बालपणीचा काळ
सुखाचा असं
लहानपणी इतरांनी
लिहिलेलं वाचता
वाचता स्वतः
लिहायचा काळ
कधी आला
ते कळलेच
नाही... आमच्या
लहानपणी मे
महिन्याची सुट्टी
आणि कोकणातले
गावचे घर
हे एक
अतूट समीकरण
होतं. हे
समीकरण कधी
तुटेल असे
त्यावेळी स्वप्नातही
वाटले नव्हते....
निदान नोकरीला
लागेपर्यंत तरी.
पुढे आयुष्यातील
बरीच समीकरणे
बदलतात आणि
बदलली हा
भाग वेगळा.
पण गावाशी
असलेली नाळ
अजूनही तुटली
नाही
असो... तर
एप्रिलमध्ये परीक्षा
संपल्या दुसऱ्या
तिसऱ्या दिवशीची
आम्हा भावंडांची
एस्टीची तिकिटे
काढलेली असत.
वडील शिक्षक
असल्याने त्यांना
वेगळी सुट्टी
काढावी लागत
नसे. फार
फार तर
ते आणि
आई आमच्या
नंतर काही
दिवसांनी शाळेचे
निकाल घोषित
झाल्यावर गावी
येत. पण
तसे पाहिले
तर सर्वजण
एकत्र सुट्टी
घालवत होतो.
त्या दीड
दोन महिन्यांच्या
कालावधीत वर्षभर
पुरेल इतकी
धमाल, मस्ती,
भटकंतीची शिदोरी
बांधून घेत
होतो. गावी
जायचे म्हटलं
की अंगात
एक वेगळाच
उत्साह संचारायचा.
परेलहुन संध्याकाळी
निघालेली एस्टी
दुसऱ्या दिवशी
पहाटे गावी
पोहोचायची. पण
रात्रभर झोप
म्हणून लागायची
नाही. कधी
एकदा घरी
पोहोचतोय असे
व्हायचे. रात्रभर
आपल्या गाडीने
इतर किती
गाडयांना मागे
टाकले, किती
वाजले म्हणजे
नेमके कुठपर्यंत
पोहचू याचे
ठोकताळे बांधण्यात
झोपेचा विचारही
यायचा नाही.
पहाटे स्टॉपवर
कोणीतरी घेण्यासाठी
आलेलं असायचे.
गाडीतून उतरले
की थंडगार
वारा कानात
शिरला की
मन प्रसन्न
व्हायचे.
आजोबांचा चहा
झाला की
ते सर्व
गुरांना घेऊन
पाण्यावर घेऊन
जात तिथून
त्यांना रानात
चरायला सोडत.
आजीने वाड्यातले
शेण, गवत
साफ करून
वाडा लोटून
ठेवलेला असे.
तोपर्यंत आमची
अंथरुणे उठलेली
असत. मुखमार्जन,
चहा नास्ता
झाला की
आजोबांची न्याहारी
घेऊन जायची,
तिकडेच मग
कलमांच्या बागेत
जाऊन आंबा,
नारळ यांना
पाणी घालायचे.
अशी काही
ठराविक कामे
झाली की
मग गाव
उंडारायला मोकळे.
दुपार होईपर्यंत
रानात सोडलेली
गुरे परत
वाड्यात येत.
जी स्वतःहून
येत नसत
त्यांना शोधून
आणायचे काम
आमचे असायचे,
त्या निमित्ताने आम्हालाही गाव
भटकायला मिळे. पण ही आमच्यासारखीच
उंडगी जनावरे
त्यांच्या ठरलेल्या
जागी सापडत.
आणि त्या
जागा आम्हाला
पण सवयीने
कळून येत.
दुपारच्या जेवणानंतर
सीमेवरच्या भल्या
मोठ्या आंब्याच्या
झाडाखाली कधी
पत्ते, कधी
विटीदांडू तर
कधी लगोरी
असे खेळ
रंगायचे. आंब्याच्या
झाडांनाही आकारानुसार,
चवीनुसार विशिष्ट
नावे असायची.
धोदया, साखरी,
खोबरी आणि
अशी बरीच...
खेळता खेळता
अर्धे लक्ष
वाऱ्याबरोबर पडणाऱ्या
पिकलेल्या आंब्यांवर
असायचे. अचानक
पडलेला आंबा
उचलण्यासाठी सर्वांची
झटापट चालायची.
पण मला
मात्र झाडावर
उंच असलेला
आंबा दगड
मारून पाडण्यात
जास्त आनंद
वाटे. हिरव्या
पानांच्या, फांद्यांच्या
आणि कैऱ्यांच्या
घडामधून एखादा
पिवळा धम्मक
पिकलेला आंबा
डोकावत असे.
त्याला दगडाने
टिपून पाडण्यात
असुरी आनंद
मिळत असे.
आंब्यावर भिरकावलेला
एखादा दगड
लक्षाचा मार्ग
चुकवून जवळच्या
घराच्या कौलांवर
जाऊन आदळायचा.
की मग
घरातून अप्पांचा,
अण्णांचा, दाजींचा
"कोण रं
तो ...." असा
दरडावणारा आवाज
आला की
धूम ठोकायची.
घरची स्वतःची
हापूस आंब्यांची
बाग असून
टोपल्या भरून
घरी आंबे
असूनही रायवळ
आंब्यासाठीची ही
धडपड एका
वेगळ्या आनंदाची
अनुभूती देत
असे. असा
कष्टाने मिळवलेला
आंबा खाताना
हाताच्या कोपरापर्यंत
ओघळलेला रस
ओरपताना भान
हरपून जात
असे. बाकीचे
आंबे घरी
नेऊन त्याचा
रस काढून
साट (आंबा
पोळी) घालत.
आणि मांडवावर
सुकायला ठेवत.
दुपारनंतर पुन्हा
एकदा गुरांना
पाण्यावर घेऊन
जाण्याचे काम
आम्हा मुलांचे
असायचे. परत
येताना सरळ
घरी येऊ
तर मुलं
कसली..! जवळच्याच
रानात झांकी
मारून काजू,
करवंद जे
मिळेल ते
गोळा करून
आणायचे. अशातच
संध्याकाळ व्हायची.
मामाचं गाव
आणि माझं
गाव एकच.
त्यामुळे इतर
मुलांसारखे खास
मामाच्या गावी
जाऊन धमाल
मस्ती करायचे
भाग्य आम्हाला
लाभलं नाही.
पण तरीही
दिवसातून किमान
एकतारी फेरी
मामाच्या घरी
व्हायचीच. एखाद्या
दिवशी तिकडे
जाणे जमले
नाही तर
दुसऱ्या दिवशी
मामाची आई
(हो... आईची
आई.. आज्जी
असली तरी
आम्ही मामाची
आईच म्हणायचो)..
आम्ही मुले
जिथे खेळत
असायचो तिथे
बांधावर येऊन
माझी चौकशी
करायची. माझ्यासाठी
किमान अर्धी
भाकरी तिने
ठेवलेली असायचीच.
तिने मातीच्या
भांड्यात चुलीवर
केलेल्या कोणत्याही
भाजी किंवा
वरणाची कोणत्याही
फाईव्ह स्टार
हॉटेलच्या डिशला
येणे शक्यच
नाही.
रात्रंदिवस आम्ही
अनेक खेळ
खेळायचो. पण
माझ्या आवडीचे
दोन. एक
विटीदांडू आणि
दुसरा म्हणजे
"भेकऱ्या खटोट्या".
हा कसा
खेळायचा तर
...जितके खेळाडू
असतील त्यांच्या
समसमान २ टीम करायच्या.
ज्या टीमवर
राज्य असेल
त्यांनी दूरवरचे
एक ठिकाण
ठरवून तिथपर्यंत
जाऊन यायचे.
ते तिथे
जाऊन परत
येईपर्यंत पहिल्या
टीमने माती,
राख गोळा
करायची.. (बऱ्याचदा
वेळ वाचवण्यासाठी
ती आधीच
गोळा केलेली
असे).. त्याच्या
साहाय्याने कोणालाही
सहज दिसणार
नाही अशा
जितक्या जमतील
तितक्या छोट्या
छोट्या पुंजक्या
घालायच्या. राज्य
असणारी टीम
ठराविक जागी
पोहोचून धावत
धावत "भेकऱ्या
खटोट्या..... भेकऱ्या
खटोट्या..... " असे ओरडत
यायची. त्यांना
सापडतील तितक्या
पुंजक्या त्यांनी
पुसून टाकायच्या.
ठरलेल्या वेळात
अजून शोधाशोध
करायची आणि
उध्वस्त करायच्या. वेळ
संपली की
पहिल्या टीमने
त्यांना न सापडलेल्या न पुसलेल्या पुंजक्या
दाखवायच्या.. आणि
मोजायच्या.. आत्ता
हेच पुह्ना
दोन्ही टीम
आपापले रोल
बदलून करायचे.
शेवटी ज्यांच्या
पुंजक्या जास्त
भरतील ती
टीम जिकंली.
यात पुंजक्या
कुठे काढायच्या
आणि कुठे
नाहीत (घरात..
माळ्यावर नाहीत)
याचे नियम
ठरलेले असत.
जिंकण्यासाठी आम्ही
कुठे कुठे
पुंजक्या काढायचो...
घराच्या कौलांवर,
झाडाच्या फांद्यांवर,
गवताच्या माचीखाली,
सागाच्या भल्यामोठ्या
पानांवर... आणि
त्या झाकून
लपवून ठेवायच्या.
रात्री जेवणं
झाली की
मांडवात अंथरुणं
पडायची. सर्व
चुलत भावंडे
वगैरे एकत्र
आलो की
नाना (वडिलांचे
चुलते) त्यांच्या
काळातल्या शिकारीच्या
गोष्टी सांगायचे.
वाघ, हरणं,
सांबर, डुक्कर,
ससे कितीतरी
प्राणी, जंगलातली
ठिकाणे आमच्या
परिचयाची वाटत.
नाना अशा
प्रकारे सांगायचे
जणू आम्हीच
त्यांच्यासोबत शिकार
करत होतो.
एप्रिल-मे
म्हणजे लग्नसराईचे
दिवस. हळद,
लग्न, वरातींची
रेलचेल. आम्हा
मुलांचा आवडीचा
प्रकार म्हणजे
तोरण धरणे.
गावातून जाणारी
असो की
गावात येणारी
वरात असो,
गावात येणारा
मुख्य रस्ता
(तो आत्ता
रस्ता झाला,
आधी एक
पाणंद होती)
आमच्याच घरासमोरून
जात असल्याने
सर्व वराती
तिथूनच जात.
वरात येत
असताना आम्ही
मुलं एखादा
टॉवेल किंवा
चादर त्यात
काही आंब्याची
पाने ठेऊन,
दोन बाजूंना
धरून पाणंदीच्या
दोन्ही बाजूला
असलेल्या बांधावर
उभे राहायचे.
नवऱ्याने त्यात
एक नारळ
आणि विडा
ठेवायचा आणि
मगच नवरा
नवरी आणि
सर्व वरातीने त्याखालून
जायचे. ते
सर्वजण निघून
गेल्यावर तो
नारळ फोडून
खोबरं खायचं.
विडा मात्र
आजीला द्यायचा.
हेच उद्योग.
ही सर्व
धमाल मस्ती
चालू असतानाच
अचानक रात्रीचे
काजवे दिसू
लागत. आम्ही
ते पकडून
काचेच्या बाटलीत
बंद करायचो.
रात्रीच्या अंधारात
चम-चम
करणारे काजवे
पाहिले की
एका वेगळ्याच
दुनियेत असल्याचा
भास व्हायचा.
आणि अशातच
सुट्टी संपून
मुंबईला परत
जाण्याचा दिवस
उगवायचा. संध्याकाळची
एसटी असायची.
आमची सकाळपासूनच
सामानाची बांधाबांध
सुरु व्हायची.
तांदूळ, आंबे,
फणस, काजू...
पोत्यात भरले
जायचे. सर्वांचा
निरोप घेताना
सर्वांचे डोळे
पाणावायचे. पाय
आणि मन
मात्र हलायचे
नाही. मला
जितक्या वेळा
आठवते त्या
प्रत्येक वेळी
आम्ही निघताना
पाऊस असायचाच.
तो सुद्धा
धो धो.
आम्हा सर्वांच्या
डोळ्यातले पाणी
दिसू नये
म्हणून तो
साथ द्यायला
यायचा बहुतेक.
एसटीत बसल्यावर
गावी आल्यापासूनचा
प्रत्येक दिवस
आठवत राही.
अशातच डोळे
पेंगुळले होऊन
कधीच झोपेच्या
अधीन होत.
अजय पडवळ
(मु.वाळवड,
ता. राजापूर,
जि. रत्नागिरी)
No comments:
Post a Comment