Saturday, January 30, 2021

आमच्या घरी आली दिवाळी------- पावनी प्रसाद बारटके

 

 आमच्या घरी आली दिवाळी

 पावनी प्रसाद बारटके

 

आली दिवाळी आली दिवाळी आमच्या घरी आली दिवाळी,     

चिवडा, लाडू, करंजी, चकली अणि शंकरपाळी,                      

आली दिवाळी, आली दिवाळी .

आमच्या घरी आली दिवाळी .

 

आकाशात कंदील,

दारात पणत्या आणि रांगोळी,                      

आली दिवाळी, आली दिवाळी,

 आमच्या घरी आली दिवाळी .

 

छान छान उटणे लावून करू रगडू मगडू आंघोळी,    

आली दिवाळी, आली दिवाळी,

आमच्या घरी आली दिवाळी .

 

लक्ष्मी पूजनला देवी बनली नवरीबाई,

पाडव्याला आई बाबांना ओवाळी,

भाऊबीजेला प्राणवी मला ओवाळी,

आली दिवाळी, आली दिवाळी,

आमच्या घरी आली दिवाळी

 

सुंदर सुंदर कपडे घालून आम्ही लावू फुलबाजी

आणि म्हणू दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी,

शुभ दिवाळी, शुभ दिवाळी,

आमच्या घरी आली दिवाळी .

My mother----------Pavani Prasad Bartake

 

My mother

Pavani Prasad Bartake

 

My mother,

The one whose smile guides my way,

She is the bright sunshine who lights my day,

 

My mother,

The one who makes me feel good when I am sad,

She is the fairy with magic wand

 

My mother,

The one who makes delicious dishes,

She is the one who sacrifices for our wishes.

 

My mother,

The one who hugs n cuddles me, and wipes my tear,

She is my pretty angle dear

 

My mother,

The one who makes my bedtime stories a fun,

She is the one from whom I always get something new to learn

 

My mother,

The one who is a God's favour

Her care for me will end never.

 

Dear mother,

When I slide on the beautiful memories with you,

I feel blessed and content too.

करोना - वर्ष धास्तीचे---------सौ.नम्रता नितिन देव.

 

करोना - वर्ष धास्तीचे

 

जगाच्या एका कोपऱ्यात कोणी मारून खाल्लं वटवाघळाला .

आणि त्यातूनच हा  कोविद विषाणू म्हणे निपजला

बघता बघता साऱ्या जगाला त्याने विळखाच की हो  घातला

साथीने त्याच्या देशोदेशी मृत्यूचा आकडा वाढतच गेला

महासत्ता असो की असो छोटा देश कोणीच नाही सुटला

शहरे,गांवे ,गल्लोगल्ली तो वेगाने पसरू लागला

मृत्युच्या या थैमानाला उपाय एकच टाळेबंदीचा

ठप्प झाला बघता बघता व्यवहार साऱ्या जगाचा

समस्त मानव जमात  सक्तीच्या कैदेत गेली

सारी सृष्टी मग त्याच्या त्रासातुन मुक्त झाली

हवा,पाणी,निसर्ग सारे प्रदुषणमुक्त झाले

मानव सोडुन सारे प्राणी मुक्त वावरू लागले

निसर्गाने मानवाविरुद्ध बंडच  जणू पुकारले

एका विषाणूने त्याला हतबलच करून टाकले

सारे विज्ञान सारे शोध त्याच्यापुढे फोल ठरले

जगभरचे संशोधक नवी लास शोधण्या सरसावले

कधी होईल ?काय होईल?सारे जण धास्तावलेले

परदेशात आम्ही स्वकीयांसाठी घाबरलेले

तेथील कोविदवीरांसाठी आम्ही इथे टाळ्या वाजवल्या

त्यांच्यासाठी आमच्या घरीही दिवे,पणत्या उजळल्या

अनेकांच्या आप्तांचे भारतात मृत्यू झाले

टाळेबंदीमुळे त्यांना अंत्यदर्शनही नाही घडले

प्रत्येकाची कथा वेगळी प्रत्येकाची व्यथा वेगळी

राजा असो वा रंक कोविदसाठी एक पातळी

टाळेबंदी पाठोपाठआता आली जागतिक मंदी

बेकारांसाठी कुठुन मिळणार रोजगारांची संधी

स्वछता पाळा -गर्दी टाळा फक्त इतकेच हाती उरले

धावणाऱ्या जगाला कोविदने थोडं थांब असं म्हटले

थांबुन जरा विचार कर कुठे काय चुकले ? कुठे काय चुकले ?

----

सौ.नम्रता नितिन देव.

माझी कविता-------- सौ . नम्रता नितिन देव

 

माझी कविता

 

माझं लिखाण जेव्हा एखाद्याला भावतं 

तेव्हा मला वाटतं 

माझ्या शब्दांमध्ये असं काही असतं 

की या हृदयाचं त्या हृदयी 

अलगद जाऊन पोहोचतं 

माझी भावना माझे अनुभव 

त्याला त्याच्याच वाटतात 

जणू त्याचेच शब्द माझ्या लेखणीतून झरतात 

त्या अनुभूतीच्या क्षणीच 

माझे शब्द कविता होऊन जातात  

 

 

                   सौ . नम्रता नितिन देव 

 

आपली माणसं------------नम्रता चिटणीस

 

 

आपली माणसं

 

वाढलंय हल्ली बी. पी. आणि शुगर.....

हायपर टेन्शन च्या गोळ्या घेऊन भरून काढतोय कसर!

 

24 बाय 7 कनेक्टेड असून देखील... मनमोकळं कुठे करता येत??

सोशल मीडियेच्या ह्या दुनियेत....प्रदर्शनाचं फसवं नाणं जिथे चालतं!

 

लोकं काय म्हणतील...म्हणून व्यक्त होणं झालंय कमी...

आणि म्हणूनच......घट्ट होत चालल्या मना मधल्या अढी!

 

नुसताच मेसेज काय करतोस....कर एखादा फोन....

बघ किती हलकं वाटेल मग....मारल्यावर गप्पा एक दोन!

 

भौतिक सुखं कमावताना...आपली माणसे सुद्धा जमवा...

नाहीतर काय उपयोग...कितीही संपत्ती कमवा!

 

आपली माणसं जपा....हसण्यासाठी, रडण्यासाठी, भरपूर गप्पा मारण्यासाठी....

हीच खरी औषधं आहेत....सर्व रोगांपासुन् वाचण्यासाठी!

 

नम्रता चिटणीस

घर------------मंजुषा जोशी.

 

घर

-मंजुषा जोशी.

 

वर निळसर आभाळ, मागे एक उंच डोंगर,

हिरव्यागार शेतापलीकडे सुबकसं, बैठं घर.

हे असं घर तर चित्रातच बघितलेलं,

माझ्या आठवणीतलं माझं घर मुंबईच्या चाळीतलं.

चाळीतल्या त्या दोन खणी घरातले लहानपणचे दिवस अजून भिरभिरतात.

रम्य आठवणी काय फक्त टुमदार, ऐसपैस घरांच्याच असतात?

 

खेळणी, पुस्तकं, पडलेला दात

भांडणं, रुसव्या-फुगव्यानंतर हास्याचा खळखळाट.

शेजारपाजारचा खाऊ, आईचा मेतकूट भात

आणि भुतांच्या गोष्टीत थरारलेली रात.

लांबलचक गॅलरीतले खेळ अजूनही मनात रंगतात.

रम्य आठवणी काय फक्त ऐसपैस, टुमदार घरांच्याच असतात?

 

अंगणं नव्हती पण वाळवणं होती.

दारी फुल झाडं नव्हती पण फुलपुडी होती.

पाणी नसलेला नळ होता, पाण्याने भरलेली टाकी होती.

वेळी-अवेळी, अडल्या-नडल्याला शेजाऱ्यांची घरं हक्काची होती.

जोडलेली नाती, नात्यातले बंध, कोण म्हणतं मुंबईत नसतात?

रम्य आठवणी फक्त टुमदार, ऐसपैस घरांच्याच असतात?

 

कुटुंब मोठं चाळीस घरांचं,

अठरापगड जाती आणि पाच-दहा भाषांचं.

छोटं तरीही मोठं हे घर, मुंबईच्या उपनगरात वसलेलं

माझं छोटंसं जग त्या घरातच सामावलेलं

फरशा, भिंती, कपाटं, दारं यांनी का कधी घर बनतात?

रम्य आठवणी काय फक्त टुमदार, ऐसपैस घरांच्याच असतात?

 

थंडगार, हिरव्या लॉन मध्ये पहुडलेली असोत,

की वाळवंटात दिमाखाने उभी राहिलेली असोत,

घरं तर घरंच असतात.

मनाच्या हळव्या कोपऱ्यात कायमचं घर करून रहातात.

कविता-------मंजुषा जोशी

 

कविता

 

-मंजुषा जोशी

 

ती माझ्या बरोबरच असायची,

 

दिसली नाही समोर तरी तिची सोबत जाणवायची.

 

आईच्या गुणगुणण्यातून,

 

छोट्यांच्या बडबड गीतातून,

 

मनाच्या श्लोकातून, गणपतीच्या आरतीतून,

 

बालभारतीच्या पुस्तकातून,

 

कुठून कुठून माझ्याशी गप्पा मारायची.

 

 

 

एकदा तिच्या मागे मागे तिच्या जादू-इ-दुनियेत गेले,

 

तिथल्या खजिन्यात अशी रमले की तिकडची झाले.

 

कुसुमाग्रजांचे शब्द, महानोरांची गाणी,

 

मीर गालिब च्या गजला,

 

आणि गुलजार ची शायरी दिवाणी.

 

आता-

 

येरे येरे पावसा ऐकून सर धावून येते

 

मला पावसाच्या सर सर शिरव्यात भिजवते,

 

श्रावणात चहूकडे हिरवळ दाटते,

 

हिरव्या हिरव्या मखमालीवरती

 

फुल राणी खेळताना दिसते,

 

मजेत डोलणारे फुल 'डॅफोडिल्स’ वाटतं

 

आणि  विश्वाचे अंगण आणखी विशाल देखणं होतं.

 

मग एक दिवस -

 

हे तरल अनुभव मी कागदावर उतरवते

 

माझी सखी, माझी कविता शब्दांमधून माझ्यासमोर साकार होते.

 

माझी कविता शब्दांमधून माझ्यासमोर साकार होते.

शब्द --------------- -डॉ.प्रज्ञा जोशी

 

शब्द                                                    -डॉ.प्रज्ञा जोशी                            

शब्द नाद         शब्द संवाद

शब्द सृष्टी    शब्द दृष्टी

शब्द भक्ती    शब्द शक्ती

शब्दांविण व्यर्थ सारे…….

 

शब्द आदि     शब्द अंत

शब्द थोडे      शब्द अनंत

शब्द आनंद      शब्द खंत

शब्दांविण व्यर्थ सारे …….

 

शब्द लख्ख प्रकाश        शब्द किर्र काळोख

शब्द अणकुचीदार शर       शब्द हळुवार फुंकर

शब्द शांत सागर लहरी     शब्द अवखळ पाऊस सरी

शब्दांविण  व्यर्थ सारे …….

 

शब्द सहज     शब्द अवघड

शब्द शांतता     शब्द बडबड

शब्द तृष्णा     शब्द जीवन

शब्दांविण व्यर्थ सारे …….

शब्द समृद्ध     शब्द अतृप्त

शब्द संयमी      शब्द उन्मत्त

शब्द श्वेत       शब्द कलंक

शब्दांविण  व्यर्थ सारे .……

 

शब्द शस्त्र      शब्द शास्त्र

शब्द उगम      शब्द मीलन

शब्द दिन       शब्द रजनी

शब्द म्हणजे तू अन मी !!

 

 

ह्या कवितेला नाव नाही-----------डॉ.प्रज्ञा जोशी

 

       ह्या कवितेला नाव नाही          

                                                   -डॉ.प्रज्ञा जोशी                                     

अनेक कविता ऐकून वाटे

असेच काव्य यावे स्फुरून

सहज एकदा मनात आले

पाहावंच एखादी कविता करून.

अरसिक तू ,प्रॅक्टिकल तू

ऐकण्याचा आला होता कंटाळा

लिहुयाच एखादी कविता झक्कास

गप्प करूया त्या साऱ्यांना.

विषय कोणता घ्यावा आपण

ह्यावर करता विचार सुरु

अनेक कल्पना मनी धावल्या 

क्षणातच हवेत त्या गेल्या विरुन.

म्हटलं 'प्रेमा 'वर करावी कविता

घेऊन पेन बसले सरसावून

प्रेमातच जर कधी पडले नाही

शब्द तरी कसे यावेत जुळून ?

ठरवले जुलमी डोळ्यांवर कविता करावी

तर तो चष्माच मला समोर दिसला

अन मिठीचा करता विचार

उकाड्याच्या  कल्पनेनेंच घाम फुटला .

 

वाक्य शेवटी एकही ना सुचले

म्हटलं ही कल्पनाच सोडून द्यावी

तेवढ्यात पावसाची रिपरिप पडली कानी

चला तर निसर्गावरच कविता करावी .

विचार करून दुखले डोके

उपमा मला एकही ना सुचली

माझ्या लेखी सूर्य तो सूर्यच राहिला

कळी फुलाची नाहीच खुलली .

अनेक विषय बदलून पहिले

कोराच कागद उरला हाती

नाहीच जमणार कविता मला

मग वेळेचा अपव्यय कशासाठी .

वैतागून शेवटी पेन घेतलं हाती

विचारांचा कल्लोळ कागदावर उतरवला

सहजच कागदावरून नजर फिरवली

पाहते तर काय ती कविता झाली.