Saturday, September 29, 2018

विविध रूपे माय मराठीची


भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, 
मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते.आपण ज्या भागात राहतो, त्या राज्याचा आणि परिसराचा आपल्या
 मराठी बोलण्याच्या पद्धती वर परिणाम होत असतो. त्यामुळे कुठे बाहेर राहत असताना कोणी मराठी बोलताना दिसलं कि पहिला प्रश्न येतो " कुठली मराठी ".  मराठी भाषा, व्याकरण एकच असलं तरी गावांनुसार त्याच नांव बदलत. उदा. कोकणी मराठी, अहिराणी मराठी, नागपूरी
 मराठी, कोल्हापूरी मराठी आणि अजून किती तरी. ह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले
 अनेक शब्द आलेले दिसतात,  जे लहान शब्दकोषात  सापडतीलच असे नाही. भाषा कोसांवर बदलते तर  कधी फर्लांगा वर बदलते.

मुंबई ची भाषा आता सरमिसळ झाली आहे. त्यात हिंदी भाषिकांना समजावे असे शब्द दिसतात. कोकण भागात ज्या प्रमुख
 भाषा बोलल्या जातात त्या म्हणजे आगरी, कोकणी, मालवणी. तरी ही यामध्ये जिल्ह्यावर काही फरक पडतोच. मुंबईहून आपण निघालो गोव्याला जाण्यासाठी तर याचा छान प्रत्यय येतो.

आमच्या इकडे रायगड जिल्ह्यात आपल्या मित्राशी बोलायची सुरुवातच " काय रे " अशी होते. माझे किती तरी मित्र मैत्रिणी आजही  अगदी सोशल मीडिया वर जरी  भेटले तरी पहिला प्रश्न हाच असतो  " काय रे, कसा आहेस रे?"  थोडे पुढे गेलो तर

 आपल्याला हेल काढून काढून बोलणारा भेटतो. मला स्वतःला काही शब्द खूप आवडतात. ते म्हणजे आपण " तसं नाही" असं म्हणतो पण रत्नागिरी जिल्ह्यात  " तसं नव्हे" म्हणतात.  अजून एक खास गोष्ट,  खूप दिवसांनी जर  कोणी भेटले तर " मेल्या आहेस कुठे तू"? आणि मग सुरु होतेती मालवणी. या भाषे बद्दल काय बोलणार? गंगाराम गवाणकर,
 मच्छिन्द्र कांबळी या दोघांनी " वस्त्रहरण " नाटक देऊन मालवणी भाषा किती समृद्ध आहे हे दाखवून दिलंय.

कोल्हापुर भागात बोलली जाणारी कोल्हापुरी बोली आहे. बोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही गरीब, खेडवळ, अस्सल
 शेतकऱ्याची बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब याभागात आढळते. भाषेत रांगडेपणा आणि प्रेमळता   असते.  मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून  ओंळखली जाते,

नागपूरी भाषेच्या उल्लेखा शिवाय विषय पुरा होणे नाही. एका वाक्यात दोन क्रियापद एकत्र करून बोलणे" काय करून राहिल
 बे तू ?" आमच्या एका सरांकडे कधी गेलो कि ते "बैस" म्हणायचे, खूप दिवस ते कळतंच नव्हतं, नंतर समजलं की बोलायची
 पद्धत आहे.

वऱ्हाडी, मालवणी, खानदेशी, अहिराणी, नागपुरी आदी बोलीभाषा ही मराठी भाषा समृद्ध करणारी सौंदर्यस्थळे आहेत. 
महाराष्ट्रात बोलीभाषांचा मोठा विविधढंगी फुलोरा पाहायलामिळतो.

हल्लीच्या दूरदर्शन मालिका किंवा चित्रपटांमुळे काही काही शब्द आपण तसेच्या तसे घेतले आहेत. उदाहरण द्यायचं झाले तर,

 "लय भारी ", "चालतंय की", "काय राव " आणि खूपखूप. ते कुठून आले यापेक्षा ते शब्द आपले झाले.

या सगळ्या भाषांचे प्रकार, बोलीभाषेचे आणि आपल्या सगळ्यांना समजावून सांगणारे साहित्यिकांचे असंख्य उपकार आहेत.

 अगदी बहिणाबाईंपासून ते नारायण सुर्वे आणि अजूनकितीतरी. एका भाषे बद्दल लिहावंच लागेल ती म्हणजे "बेळगावी" .हि भाषा कोकणी, कोल्हापुरी, कन्नड यांचं सुंदर मिश्रण आहे. पु.ल. नी रंगवलेला " रावसाहेब" चांगलाच  लक्षात राहिलाय.  अलिकडे  प्रकाश संत यांचा "वनवास, पंखा "  असा  चार पुस्तकांचा संच प्रकाशित झाला ,  त्यांचा हिरो " लंपन " बेळगावी च आहे.

अनुभव, आवडलेला आणि जिथे आगरी भाषा बोलली जाते तिथला एक किस्सा जो सर्वत्र बघायला मिळतो. शाळेत 

जाणे महत्वाचे असतेच पण त्या जोडीला वडिलांना त्यांच्यापारंपरिक व्यवसायात मदत करणे. दोन्ही करताना त्या मुलाची 
कशी गम्मत (कसरत) होते. मास्तर & तो मुलगा यांचे संवाद

मी चवतीन होतो.
सकाली उटलो. आंग धवला. च्या न बटर खाल्ला.
पलत शालन झेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायपुन दिसना.
कसातरी खाली बसलो. हजेरी चाल्लीवती.
 
मास्तर वरडलं
"
आत्ताच आयलो न" मी
"
हं दिसतय मना."
"
पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं
"
 अर तुझ्या उट न कालचा धरा वाचुन दाकीव. "
माजे पोटान गोला उटला. चवतीन होतू तरी वाचाला जमत न्हवता. मी उबाच.
"
काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्या" मास्तर
"
बापासचे बरब खारीवर कोलब्या न चिम्बोर्या पकराला जेलेलो."
"
बापासला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय क समजला ?"

या सगळ्या बोली भाषा, त्यांचा लहेजा, तो बाज आपण सगळ्यांनी जपावा, तर या भाषांना परत एकदा बहर येईल.


मनोज करंदीकर 


 
 

 
 

 
 

 
 
 

Tuesday, September 25, 2018

ऑपरेशन जिन्ना


ऑपरेशन जिन्ना
लेखक:       शिव अरुर
प्रकाशक:      जगरनॉट बुक्स
पाने:         २९५
प्रकाशन:      सन २०१७ 
भाषा:        इंग्रजी

पूर्वी भारताने पाकिस्तान मध्ये गुप्त सैनिक कारवाई केली होती पण ही गोष्ट कोणालाही कळू दिली गेली नव्हती. भारतीय नौदलाच्या या कारवाईत पाकिस्तानचा जिन्ना नाविक तळ उध्वस्त करायचा होता. पण क्षेपणास्त्र जिन्ना नाविक तळावर बरसण्या आधी काही सेकंद ही कारवाई रद्द केली गेली होती. त्या घटने नंतर दहा वर्षांनी भारतीय नौदल प्रमुख राणांच्या मुलीचे काश्मीर मधून अपहरण केले जाते.

ऑपरेशन जिन्ना आयत्यावेळी का रद्द केले गेले? हे गुप्त मिशन नक्की काय होते? एखाद्या मंत्र्या ऐवजी नौदल प्रमुखांच्या मुलीचे अपहरण का केले गेले? भारत प्रतिटोला देईल का?

हे पुस्तक एक सैनिकी थरारनाट्य आहे. यात भरपूर हाय ऑक्टेन ऍक्शन आहे, नखे खायला लावणारी परिसीमा आहे, पाकिस्तानात गुप्त कारवाई आहे, देशाभिमान आहे, आंतरराष्ट्रीय तणाव आहे आणि चांगली कथा पण आहे. या मध्ये थ्रिल आहे, अनपेक्षित घटना व मोहक दृश्ये आहेत , शस्त्रास्त्रे आणि विमानाचे तांत्रिक ज्ञान आहे, खुसखुशीत गोष्ट आहे, कथेची अस्सल मांडणी आहे, भरपूर ऍक्शन आहे. थोडक्यात काय तर हा एक आनंददायी वाचनानुभव आहे. एक उत्कृष्ठ थरार.

 

या कथेची पात्ररचना सयुक्तिक आहे. ऍडमिरल निर्भय राणा एक बेलगाम, चाकोरीबाहेर जाणारा देशभक्त आहे. वरुणा ही त्यांची एकूलतीएक मुलगी आहे. अनाथ मुलगा लेफ्टनंट कमांडर थॉमस हा एक कमांडो आहे. लेफ्टनंट विक्रमादित्य सिंग हाही एक कमांडो आहे. मुलगा म्हणून जन्माला येऊन स्वेच्छेने मुलगी बनलेली लेफ्टनंट सरस्वती सुब्रमण्यमसुद्धा कमांडो आहे. भारताचे पंतप्रधान पाकिस्तानला कडक उत्तर देऊ इचछीत आहेत आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव झेलायची त्यांची तयारी आहे. प्रत्येक पात्र या कथेचे मूल्य वृद्धिंगत करते.

लेखकाने वेगवेगळ्या शस्त्रांची आणि विमानांची रेखाटने या पुस्तकात अंतर्भूत केली आहेत. या पुस्तकाचे हे नावीन्य आणि खासियत आहे. हा बदल स्वागतार्ह आहे.

लेखक ही कथा विणताना अनेक धागे वापरतो. मात्र यातील काही धागे सुटे राहून जातात. उदाहरणार्थ संपर्क व्यक्ती भारतीयांची मदत का करते? संपर्क व्यक्तीला आपलेसे कसे केले जाते? एवढी मोठी सुवर्णसंधी असताना भारत शेवट पर्यंत का जात नाही? हे आणि असे सुटे धागे जर लेखकाने कथेमध्ये नीट विणले असते तर ही त्रुटी राहून गेली नसती.

शिव अरुर एक प्रतिथयश टीव्ही वार्ताहर आहे. हे लेखकाचे पहिले पुस्तक आहे. पहिले पुस्तक असूनही लेखकाने सफाईदार लेखन केले आहे आणि आपला नवखेपणा दिसू दिला नाही. शिव अरुरची आणखी पुस्तके वाचायला मला नक्की आवडेल.

 

मी हे पुस्तक का वाचले:           शीर्षक आणि ब्लरब
काय आवडले नाही:          सुटे धागे
काय आवडले:              कथाकथन, माहिती.
शिफारस:                 उत्तम पुस्तक. जरूर वाचा..


मंदार आपटे

Saturday, September 8, 2018

पुस्तक परीक्षण :- ऑपरेशन डीप स्ट्राईक


ऑपरेशन डीप स्ट्राईक
लेखक: राहुल बदामी
प्रकाशक: लेखक स्वतः
पाने: २८९
प्रकाशन: सन २०१७
भाषा: इंग्रजी

            भारताचे नवीन पंतप्रधान, इनामदार, पाकिस्तानच्या दक्षिण किनाऱ्यावर  छुपा हल्ला करायला परवानगी देतात. लक्ष्य? बाबर ३ क्षेपणास्त्रे . हल्ला करणाऱ्यांचा नायक आहे अरमान अहमद आणि त्याचे सहकारी आहेत बलदेव, रोशन व हितेश.या ऑपरेशनचालवकरच बोजवारा उडतो आणि त्यांना खोलात शिरावं लागतं. पाकिस्तान मध्ये चार मोठ्या अतिरेकी संघटना /११ पेक्षा मोठा हल्ला करण्याचा उद्देशाने एकत्र आल्या आहेत.
           बाबर ३ हे लक्ष्य का आहे? ऑपरेशनचा बोजवारा का उडतो? ते पकडले जातात का?  त्यांना यश मिळेल का? त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कामावर खुश आहेत का? अतिरेक्यांची नक्की काय योजना आहे?
          भारतीय स्ट्राईक टीम मध्ये चार पात्रे आहेत. अरमान हा नेता, बलदेव हा त्याचा विश्वासू सहकारी , रोशनची त्याच्या वरिष्ठांनी चांगल्या कामाबद्दल निवड केली आहे पण पूर्वानुभवमुळे अरमानचा त्याच्यावर विश्वास नाही. हितेश तज्ञ आहे.
          पाकिस्तानमधील मिशन ही या पुस्तकाची कथा आहे. साधारणत: अशा पुस्तकांमध्ये मिशनची पार्श्वभूमी  असते, त्याची पूर्वतयारी असते आणि मिशन हा या पुस्तकाचा एक भाग असतो. पण हे पूर्ण पुस्तक हे मिशन आहे. त्यामुळे कारवाई व परिसीमा पूर्ण पुस्तकभर चालू असते. शेवटी जर अतिरेक्यांचे इप्सीत साध्य झाले ते जगाचा इतिहासच बदलून जाणार असतो.
         पाकिस्तान मध्ये मिशन हे एक जबरदस्त कथाबीज आहे. जेंव्हा त्याच्या जोडीला चांगली कथा, योग्य मात्रेमध्ये तणाव, युद्ध , कारवाई, नाट्य आणि वरून हेरगिरी असेल तर ते पुस्तक यशस्वी होणार यात वादच नाही.

      परंतु या पुस्तकात दोष पण आहेत:

    १.       जरी मिशन साठी त्यांनी टोपणनावे घेतली असली तरी ते फोन व सटकॉमवर खरी नावे वापरतात. जरी त्यांचे फोन खात्रीचे असले तरी खरी नावे वापरण्याने ऑपरेशन अयशस्वी होऊ शकते.
   २.       २. भारतीय सैनीक संपूर्ण पाकिस्तान फिरतात. अतिरेकी मोठा कट रचतात.क्षेपणास्त्र तळावर हल्ला होतो. क्षेपणास्त्र सोडली जातात पण पाकिस्तान या सगळ्यावर ताबडतोब कारवाई करत नाही. काही गोष्टी तर त्यांना कळत पण नाहीत. पाकिस्तान सरकार विदुषकासारखे दिसते. भारतीयांना सगळ्या गोष्टी खूप सहज जमतात.
   ३.       काही प्रश्न अनुत्तरीत रहातात. त्यांनी गाडी का सोडली नाही? सापळा त्यांच्या लक्षात कसा आला नाही? वगैरे.
          समुद्रामध्ये वादळात हेलोकॉपटर मधून पाणबुडीवर उतरण्याचा थरारक प्रसंग उत्तमरीत्या रंगवला आहे. हाच प्रसंग पुस्तकाच्या मुखपृष्टावर वितारला आहे. पुस्तकासाठी हे मुखपृष्ठ अतिशय योग्य आहे.
        १९४६ साली झालेला आरमाराचा उठाव हा भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होण्यामध्ये शेवटचा घाव ठरला हे मला माहिती नव्हते. लेखकाने जर या पुस्तकात मिशनचा नकाशा दिला असता तर बरे झाले असते. मी हे पुस्तक वाचताना भूगोल समजण्यासाठी सारखा गुगल मॅप बघत होतो.
        पुस्तकाच्या शेवटी पुढच्या पुस्तकाचे सुतोवाच केले आहेत. चीन मध्ये मिशन. मी पुढच्या पुस्तकाची नक्की वाट बघेन.


 मी हे पुस्तक का वाचले ?                    पाकिस्तान मध्ये मिशन
काय आवडले नाही ?                           राहून गेलेले दोष.
काय आवडले ?                                     तीव्रता.

शिफारस                      लेखकाने उत्तम लिहलेले पुस्तक आणि रोमांचकारी नाट्य. जरूर वाचा 



मंदार आपटे.




 

Thursday, September 6, 2018

अटल बिहारी वाजपेयी रेखाटन : सारंग आपटे


स्वातंत्र्यदिन -एक सल

जेव्हा जेव्हा आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला 
तेव्हा मनात विचार आला देश खरंच स्वतंत्र झाला ?
दिडशे वर्षे इंग्रजांनी देशाची पिळवणूक केली 
देशाची ती पिळवणूक खरंच आहे का संपली ?
स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिली 
जाणीव त्याची आज किती जणांनी ठेवली ?
इंग्रजांची ठोकशाही जाऊन लोकशाही आली 
ती लोकशाही खऱ्या अर्थाने आहे का ' लोकशाही ' ?
इंग्रजांच्या जागी मदांध सत्ताधारी आले 
शोषणकर्ते बदलले शोषण चालूच राहिले 
स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांनी केल्या अनेक हत्त्या 
राजकारण्यांना कंटाळुन शेतकरी करतोय आत्महत्या 
जय जवान -जय किसान हा आपला नारा आहे 
दोघांनाही सांगा आज कोणाचा सहारा आहे ?
'फोडा  आणि झोडा' ही इंग्रजांची नीती होती 
तीच आहे आता राजकारण्यांची 'राज'नीती 
 भाषा ,धर्म ,जात यांत आग पेटवून द्यायची 
त्याच आगीवर आपल्या राजकारणाची पोळी भाजुन घ्यायची 
हे पाहुन वाटतं लढा अजुन संपलेला नाही 
सल एवढाच आहे -
तो लढा होता स्वकीयांचा  परकीयांशी 
हा लढा आहे -अर्जुनासारखा -स्वकीयांचा स्वकीयांशी 

                                        सौ .नम्रता नितीन देव