- फादर्स डे -
आईची महती साऱ्या जगाने गायली
बापाची माया कायम दुय्यमच ठरली
आईच्या प्रेमासाठी साऱ्या म्हणी सारी गाणी
अपवाद म्हणुन पुराणात शकुंतला -कण्व मुनी
आणि आता भावलेली ' दमलेल्या बाबाची कहाणी '
निसर्गनियमानुसार तो बाळाला जन्म देत नाही
म्हणुन काही त्याचे प्रेम कमी ठरत नाही
तो पण लेकरावरती जीवापाड प्रेम करतो
त्याच्या उज्वल भविष्यासाठी वर्तमानात राबतो
धावपळीच्या आयुष्यात बाळाच्या सहवासाला मुकतो
बाळाचे पहिले पाऊल ,पहिला बोल चुकला म्हणुन झुरतो
बाबाचा धाक म्हणुन थोडंफार रागावतो
रुसुन झोपलेल्या लेकराला
मग हळुच कुशीतही घेतो
बाळाच्या आजारपणात आईसारखा तोही हळवा होतो
तिच्यासोबत तोही मग रात्र रात्र
जागतो
लेक सासरी निघाल्यावर आतून तोही रडत असतो
आईसारख्या त्याच्या भावना
तो दाखवू शकत नसतो
सांगा बरं मग आईपेक्षा बाबा कुठे कमी पडतो ?
म्हणुनच मदर्स डे बरोबरच फादर्स डे ही असतो
सौ.नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment