Monday, June 25, 2018

रम्य ते बालपण.........

         मी माहेरची 'मृणाल दिनेश महाडिक'. माझं मूळ गाव सातारा शहर. वडिलांचं गाव तारगाव, सातारा शहरापासून अंदाजे २५ किमी अंतरावर. आई हि सातारचीच, त्यामुळे सर्व नातेवाईक सातारा शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये वसलेले. साहजिकच आमचं विश्व सातारापुरतंच मर्यादित. मेगासिटी पुण्याचे (सातारापासून १२० किमी) आकर्षण असलं तरीही आमचं सातारा टुमदार बरं का !!!!!!
       सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सातारा जसा निसर्गसौदर्याने भुरळ घालणारा, तसाच ऐतेहासिक महत्व प्राप्त झालेला आहे. कडीकपारी, डोंगरदऱ्या, घनदाट जंगल.......
गनीमीकाव्यासाठी अगदी योग्य... त्यामुळेच शिवाजी महाराजांनी सामरिक दृष्ट्या याचे महत्व ओळखले होते. आजही शिवाजीमहाराजांच्या वंशजांचेसाताऱ्यात वास्तव्य आहे(जलमंदिर). शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेला अजिंक्यतारा, जरंडेश्वर, सज्जनगड, बंडा
ज्वालामुखी अशी दमदार नाव असलेल्या डोंगरांनी वेढलेला सातारा.....असं भौगोलिक स्थान लाभल्यामुळेच मोगल यास सितारा (स्टार) असं म्हणत.माझ्या आयुष्यातील पहिली २० वर्षे या जिवलग साताऱ्यातली. आईवडील दोघेही नोकरीनिमित्तसाताऱ्यात वसलेले. माझी पहिली शाळा म्हणजे बोडसबाईंचा बालगट. शाळा सुटल्यावर बोडसबाईंचाचहात धरून घरी येणं आणि त्यावेळी दारात बसून वाट बघणारी माझी आजी अजूनही माझ्या स्मरणात आहे.
           प्राथमिक शाळा "आबासाहेब चिरमुले विद्यालय त्यावेळी शाळेची निवड Convenience या एकाच निकषावर केली जायची. अर्थात हि घरापासून जवळची अशी शाळा. जसा शाळेतील वेळ आनंद देणारा तसा शाळेत चालत जातानाचा प्रवासही रोमांचक..... वाटेतील देवचाफ्याच झाड, प्राजक्ताचा सडा, उडणारी फुलपाखरं, कर्दळीची फुलं, जास्वंदाचं झाड, बहरलेलं चांदणीचं झाड, अळूच्या पानावरचं दवं, पावसाळ्यात उडणारे चतुर आणि अगदी रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये साठलेले पाणी त्यावेळी बालमनात कुतूहल निर्माण करायचे.
          पाचवीला माझा प्रवेश भावाच्याच म्हणजे "न्यू इंग्लिश स्कुल, सातारा" या शाळेत झाला. शाळेत प्रवेश केल्यावरच आधी भाऊ (निलेश) व चुलतभाऊ (महेश) यांच्या बोलण्यात वारंवार येणारी नावे म्हणजे गोलजीना,खालचं मैदान,वरचं मैदान, प्रेक्षागृह, कोटेश्वर, भारत, पाकिस्तान, प्रयोगशाळा हे दुसरे तिसरे काही नसून शाळेतल्या वेगवेगळ्या भागांना दिलेली नावे आहेत हे समजले.
         पहिल्यापासूनच मैदानी खेळांची आवड असल्याने क्रीडामहोत्सव जवळ आला कि शाळेत माझी चलती असायची आणि त्या कालावधी पुरता का होईना कप्तान म्हणून माझी बाकी मुलींवर बॉसिंग चालायची. याच शाळेत अगदी निरपेक्ष मैत्री करणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या. रिकाम्या वेळेत बाकावर बसून आमचे पेनची उडवाउडवी, Tic-Tac-toe व अंताक्षरी हे खेळ असायचे. तसेच पार्टनरशी भांडण झाल्यावर बाकावरच पेनाने रेष मारून केलेले जागेचं अलिखित विभाजन, मोठया सुट्टीमध्ये खेळायला मिळावे म्हणून छोट्यासुट्टीतच डबा संपवणे, यात एक वेगळीच मजा होती.
       या वयात शाळेने जसा भरभरून आनंद दिला तसेच आमच्या नवीन घराने म्हणजे 'अक्षय अपार्टमेंट' मधील 1BHK फ्लॅटने दिला. त्यावेळी फ्लॅट संस्कृती हि तशी अजून नवीनच संकल्पना होती. लोकांचा याकडे पाहायचा दृष्टिकोन जरी संमिश्र असला तरी आम्ही येथे कधीही शेजार मिस केला नाही. या घरामध्ये खऱ्या अर्थाने आमचे कुटुंब बहरलं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पडणारा एक नादब्रह्म 'रामा.....रामा हो रामा' अजूनही आठवतो...पाडव्यापासून रामनवमी पर्यंत सज्जनगडावरचे सेवेकरी खाली गावात भिक्षा मागण्यासाठी यायचे. या भिक्षेतून बनवलेला आमटी भात आणि गव्हाच्या खीरीचा स्वर्गीय आनंद मी कितीतरी वेळा
गडावर चाखला आहे.
       उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी शेजाऱ्यांकडे आलेले पाहुणे हे सगळ्या बिल्डिंगचे पाहुणे असायचे.
कुणाकडेही VCR आणला तर सिनेमाचे स्क्रिनिंग हे सगळ्या बिल्डिंग साठी असायचे. आम्ही सगळी मुले त्यांच्या घरी सिनेमा पाहण्यासाठी जमायचो, त्यासाठी आमंत्रणाची आवश्यकता कधी भासली नाही. अजिंक्यतारा, ढोल्या गणपती, खिंडीतील गणपती हि आमची उन्हाळ्याच्या सुट्टीतील संध्याकाळची सहलीची ठरलेली ठिकाणे. त्याचे नियोजन अर्थातच आम्हा मुलांचेच असायचे. नगरपालिका तलावात पोहायला जाणं, टेरेसवर रात्री पत्त्यांचा डाव मांडणं, त्यानंतर सर्वानी चांदणं पाहत टेरेसवरच अंथरून पसरून रेडिओ ऐकत झोपणं, सगळे मिळून सिनेमाला जाणं यासाठी कधी पालकांनी कधी आडकाठी केली नाही किंवा त्यांना तशी गरज हि भासली नाही. सोप्या भाषेत या सर्वांसाठी हुंदडणे हा एकाच शब्द योग्य वाटतो.
          वर्षा ऋतूची सुरवात म्हणजे सातारकारांसाठी पर्वणीच!!! सकाळी उठून घराच्या गच्चीत (बाल्कनी) उभे राहून डोंगरांच्या हिरव्या रंगछटांमध्ये होणारे बदल, रात्रभराच्या पाऊसामुळे तयार झालेले छोटे मोठे शुभ्र धबधबे आणि झरे न्याहाळणे हा माझा त्यावेळचा विरंगुळा. जशा नैसर्गिक रंगांच्या छटा तसेच पाऊसात लोकांच्या रंगबेरंगी छत्र्याही आम्ही दोघे भावंडे तासंतास पाहत असे. हे सर्व शक्य झालं ते Gadget च्या आहारी न गेलेल्या बालपणामुळे.
       उन्हाळा पावसाळ्याप्रमाणेच सातारामधील हिवाळा हि आल्हाददायक, सणासुदीचा काळ!!!
      दसऱ्याच्यावेळी, आजूबाजूच्या गावातली मुले, 'फुलं घ्या फुलं' अशी आरोळी देत कारळयाची फुलं घेऊन अगदी पहाटे ४ वाजताच बोगद्यापलीकडून येत असत. त्या मुलांचं खूप कौतुक वाटायचं.गावाची जत्रा, गणपती, दिवाळी हे महत्वाचे सण तारगाव म्हणजे बाबांच्या मूळगावी साजरे व्हायचे. माझे सगळे काका व आत्या त्यावेळी तारगावला जमायचे. तारगावला जाताना लालराणी (ST) किंवा मॅटेडोरची सवारी व्हायची. दिवाळीच्या वेळी आम्हा सर्व चुलत भावंडामध्ये(सर्व मिळून १०) पहिल्या अंघोळीसाठी स्पर्धा असायची. त्यानंतर फटाक्यांचा सामान वाटणी करायचं काम माझ्या बाबांकडे असायचे. पहिला फटाका महाडिकांच्याच अंगणात वाजल्याचा आनंद जल्लोषात साजरा व्हायचा . त्यानंतर गावदेवाच्या दर्शनाला
जाताना सर्वांच्या अंगणातल्या रांगोळ्या न्याहाळणं आणि परत आल्यावर सर्वानी मिळून फराळ करणे या गोष्टी अगदी अविस्मरणीय. बरं एवढ्या जल्लोषानंतर दुपारी झोपण्यासाठी आजोबांचा धाक असायचा, पण त्यातूनही आमचा निसटण्याचा प्रयत्न व्हायचा.
            या सर्व आठवणी न संपणाऱ्या आहेत.........अगदी साताऱ्याच्या कंदी पेढ्याच्या अवीट गोडीसारख्या. सातारा मला जसा भावाला तसा तो इतिहासाच्या अभ्यासकांना आणि पर्यटकांना देखील आकर्षित करतो. त्यापैकी काही स्थळे इथे नमूद करावीशी वाटतात.... साताऱ्याजवळील महाबळेश्वर, पाचगणी या प्रसिद्ध पर्यटन स्थळांशिवाय कास पुष्पपठार(गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद), औंधचे वस्तुसंग्रहालय, ठोसेघर धबधबा, भांबावली धबधबा (भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा ), पाटेश्वर(शिवमंदिर आणि कोरलेल्या गुंफा), सज्जनगड(रामदास स्वामींचा मठ), प्रतापगड(अफझल खानाची कबर), मेणवली(नाना फडणवीस वाडा), वाई(सुंदर गणपती मंदिर आणि घाट), लिंब-गोआ (१२ मोटेची विहीर) हि स्थळे प्रेक्षणीय आहेत.

अशा या मनोभावी साताऱ्याची आता वर्षातून एकदाच भेट होते. पण ती भेट अगदी पुढच्या
वर्षभरासाठी मनाला recharge करून टाकते.




सौ. मृणाल सागर कुमठेकर
अबू धाबी, UAE

No comments:

Post a Comment