प्रत्येक गोष्टीतून आपण काय ना काय शिकत असतो, फक्त त्या गोष्टी कडे बघण्याचा
आपला दृष्टिकोन कसा असतो ह्यावर सगळं अवलंबून असतं आणि तेव्हाच आपण शिकू शकतो. मला
नेहमी असं वाटतं की माझ्या सभोवताली असलेली प्रत्येक गोष्ट मला शिकवत असते आणि मला
एक वेगळी दिशा दाखवते.
सभोवताली माझ्या ….
सभोवताली माझ्या
जगावं कसं , मी शिकले
चंद्र -सुर्य , झाडं फुलांनी
नदी, मेघांनी शिकवले
नदीकडूनी शिकले मी
वाहत कसे राहावे
बेरंग असूनी प्रवाह सुद्धा
निळेशार कसे दिसावे
झाडांकडूनी शिकले मी
सावली देण्यास डोलावे
सुकून जरी गेले तरीही
जळण होऊनी जळावे
फुलांनीनी मला शिकविले
परीमळ पसरत फुलावे
चोखुन काढला मध तरीही
मधाळ कसे उरावे
चंद्राकडूनी शिकले मी
काळोखात उठून दिसावे
किरणांचा घेउन प्रकाश
सर्वोपरी कसे पोचावे
सूर्याने मज शिकवले
रखरखीत केंव्हा राहावे
तापावे कधी शितल होवे
अन कोमल कधी व्हावे
मेघांकडूनी मी शिकले
आकाशभर पसरावे
काळे असुदे वा पांढरे
आशा देत राहावे
वाटेकडूनी शिकले मी
दिशा दाखविण्यास जगावे
नागमोडी वळणावर सदैव
साथ देत राहावे
दिशा दाखवणारी वाट असो
वा वाहणारा वारा काय
सभोवतालचा निसर्ग मजला
सदोदित शिकवतच जाय
---रुपाली मावजो किर्तनी
No comments:
Post a Comment