मला गवसलेली नवदुर्गा माझी
आई ......
काय धैर्य होतं तिच्यामध्ये ,जणूकाही तिने ध्यासच घेतला
होता.... आपल्या मुलींना उत्तम शिकवून मोठं करायचं. ती फार शिकलेली नव्हती पण खूप
जिद्द होती तिच्या अंगात! आम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं तिला.
त्यावेळची परिस्थिती अगदी
जेमतेम होती आणि तीन मुली तिच्या पदरात होत्या. पण डगमगली नाही ती.
आयुष्यभर खूप काटकसर केली
तिने. कसली हौस मौज नाही ..सोनंनाणं नाही. पण आमची प्रगती पुस्तकं बघितल्यानंतरचा
तो आनंद तिच्या डोळ्यात दिसायचा मला...
ती म्हणायची मजा नंतर करता
येईल पण शिक्षण आणि संस्कार नंतर घेता येणार नाहीत.आम्हा तिघींना उत्तम घडवलं
तिने. अगदी तिच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या पायावर उभ्या राहिलो.
अजुनही आठवतोय क्षण मला ,माझ्या मोठ्या बहिणीचा पहिला पगार आणि त्यातून तिने आईला
आणलेली साडी! किती ते समाधान आणि किती वाटत होता तिला तो अभिमान!
आम्हाला स्वावलंबी
करण्यासाठी तिच्या सगळ्या इच्छा तिने कुठेतरी अंतर्मनात बंद करून ठेवल्या होत्या.
आमचं उत्तम चाललेलं बघून
हळूहळू तिची कळी खुलायला लागली. मग आम्ही सुद्धा आमच्या देवीची खूप आराधना केली ,देवी म्हणजे आमची आई. किती रूपे धारण केली तिने .....
प्रसंगी चण्डिके सारखी रागीट तर कधी रेणुके मातेसारखी कोमल ......
प्रणाम तिच्या रुपांना
देवीरूपी आई तू..
मला जन्म दिलास तू...
किती कष्ट सोसलेस तू....
मजसाठी जीवन अर्पिलेस तू....
माझ्या श्वासात तू ....
माझ्या ध्यासात तू...
मला गवसलेली नवदूर्गा तू....
श्रेया पटवर्धन
No comments:
Post a Comment