पाउस येताना सोबत आठवणी घेउन येतो...आणि आठवणींच्या पावसात भिजवत राहतो..
वेड लागल्यासारखा आज तो बरसतो आहे
सकाळपासूनच...
"का रे? रागावला आहेस का माझ्यावर?
मी खेळायला येत नाही म्हणून
चिडला आहेस का माझ्यावर?
नको ना रागावूअसा, नको असा बरसू
सोबत कुणी खेळण्या साठी नको ना असा तरसू
लहानपणी खेळायचे मी
हरपून सारं भान
बिनधास्त भिजायचे विसरून भूक तहान
"नको खेळू अशी पावसात"ओरडायची तेव्हां आई
"आजारी पडशील अगं" समजवायची ताई
मुद्दाम छत्री विसरायला मजा यायची मला
असली हातात तरी आवडायचं
त्यात पाणी साठवायला
मग आज का विचार एवढा...
मग आज का विचार एवढा तुझ्या सोबत खेळताना
का फिरत नाही मी हातात छत्री नसताना
कॉफ़ीचा कप हातात घेवून न्याहाळत बसते तुला
लहानपणांतल्या आठवणीनी तूं भिजवत असतो मला
अंगणांत माझ्या येवून जातोस
सोबत मला बोलावतोसही
मीच लक्ष देत नाही अनावर तुझ्या हाकेला
नेमकं आज गाठलस तू...
नेमकं आज गाठलस तू अन बरसलास वेड्यासारखा
मनसोक्त भिजले मी आज, डोळ्यांत उतरलं पाणी
निश्चय केला आज मी, दर वर्षी खेळीन
एकदा तरी भर पावसाळ्यात हरवून तुझ्यात जाईन
विसरून जाईन जग सारं बरसण्यात तुझ्या भिजीन
वर्षांतला एक दिवस मी माझ्या साठी जगीन
वर्षांतला एक दिवस फक्त माझ्या साठी जगीन
--रुपाली मावजो किर्तनी
No comments:
Post a Comment