जेव्हा जेव्हा आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला
तेव्हा मनात विचार आला देश खरंच स्वतंत्र झाला ?
दिडशे वर्षे इंग्रजांनी देशाची पिळवणूक केली
देशाची ती पिळवणूक खरंच आहे का संपली ?
स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिली
जाणीव त्याची आज किती जणांनी ठेवली ?
इंग्रजांची ठोकशाही जाऊन लोकशाही आली
ती लोकशाही खऱ्या अर्थाने आहे का ' लोकशाही ' ?
इंग्रजांच्या जागी मदांध सत्ताधारी आले
शोषणकर्ते बदलले शोषण चालूच राहिले
स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांनी केल्या अनेक हत्त्या
राजकारण्यांना कंटाळुन शेतकरी करतोय आत्महत्या
जय जवान -जय किसान हा आपला नारा आहे
दोघांनाही सांगा आज कोणाचा सहारा आहे ?
'फोडा आणि झोडा' ही इंग्रजांची नीती होती
तीच आहे आता राजकारण्यांची 'राज'नीती
भाषा ,धर्म ,जात यांत आग पेटवून द्यायची
त्याच आगीवर आपल्या राजकारणाची पोळी भाजुन घ्यायची
हे पाहुन वाटतं लढा अजुन संपलेला नाही
सल एवढाच आहे -
तो लढा होता स्वकीयांचा परकीयांशी
हा लढा आहे -अर्जुनासारखा -स्वकीयांचा स्वकीयांशी
सौ .नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment