासुराला
जळवलं जातं. गोव्यात नरकासुराच्या प्रतिमेचं दहन करण्याची परंपरा तशी खूप जुनी
नाही... नरकासुर कृष्ण युद्ध बघताना अंगावर शहारे येतात. हे नरकासुर किमान तीन
मजली इमारती एवढे मोठे असतात . माझ्या लहानपणी मला आठवतं, नरकासुर नाचवण्यासाठी तालमी असायच्या आणि एक वेळी 6 ते 8
लोकं आपल्या खांद्यावर घेऊन नरकासुर नाचवायचे. ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर
ताजं टवटवीत आहे.
दिवाळीचा दिवस म्हणजे 'नरक चतुर्दशी'.पहाटे झालेल्या नरकासुर दहन नंतर अभ्यंग स्नान आणि घरच्या
सगळ्यांची दिव्यांची ओवाळणी केली जाते. दिवाळीच्या फराळाची लज्जत खूप निराळी असते.
कृष्णाला पोहे आवडायचे म्हणून प्रत्यकाकडे किमान पाच प्रकारचे पोहे बनवले जातात
आणि ओवाळणी नंतर सगळे एकत्र बसून ह्या पोह्यांचा फराळ करतात. आकाश कंदील आणि दिवे
प्रत्येक घरात लागतातच.
अशी दिवाळी फक्त गोव्यात
बघता येते.
ह्या वर्षी मात्र
गल्लोगल्ली नरकासुर दिसणार नाहीत...
पण लोकांच्या उत्साहाला
दाद द्यावीशी वाटते मला. काल फेसबुक वर मिनी
नरकासुर पाहिले... गल्लोगल्ली च्या ऐवजी घरोघरी नरकासुर बनायला लागलेत...प्रत्येक
जण तयारीला लागलाय. ते मिनी नरकासुर बघून माझं अशांत मन जरा शांत झालं. खरंच, उत्साह मरू न देता लोकं अंधारातून वाट काढायला लागलेत.
एकच विचार आला, नरकासुर मिनी होऊदेत, कृष्ण मोठे हवेत. घरोघरी नरकासुर बनूदेत, त्याचा नाश करणारे कृष्ण पण घरोघरी हवेत. शेवटी सण साजरा
करायला लागतो तो उत्साह - तो तर आहेच. जग भर पसरलेला हा अंधार दूर करण्यासाठी
प्रार्थना करूया आणि एक खास दिवा पेटवूया.
-रुपाली मावजो किर्तनी
No comments:
Post a Comment