घर
-मंजुषा
जोशी.
वर निळसर आभाळ, मागे
एक उंच डोंगर,
हिरव्यागार शेतापलीकडे सुबकसं,
बैठं
घर.
हे असं घर तर चित्रातच बघितलेलं,
माझ्या आठवणीतलं माझं घर मुंबईच्या चाळीतलं.
चाळीतल्या त्या दोन खणी घरातले लहानपणचे दिवस
अजून भिरभिरतात.
रम्य आठवणी काय फक्त टुमदार,
ऐसपैस
घरांच्याच असतात?
खेळणी, पुस्तकं,
पडलेला
दात
भांडणं, रुसव्या-फुगव्यानंतर
हास्याचा खळखळाट.
शेजारपाजारचा खाऊ, आईचा
मेतकूट भात
आणि भुतांच्या गोष्टीत थरारलेली रात.
लांबलचक गॅलरीतले खेळ अजूनही मनात रंगतात.
रम्य आठवणी काय फक्त ऐसपैस,
टुमदार
घरांच्याच असतात?
अंगणं नव्हती पण वाळवणं होती.
दारी फुल झाडं नव्हती पण फुलपुडी होती.
पाणी नसलेला नळ होता, पाण्याने
भरलेली टाकी होती.
वेळी-अवेळी, अडल्या-नडल्याला
शेजाऱ्यांची घरं हक्काची होती.
जोडलेली नाती, नात्यातले
बंध, कोण म्हणतं मुंबईत नसतात?
रम्य आठवणी फक्त टुमदार, ऐसपैस
घरांच्याच असतात?
कुटुंब मोठं चाळीस घरांचं,
अठरापगड जाती आणि पाच-दहा भाषांचं.
छोटं तरीही मोठं हे घर, मुंबईच्या
उपनगरात वसलेलं
माझं छोटंसं जग त्या घरातच सामावलेलं
फरशा, भिंती,
कपाटं,
दारं
यांनी का कधी घर बनतात?
रम्य आठवणी काय फक्त टुमदार,
ऐसपैस
घरांच्याच असतात?
थंडगार, हिरव्या
लॉन मध्ये पहुडलेली असोत,
की वाळवंटात दिमाखाने उभी राहिलेली असोत,
घरं तर घरंच असतात.
मनाच्या हळव्या कोपऱ्यात कायमचं घर करून रहातात.
No comments:
Post a Comment