ह्या
कवितेला नाव नाही
-डॉ.प्रज्ञा जोशी
अनेक कविता
ऐकून वाटे
असेच काव्य
यावे स्फुरून
सहज एकदा मनात
आले
पाहावंच एखादी
कविता करून.
अरसिक
तू ,प्रॅक्टिकल तू
ऐकण्याचा
आला होता कंटाळा
लिहुयाच
एखादी कविता झक्कास
गप्प
करूया त्या साऱ्यांना.
विषय कोणता
घ्यावा आपण
ह्यावर करता
विचार सुरु
अनेक कल्पना
मनी धावल्या
क्षणातच हवेत
त्या गेल्या विरुन.
म्हटलं
'प्रेमा 'वर
करावी कविता
घेऊन
पेन बसले सरसावून
प्रेमातच
जर कधी पडले नाही
शब्द
तरी कसे यावेत जुळून ?
ठरवले जुलमी
डोळ्यांवर कविता करावी
तर तो चष्माच
मला समोर दिसला
अन मिठीचा
करता विचार
उकाड्याच्या कल्पनेनेंच घाम फुटला .
वाक्य
शेवटी एकही ना सुचले
म्हटलं
ही कल्पनाच सोडून द्यावी
तेवढ्यात
पावसाची रिपरिप पडली कानी
चला
तर निसर्गावरच कविता करावी .
विचार करून
दुखले डोके
उपमा मला एकही
ना सुचली
माझ्या लेखी
सूर्य तो सूर्यच राहिला
कळी फुलाची
नाहीच खुलली .
अनेक
विषय बदलून पहिले
कोराच
कागद उरला हाती
नाहीच
जमणार कविता मला
मग
वेळेचा अपव्यय कशासाठी .
वैतागून शेवटी
पेन घेतलं हाती
विचारांचा
कल्लोळ कागदावर उतरवला
सहजच
कागदावरून नजर फिरवली
पाहते तर काय
ती कविता झाली.
No comments:
Post a Comment