Saturday, January 30, 2021

कविता-------मंजुषा जोशी

 

कविता

 

-मंजुषा जोशी

 

ती माझ्या बरोबरच असायची,

 

दिसली नाही समोर तरी तिची सोबत जाणवायची.

 

आईच्या गुणगुणण्यातून,

 

छोट्यांच्या बडबड गीतातून,

 

मनाच्या श्लोकातून, गणपतीच्या आरतीतून,

 

बालभारतीच्या पुस्तकातून,

 

कुठून कुठून माझ्याशी गप्पा मारायची.

 

 

 

एकदा तिच्या मागे मागे तिच्या जादू-इ-दुनियेत गेले,

 

तिथल्या खजिन्यात अशी रमले की तिकडची झाले.

 

कुसुमाग्रजांचे शब्द, महानोरांची गाणी,

 

मीर गालिब च्या गजला,

 

आणि गुलजार ची शायरी दिवाणी.

 

आता-

 

येरे येरे पावसा ऐकून सर धावून येते

 

मला पावसाच्या सर सर शिरव्यात भिजवते,

 

श्रावणात चहूकडे हिरवळ दाटते,

 

हिरव्या हिरव्या मखमालीवरती

 

फुल राणी खेळताना दिसते,

 

मजेत डोलणारे फुल 'डॅफोडिल्स’ वाटतं

 

आणि  विश्वाचे अंगण आणखी विशाल देखणं होतं.

 

मग एक दिवस -

 

हे तरल अनुभव मी कागदावर उतरवते

 

माझी सखी, माझी कविता शब्दांमधून माझ्यासमोर साकार होते.

 

माझी कविता शब्दांमधून माझ्यासमोर साकार होते.

No comments:

Post a Comment