ऑपरेशन जिन्ना
लेखक: शिव अरुर प्रकाशक: जगरनॉट बुक्स
पाने: २९५
प्रकाशन: सन २०१७
भाषा: इंग्रजी
पूर्वी भारताने पाकिस्तान मध्ये गुप्त सैनिक
कारवाई केली होती पण ही गोष्ट कोणालाही कळू दिली गेली नव्हती. भारतीय नौदलाच्या या
कारवाईत पाकिस्तानचा जिन्ना नाविक तळ उध्वस्त करायचा होता. पण क्षेपणास्त्र जिन्ना
नाविक तळावर बरसण्या आधी काही सेकंद ही कारवाई रद्द केली गेली होती. त्या घटने नंतर
दहा वर्षांनी भारतीय नौदल प्रमुख राणांच्या मुलीचे काश्मीर मधून अपहरण केले जाते.
ऑपरेशन जिन्ना आयत्यावेळी का रद्द केले
गेले? हे गुप्त मिशन नक्की काय होते? एखाद्या मंत्र्या ऐवजी नौदल प्रमुखांच्या मुलीचे
अपहरण का केले गेले? भारत प्रतिटोला देईल का?
हे पुस्तक एक सैनिकी थरारनाट्य आहे. यात
भरपूर हाय ऑक्टेन ऍक्शन आहे, नखे खायला लावणारी परिसीमा आहे, पाकिस्तानात गुप्त कारवाई
आहे, देशाभिमान आहे, आंतरराष्ट्रीय तणाव आहे आणि चांगली कथा पण आहे. या मध्ये थ्रिल
आहे, अनपेक्षित घटना व मोहक दृश्ये आहेत , शस्त्रास्त्रे
आणि विमानाचे तांत्रिक ज्ञान आहे, खुसखुशीत गोष्ट आहे, कथेची अस्सल मांडणी आहे, भरपूर
ऍक्शन आहे. थोडक्यात काय तर हा एक आनंददायी वाचनानुभव आहे. एक उत्कृष्ठ थरार.
या कथेची पात्ररचना सयुक्तिक आहे. ऍडमिरल
निर्भय राणा एक बेलगाम, चाकोरीबाहेर जाणारा देशभक्त आहे. वरुणा ही त्यांची एकूलतीएक
मुलगी आहे. अनाथ मुलगा लेफ्टनंट कमांडर थॉमस हा एक कमांडो आहे. लेफ्टनंट विक्रमादित्य
सिंग हाही एक कमांडो आहे. मुलगा म्हणून जन्माला येऊन स्वेच्छेने मुलगी बनलेली लेफ्टनंट
सरस्वती सुब्रमण्यमसुद्धा कमांडो आहे. भारताचे पंतप्रधान पाकिस्तानला कडक उत्तर देऊ
इचछीत आहेत आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव झेलायची त्यांची तयारी आहे. प्रत्येक पात्र
या कथेचे मूल्य वृद्धिंगत करते.
लेखकाने वेगवेगळ्या शस्त्रांची आणि विमानांची
रेखाटने या पुस्तकात अंतर्भूत केली आहेत. या पुस्तकाचे हे नावीन्य आणि खासियत आहे.
हा बदल स्वागतार्ह आहे.
लेखक ही कथा विणताना अनेक धागे वापरतो.
मात्र यातील काही धागे सुटे राहून जातात. उदाहरणार्थ संपर्क व्यक्ती भारतीयांची मदत
का करते? संपर्क व्यक्तीला आपलेसे कसे केले जाते? एवढी मोठी सुवर्णसंधी असताना भारत
शेवट पर्यंत का जात नाही? हे आणि असे सुटे धागे जर लेखकाने कथेमध्ये नीट विणले असते
तर ही त्रुटी राहून गेली नसती.
शिव अरुर एक प्रतिथयश टीव्ही वार्ताहर आहे.
हे लेखकाचे पहिले पुस्तक आहे. पहिले पुस्तक असूनही लेखकाने सफाईदार लेखन केले आहे आणि
आपला नवखेपणा दिसू दिला नाही. शिव अरुरची आणखी पुस्तके वाचायला मला नक्की आवडेल.
मी हे पुस्तक का वाचले: शीर्षक आणि ब्लरब
काय आवडले नाही: सुटे धागे
काय आवडले: कथाकथन, माहिती.
शिफारस: उत्तम पुस्तक. जरूर वाचा..
काय आवडले नाही: सुटे धागे
काय आवडले: कथाकथन, माहिती.
शिफारस: उत्तम पुस्तक. जरूर वाचा..
मंदार आपटे
No comments:
Post a Comment