Friday, May 25, 2018

माझा महाराष्ट्र



मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

प्रणाम आमुचा हा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा
1947 ला भारत स्वतंत्र झाला पण मराठी माणसाचे स्वतःचे राज्य निर्माण होण्यासाठी 1960 उजाडावे लागले.
गोवा, बेळगाव, कारवार, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी यासाठी जवळपास 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि ह्या लढ्यातून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.

उत्सव हा प्राणांचा असा साजरा व्हावा
जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा
सांडिले रूधिर जयांनी महाराष्ट्रासाठी
जन्म तयांचा फिरूनी महाराष्ट्रीच व्हावा

महाराष्ट्राची महानता कशात आहे असे कोणी विचारले तर मी म्हणेन त्याच्या नावातच त्याचे उत्तर लपले आहे. ऋग्वेदात ‘राष्ट्र’ असा महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे. स्वातंत्र्यानंतर एक राज्य असूनही महाराष्ट्राचे नाव तसेच कायम ठेवण्यात आले याचे कारण या मायमराठी मातीची महान परंपरा व योगदान आहे. भारत देश जर तलवार असेल तर महाराष्ट्र त्याची वज्रमूठ आहे.

आचार्य अत्रे म्हणतात, इतर राज्यांना भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा महाराष्ट्राला लाभला हे आपले अहोभाग्यच म्हणावे लागेल. संन्याशाचे पोर म्हणुन ज्याला हिणवले गेले त्या संत ज्ञानेश्वरांनी अमृतातेही पैजा जिंकणारी ‘भावार्थ दीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली.
संत रामदास, संत तुकाराम, संत नामदेव, राष्ट्रसंत गाडगेबाबांसारखी विशाल संतपरंपरा लाभलेला माझा महाराष्ट्र.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले, रँग्लर परांजपे, सेनापती बापट, महात्मा धोंडो केशव कर्वे, यांच्यासारख्या नररत्नांची खाण आहे माझा महाराष्ट्र.

केशवसुत, बालकवी, पु.ल देशपांडे, आचार्य अत्रे, शांता शेळके, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, व.पु.काळे, गदिमा, ना धो. महानोर, मंगेश पाडगावकरांच्या साहित्याने, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरी अमोणकर, सुधीर फडके, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाने तर दत्ता डावजेकर, हृदयनाथ मंगेशकर, सुधीर भट यांच्या सारख्या दिग्गज संगीतकारांच्या सुमधूर संगीताने भारला आहे माझा महाराष्ट्र.

पोवाडा, जाखडी, लावणी, नाट्यगीते, भारूड, कोळी गीतांच्या तालावर डोलतो माझा महाराष्ट्र अन् पैठणी, नारायण पेठ, नऊवारी नेसून नथ, बुगडी, ठुशी, पाटल्या तोड्यांचा साज ल्यातो माझा महाराष्ट्र.

हिरव्यागार सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांचा थाट, नागमोडी वळणांची घाटातली वाट, कोकणचा हापूस आंबा, मनमोहक सागरी किनारा तर पावसाळ्यातील विलोभनीय चिखलदरा, म्हणजे माझा महाराष्ट्र.

पुरणपोळी, मोदक, अळूवडी, बटाटा वडा, कांदे पोहे ते तांबडा पांढरा रस्सा, सावजी अन आईच्या हातचा मऊ वरण भात म्हणजे माझा महाराष्ट्र.
पाच ज्योतिर्लिंगे, साडे तीन शक्तिपीठे आणि अष्टविनायकांचा आशिर्वाद म्हणजे माझा महाराष्ट्र.

अत्यंत अभिमान वाटतो अशा या लाल मातीचा म्हणुनच  मुजरा करते मी तिला मानाचा.
सदैव अखंड राहो हा महाराष्ट्र माझा.

जय महाराष्ट्र

डॉ. पल्लवी प्रसाद बारटके



 

No comments:

Post a Comment