पुरेपूर - कोल्हापूर
सौ. वैशाली सचिन पाटील
कोल्हापूर
राम राम मंडळी, जसा आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे तसेच त्यामधील माझा महाराष्ट्र ही उच्च सांस्कृतिक परंपरा असलेले राज्य आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमत्ताने मला आज माझ्या कोल्हापूर बद्दल तुम्हाला माहिती द्यावीशी वाटते. आणि ह्या लेखाचा उद्देश असा आहे की तुम्ही जर आजपर्यंत कोल्हापूरला अजूनपर्यंत कधी भेट दिली नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की भेट द्या.
शेकडो वर्षांपूर्वी, अस्तित्वात आलेले हे क्षेत्र, सह्याद्रीच्या पर्वत
रांगेजवळ वसलेले आहे. हे क्षेत्र कोल्हापूर बनवण्यासाठी छत्रपती ताराबाई यांना
श्रेय जाते. या ठिकाणाला ‘दक्षिण काशी’ असेही म्हटले जाते.
शाहु महाराजांचा कोल्हापूर जिल्हा! छत्रपती शाहु महाराजांच्या काळात (1874- 1922) या जिल्हयाचा मोठया प्रमाणात कायापालट झाला.
कोल्हापूर त्याच्या रांगडेपणामुळे, खवय्येगिरीने, कुस्तीमुळे, पेहेरावावरून, परंपरांमुळे, ऐतिहासिक वास्तुंमुळे प्रसिध्द आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर शहर हे एक धार्मिक स्थळ आहे जेथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. या शहराला कोल्हापूर असे नाव, कोल्हासुर नावाच्या एका राक्षसावरून देण्यात आले ज्याचा वध देवी महालक्ष्मीने केला होता.
कोल्हापूर बद्दल आणखी एक विशेष गोष्ट जी केवळ थोड्याच लोकांना माहिती आहे ती ही की, येथे भारतातील सर्वात पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला गेला होता. उसाच्या विक्रमी उत्पादनाकरता हा जिल्हा ओळखला जातो.
कोल्हापूरची खाद्यसंस्कृती:
कोल्हापूर म्हंटले की लगेच डोळ्यापुढे येते ते कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, राजाभाऊंची भेळ आणि भरपुर काही. खाण्याच्या शौकिनांकरता तांबडा पांढरा रस्सा म्हणजे जीव की प्राण! कोल्हापूरची ही एक खासियत असुन या पदार्थाची चव या ठिकाणची खासियत आहे. कोल्हापुरी कांदा-लसूण चटनीमुळे इथल्या जेवणाला एक वेगळीच चव येते. आणि इथल्या खाऊगल्ली मध्ये जायचे असेल तर कडकडीत भुक ठेऊनच जायचे हं, कारण इथे तुम्हाला खायचे इतके पर्याय भेटतात की काय खाऊ आणि काय नको असे होते.
कोल्हापुरी साज:
कोल्हापुरी साज हा दागिन्यांमधला एक अस्सल मराठी प्रकार या ठिकाणचा असुन कोल्हापूरच्याच नावाने तो आजही ओळखला जातो.
कोल्हापुरी भाषा:
कोल्हापूर मध्ये प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते पण हया रांगडी भाषेचा ठसका मधु भाषिक लोकांना कधी कधी सहन होत नाही. पण खरे पाहता जरी ह्या भाषेमध्ये रांगडेपणा असला तरी त्यामागची प्रेम, आपुलकी आणि प्रेमाची भावना तुम्हाला एखादा अस्सल कोल्हापुरी व्यक्ती भेटल्याशिवाय नाही कळणार. जगात भारी... अशी कोल्हापुरी भाषा तुम्हाला कोल्हापूर भागामध्येच मिळेल हं! गुजराती आणि मद्रासी बोलणारे लोक देखील इथे आढळतात.
कोल्हापुरी फेटा:
कोल्हापूरची शान असलेला कोल्हापुरी फेटा हा आवर्जून विविध सन आणि उत्सवांमध्ये वापरला जातो. आजकाल कोल्हापुरी फेटा हा वेगवेगळ्या रंगामध्ये मिळत असला तरी केसरी रंगाचा फेटा हा आजही आपली खासियत राखून आहे. याला बांधण्याची देखील एक अनोखी शैली आहे आणि ती तुम्हाला इथेच शिकायला मिळेल.
कोल्हापुरी चप्पल:
कोल्हापुरी चप्पल फार प्रसिध्द असुन ही चप्पल मशिन ने नाही तर हाताने बनवण्यात येते. येथील चप्पल एवढी प्रसिध्द आहे की पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर कोल्हापुरी चप्पल घेतल्याशिवाय माघारी फिरतच नाही. परदेशातुनही या चपलांना मोठया प्रमाणात मागणी असते.
कोल्हापुरी लावणी:
नऊवारी साडी परिधान करून ढोलकीच्या तालावर सादर केली जाणारी लावणी इथली एक खासियत आहे.
कोल्हापूर मधील प्रेक्षणीय स्थळे:
न्यू पैलेस – शाहू संग्रहालय
आत्ताचे हे संग्रहालय एकेकाळी छत्रपती शाहू महाराज्यांच्या राजघराण्याचे निवासस्थान होते.
भवानी मंडप
छत्रपती शाहू महाराजांच्या पार्श्वभूमीशी संबंधित असलेले हे ठिकाण ‘ग्लोरी ऑफ द सिटी’ असे ओळखले जाते. भव्य मंडपामधील मोठा हॉल व भव्य दालन आपले मन मोहवून टाकेल.
गगनगिरी महाराज मठ, कोल्हापूर
जंगलाच्या मधोमध स्थित असलेल्या या मठात योग आणि ध्यान शिकविले जाते. असे म्हटले जाते की महाराजांनी आठ वर्ष अत्यंत कष्ट घेऊन येथे तपस्या केली होती. विदेशी पर्यटकांना हे अध्यात्मिक केंद्र खूपच आवडते.
गगनबावडा, कोल्हापूर
कोल्हापूरपासून ५५ कि.मी. दूर स्थित हे ठिकाण अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. ज्यांना ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंग आवडते त्यांनी या ठिकाणी भेट द्यायला विसरू नये. गगनबावडाला अडव्हेंचर पॉईंट म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
महालक्ष्मी मंदिर
जर आपली देवावर श्रद्धा असेल तर आपण अवश्य महालक्ष्मी मंदिराला भेट द्यावी. हिंदू धर्मातील पवित्र पुराणात अनेक वेळा या मंदीराचा उल्लेख केला गेला आहे.
खासबाग मैदान
हे मैदान कोणतेही साधारण मैदान नाही तर कुस्तीचे मैदान आहे जिथे ३०,००० दर्शक बसण्याची क्षमता आहे. छत्रपती शाहू महाराजांनी या मैदानाची निर्मिती कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी तसेच कुस्ती शिकवण्यासाठी केली होती.
रंकाळा चौपाटी
कोल्हापूरचे ’मरिन ड्राईव्ह’ म्हणून रंकाळा तलाव ओळखला जातो. कोल्हापूर वासियांचे संध्याकाळच्या वेळेस फिरण्याचे हे सर्वात आवडते ठिकाण आहे.
वेगवेगळया प्रकारचे पक्षी, वनस्पती आणि सुर्यास्त बघण्याकरता पर्यटक या रंकाळा तलावावर गर्दी करतांना दिसुन येतात.
मुलांना कोल्हापूर मधील रंकाळा चौपाटी फार आवडेल कारण येथील सुंदर बाग व शालिनी पैलेस मध्ये खेळण्यासाठी मुलांना भरपूर ऐैस पैस जागा उपलब्ध आहे.
राधानगरी धरण, कोल्हापूर
भगवती नदीच्या काठावर बांधलेले हे धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी बांधले गेले होते. या धरणाचे पाणी मुख्यतः सिंचनसाठी वापरले जाते.
ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर
कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर बारा विद्यमान ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. रत्नागिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी राक्षस रतनासुरचा तीन हिंदू देवता, ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी वध केला होता. महिन्याच्या प्रत्येक पौर्णेमेला येथे भव्य मेळावा होतो.
पन्हाळा, कोल्हापूर
पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. व पाली भाषेतील आहे.येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला.
मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे.
अंबादेवी मंदिर, रंकाळा तलाव, शिवाजी विद्यापीठ, पन्हाळगढ, शाहु महाराजांचा राजवाडा आणि वस्तुसंग्रहालय, नृसिंहवाडी, गगनबावडा, खिद्रापुर, विशाळगड, राधानगरी, दाजीपुर अभयारण्य, ही धार्मिक आणि पर्यटन स्थळं या जिल्हयाच्या वैभवात भर घालतात.
कोल्हापूरमधील हवामान वर्षातील बारा महिने समानच राहते. आपण कोणत्याही हंगामात येथे भटकू शकता. कधीकधी पावसाळ्यात येथे पूराचा सामना करावा लागतो. पर्यटक हिवाळ्यात कोल्हापूरला फिरण्यास पसंत करतात. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील मोठे शहर असल्याने या ठिकाणी रेल्वे, बस आणि विमानसेवा उपलब्ध आहे.
असे हे माझे परिपुर- कोल्हापूर महाराष्ट्राच्या संस्कृती मध्ये मोलाची भर घालते. तर अजूनपर्यंत भेट दिली नसेल तर इथली ही खासियत बघण्यासाठी नक्की या आमच्या कोल्हापूरला.
No comments:
Post a Comment