Saturday, August 22, 2020

कविता…..:- बाप्पाशी गप्पा----सौ.रुपाली मावजो किर्तनी

 

बाप्पाशी गप्पा

 

स्वप्नात आले बाप्पा अन

मला बघून लागले हसू

म्हणाले,

'चिंता कसली लागलीये एवढी?

चल उठ, गप्पा मारत बसू'

 

'कसलं आलंय संकट हे

असं हसताय का तुम्ही?

ह्या वर्षी चतुर्थी साजरी

करायची कशी हो आम्ही?

एकमेकांकडे जाऊ शकणार नाही

आरत्यांना लोकं जमणार नाही

आरास केलेली बघणारा नाही

सण असल्यासारखा वाटणारच नाही'

 

म्हणाले,

'हजारो असे आहेत ज्यांना 

घरी जाताही येणार नाही

शेकडो असे आहेत ज्यांना 

सण येतोय जाणीवही नाही

निस्वार्थ पणे झुंजतायत काही

सणाचा विचारही येत नाही

स्वतःला विसरून कामं करणारे

'उफ' सुद्धा करत नाही

ठरवलंय मी ह्या वर्षी,

घरोघरी मीच जाईन

विसर्जन गाजवून नका करू

तुमच्यातच मी विलीन होईन

आलेलं संकट निवारायला

तुमची मदत लागेल मला

प्रत्येकाने ठरवलं तर 

मात देऊ कोरोनाला

वाटतच असेल तर माझ्या नावाने 

एक एक मोदक द्या गरजवंताला

तेव्हाच नेवेद्य पोचू शकेल

तुमच्या प्रिय गणरायाला

नको अशी करुस चिंता

पुढचं वर्ष लांब नाही

मनापासून केलेली सेवा

गजानन कधी विसरत नाही'

 

काय बोलू समजेना मला

शब्द कानात वाजत होते

बाप्पा मात्र शांत बसून 

मला बघून हसत होते

जय देव जय देव जय गणराया

सर्वां आधी तुम्हा पडते मी पाया

इच्छा तुमची पूर्ण कराया

स्फूर्ति आम्हा सर्वांना द्या

सणाचा आनंद लुटायला

पुढच्या वर्षी लवकर या

पुढच्या वर्षी लवकर या

----सौ.रुपाली मावजो किर्तनी

चित्रकला.....:- सौ. नमिता शाहा

 

गणपती आरास......:-श्री. निहाल मांडके

 

कविता…..:- श्रावण..........सौ.अजंली नीलेश उज्जैनकर

 

श्रावण


श्रावण आला श्रावण आला,  हिरवे रान बहरू लागला.
सणासुदीचा महीना आला, चला गं पुजू  शंकराला.

मंगळागौरीच्या पुजेला, हळदीकुंकु देऊ सुवासिनीला.
शृंगार करूनी रात्री ला , फेर धरूया  जागराला.

नागपंचमी च्या  सणाला , चला गं सख्यांनो माहेराला.
कृष्णाचा झुलवू पाळणा, गोकुळ अष्टमी  च्या सणाला.

अतूट प्रेमाच्या नात्याचा , राखी पौर्णिमेचा सण हा आला.
देवाला करू प्रार्थना,  दृष्ट न लागो बहिण भावाच्या प्रेमाला.

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय गाण गाऊनी, सलामी देऊ तिरंग्याला.
मानवंदना देऊ त्या शहीदांना , ज्यांनी दिले ,प्राण या देशाला .

शेतात राबणाऱ्या बैलाचा , सण हा आला पोळ्या चा.
ओवाळू सजलेल्या बैल जोडीला, घास भरवू या  पुरणाचा ,

गणरायाच्या स्वागताला ,ढोल ताशे घ्या सोबतीला.
दहा दिवसांचा सण हा आला, उधाण आले आनंदाला.

--सौ.अजंली नीलेश उज्जैनकर


कविता…..:-स्वागत गजाननाचे -२०२०-----सौ.नम्रता नितीन देव

 

स्वागत गजाननाचे -२०२०

                    

विघ्नहारी हे गणराया विघ्न हराया या 

संकट साऱ्या जगतावरती ते निर्दाया या I 

                      

रोगराईचे संकट साऱ्या जगतावरती आले 

राजा असो वा रंक त्याने ना कोणा सोडले 

उपाय सारे हरले आता तुम्ही सोडवा या I 

 

कसे करावे स्वागत तुमचे बंधन अवतीभवती 

मुखावरही बंधन असता कशी करू आरती 

या साऱ्या बंधनांतुनी मुक्ती द्याया या ।

            

आशा एकच येता तुम्ही संकटे सारी हरतील

उत्साहाने आनंदाने पुन्हा सारे जगतील .

आशावादी तव भक्तांना आशिष देण्या या ।

 

                                        सौ.नम्रता नितीन देव 


कविता…..:-कोरोनातील गणराया..........सौ.नम्रता मनीष चिटणीस

 कोरोनातील गणराया

आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....
नाही टाळ झांजांचा आवाज त्याच्या स्वागताला,
शांतपणे मखरात आरूढ हा झाला.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....

कोरोनामुळे पै पाहुणा नाही घरी हो आला,
नाही लगबग आली हो काना,
एकटीच गृहिणी नैवैद्य करी हो त्याला.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....

एकाही डॉक्टरांना आराम नाही हो जरा,
पोलिसांचा तर रात्रंदिवस खडा पहारा,
देवा त्यांच्यावर कृपा कर तु जरा.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....

तुझ्या शुंडेने कोरोनास आवळ रे जरा,
तुझ्या पाशी येवढेच मागणें हे आता,
सर्वांवर सुखाची पाखर घाल आता.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....

मनोभावे पूजेन तुला गणराया,
नाही सगळेच जमेल रीतीने कराया,
तरी उदंड आशिर्वाद दे रे भक्तांना.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला.

--सौ.नम्रता मनीष चिटणीस


MY MEMORABLE JOURNEY TO BRING GANESHA HOME.....:- Sanvi Prashant Mohite

 

MY MEMORABLE JOURNEY TO BRING GANESHA HOME

I clearly remember last year’s Ganesh Chaturthi when I visited my native place, Kolhapur, where my grandparents stay.  On the day before arrival of Ganesha, I got very excited on hearing from my Aajoba that I can choose a Ganesh idol of my choice.

We visited potter’s house to choose the Ganesh idol. The idol which I liked most was the one who was sitting on a golden throne, wearing a shiny red vastra with an modhak in one hand, a weapon in the second hand, a lotus in the third hand, and the fourth hand for blessings.

          W­e came back home and started decorating the place where Ganapati is going to sit. We decorated the place with leaves, flowers, and peacock feathers as the theme suggested by my Aaji was nature. I went to bed thinking of what I will be wearing the next day to welcome Ganapati.

The next day I jumped out of bed smelling the aroma of modak which Aai was preparing. I got ready in no time to welcome Ganesha. I and my little brother were hopping and popping in eagerness as we walked along with my Baba and Aajoba while going to collect the Ganesh Idol. We became very delighted to see our chosen Ganesh idol between the many others.  Seeing our Ganesh Idol, I & my little brother started shouting “Ganpati bappa moraya…. Mangal murti moraya…”

Sanvi Prashant Mohite

Age: 8 Years





Ganesh Murthi and Decoration



Going with Aajoba to collect Ganapati

 

गणपतीची सजावट - कोरीव शिल्प कला.....:-- सौ.मंजुषा जोशी

 

गणपतीची सजावट - कोरीव शिल्प कला

 

एक दिवस मी कॉलेज मधून घरी आले तर थर्माकोलच्या मोठमोठ्या शीट्स ने बाहेरची खोली भरलेली. मागून आईची कुरकुर, “काहीतरी खूळ घेतो दरवर्षी. आता एवढ्याशा घरात चार महिने हा पसारा कसा सांभाळायचा?” आणि मग विवेक ची तक्रार, “माझ्याकडच्या कलेचे कौतुकच नाही या घरात”.

विवेक मधील कलेच्या अभिव्यक्तीची ती सुरुवात होती. 1993 चा  मे महिना असेल. संध्याकाळी ऑफिसमधून घरी येऊन जेवण झालं की रात्री नऊ साडेनऊ वाजता त्याचा हा एक हाती अविष्कार सुरू होई. विवेक माझा सख्खा मोठा भाऊ. तो उपजतच कलाकार. चित्रकला, हस्तकला, फोटोग्राफी सगळ्यात निष्णात, आणि मला या कशातच थोडीही गती नाही. त्यामुळे माझी लुडबुड पाणी दे कॉफी दे इतपतच. थर्माकोलच्या शीट्स एकावर एक चिकटवून त्या हव्या त्या जाडीचा झाल्या की फक्त अर्ध्या ब्लेडच्या टोकाने तो थर्माकोल मधून नक्षी किंवा मूर्ती अक्षरशः कोरुन काढत असे. ही त्याची कल्पना आणि तंत्र अगदी नवीन आणि त्याचे स्वतःचे असल्याने अर्थातच एक हाती कारभार. सगळी मेहनत त्याची एकट्याची. गणपतीच्या दोन दिवस आधी इकडे तिकडे घरभर पडलेले सगळे भाग सलग एकत्र करून जेव्हा त्याने ते मखर उभे केले तेव्हा आम्ही खरं तर आश्चर्य करायचे सुद्धा विसरलो होतो. एक भव्य संगमरवरी शिल्प थर्माकोल च्या रूपात आमच्या घरात साकार झालं होतं. वेगवेगळ्या कोनातुन लावलेल्या दोन-तीन साध्या बल्ब्सनी मखर अजूनच उजळून निघाले. गणेश चतुर्थीला गणपती मखरात बसल्यावर अर्थातच त्याला खरी शोभा आली. या सजावटीचा खूप बोलबाला झाला. आमचा गणपती दहा दिवसांचा. त्या दहा दिवसात कुठून कुठून आणि किती लोक दर्शनाला आणि सजावट बघायला येऊन गेले. तेव्हा घरातल्या गणपती सजावटीसाठी लोकसत्ता स्पर्धा वगैरे नव्हत्या. असत्या तर पहिलं बक्षीस चुकणं शक्यच नव्हतं. माझ्याकडे तर सगळे फोटोही नाहीत. तीन आहेत ते नमुन्यादाखल दिले आहेत.

 मग प्रत्येक वर्षी विवेक गणपती साठी नवनवीन सुंदर शिल्प साकारत राहिला. प्रत्येक मखर आधी पेक्षा सरस. त्याचं आणि त्याच्या या कलेचं खूप कौतुक झालं. मला वाटतं की ही कोरीव देखणी सजावट बाप्पाला फारच आवडली असावी.. कारण नंतर चारच वर्षांनी त्याने विवेकला स्वतःकडेच बोलावलं. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी विवेकचा एका जीवघेण्या अपघातात अंत झाला. माझी खात्री आहे, प्रत्येक गणेशोत्सवात दहा दिवस तिकडे स्वर्गात गणपती बाप्पा विवेकने केलेल्या मखरातच विराजमान होत असेल.

- मंजुषा जोशी.





कोरोनातील गणेशोत्सव.....:- श्री. प्रशांत कुलकर्णी

कोरोनातील गणेशोत्सव

 

दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी नेहमीप्रमाणे 8-15 दिवस आधी येणारे बापट काकांचे त्यांच्या घरी गणपती दर्शनाला येण्याचे आमंत्रण अजून आले नाही म्हणून अरुण चिंतीत होता. यावर्षी काकांनी लिस्ट मधून आपले नाव रद्द केले की काय? असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. सहज गेल्या वर्षभरातील काकांच्या भेटीगाठी त्याने आठवून बघितल्या. त्यात असे काही न बोलावण्यासारखे प्रसंग,वाद,गैरसमज झाल्याचे त्याला काही स्मरत नव्हते. मग नेहाचे बापटकाकूंशी काही बिनसले की काय अशी शंकाही त्याच्या मनात डोकावून गेली. पण तसेही काही नेहाच्या बोलण्यावरून दिसले नाही. संक्रांतीच्या हळदीकुंकवाला दोघींनी  एकमेकींना बोलावले होते. म्हणजे तिथेही गैरसमज होण्याचा चान्स नव्हता. मग अजून आमंत्रण कसे नाही आले? या विचारात असताना व्हाट्स अप वर बापटकाकांचे आमंत्रण एकदाचे आले आणि अरुणचा जीव भांड्यात पडला. पण यावेळेस चे आमंत्रण हे दरवर्षी पेक्षा वेगळे होते हे ते वाचताना त्याच्या लक्षात आले. अरुण ने मोठ्याने बापटकाकांचे आमंत्रण वाचायला सुरुवात केली.

 

नमस्कार, आमच्या इथे श्री कृपेकरुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीची स्थापना होणार आहे. आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो. सध्या कोरोनाचे दिवस असल्याने स्थापनेच्या दिवशी संध्याकाळी फक्त निवडक भक्तांना आमंत्रित करण्यात येणार आहे. आमच्या सर्व  जवळच्या (म्हणजे आम्ही ज्यांना जवळचे मानतो त्यांच्या, ते आम्हाला जवळचे मानतात की नाही माहीत नाही😊) मित्र परिवाराच्या नावाची एक लिस्ट परवा बनवण्यात आली. त्यांच्या नावाच्या चिठ्या टाकून आमच्या धाकट्या चिरंजीवांच्या हस्ते त्यातील निवडक 25 जणांना आमंत्रण देण्याचे ठरले. त्या सुदैवी आमंत्रीतात आपला 24 वा नंबर आला म्हणून सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. तर या संदेशा द्वारे आम्ही आपल्याला गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी आमंत्रित करत आहोत. गणेश दर्शनाला येताना पाळायच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत. कृपया त्या नीट वाचून घ्याल आणि त्याचे स्ट्रिक्टली पालन कराल अशी आशा आहे. या सूचना न पाळणाऱ्यास गणेश दर्शन घेऊ न देण्याचा वा घरात न घेण्याचा हक्क कमिटी स्वतःकडे राखून ठेवत आहे. (बापटकाका गेल्या वर्षी मंडळाच्या कमिटीवर होते, त्यामुळे ही भाषा त्यांच्या तोंडी सतत येत असे.) या कमिटीवर मी, माझी पत्नी आणि आमची दोन मुलं आहोत.

सूचना आणि नियमावली👇

 

1.       आमच्याकडे गणेश दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्ताने घरून निघताना त्यादिवशी धुतलेले स्वच्छ कपडे घालून येणे आवश्यक आहे.

2.       स्वतःच्या घरून निघाल्यावर डायरेक्ट आमच्या घरी या. आणखीन दोन ठिकाणी गणपतीला जाऊन मग आमच्याकडे येऊ नये. (आमच्याकडून आणखीन दोन ठिकाणी काय चार ठिकाणी गेलात तरी आमचे काहीही ऑब्जेकशन असणार नाही).

3.       सध्याच्या सोशल डिस्टनसिंग च्या नियमात कोणताही बदल नसल्याने येताना मास्क आणि ग्लोव्हज घालून यालच अशी आशा आहे. या नियमात कुठलाही बदल अपेक्षित नाही.

4.       आमच्या एरियात तुमच्या गाडीला पार्किंग मिळण्यात अडचण येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो याची पूर्वकल्पना असल्याने आणि दर्शनाला लागणारा वेळ हे सर्व गृहीत धरून मवाकिफ चे तिकीट काढा. नाहीतर दरवर्षीप्रमाणे माझे तासाचे मवाकिफ संपते आहे लवकर प्रसाद द्या असली कारणे विचारात घेतली जाणार नाहीत.

5.       लिफ्ट मधून येताना फक्त दोन भक्तांना एकावेळी प्रवेश दिला जाईल. आम्ही सर्व एकत्र आहोत असा वेगळा सूर तिथे कोणी काढून भांडू नये.

6.       लिफ्ट मध्ये शिरण्यापूर्वी आमच्या बिल्डिंगच्या वॉचमन कडून तुम्हाला एक टूथ पीक दिली जाईल ती तुम्ही लिफ्टचे बटण दाबण्यासाठी वापरायची आहे आणि परत जाईपर्यंत शर्टाच्या खिशात जपून ठेवायची आहे. कुठल्याही परिस्थितीत ती हरवल्यास दुसरी टूथपीक दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

7.       आमच्या मजल्यावर आल्यावर कृपया आपली पादत्राणे आमच्या समोरच्या फ्लॅटच्या दरवाजासमोर ठेवावी.सध्या तिथे कोणी राहात नसल्याने पूर्ण कॉरिडॉर आपल्या बापाचा आहे असे समजण्यास हरकत नाही.

8.       आमच्या घरात शिरल्यावर प्रथम डायरेक्ट डावीकडे असलेल्या आमच्या बाथरूम मध्ये शिरावे आणि साबणाने आपले हात पाय स्वच्छ धुवून, ते टिशू ला पुसून, टिशू कचरापेटीत टाकून मगच बाहेर यावे.

9.       बाथरूम मधून बाहेर आल्यावर आमचे जेष्ठ चिरंजीव रौनक एका पळीतून सॅनिटाईझर आपल्या हातावर देतील, ते तीर्थ समजून प्राशन न करता फक्त हात चोळण्यासाठी वापर करावा.

10.  त्यानंतर आमचे धाकटे चिरंजीव शौनक तुम्हाला कॉरिडॉर मधून बेडरूममध्ये घेऊन जातील. तिथे तुमचे टेम्परेचर आणि ऑक्सिमीटर च्या साहाय्याने ऑक्सिजन टेस्ट चेक करून मग दर्शनाच्या रांगेत उभे राहण्याची अनुमती देण्यात येईल.

11.  दर्शनासाठी रांगेत असताना तुमच्या पुढे उभा असलेला भक्त तुमच्या कितीही ओळखीचा असला तरी त्याच्याजवळ जाऊन गप्पा छाटत बसू नये. दोघां मध्ये कमीतकमी एक मीटर चे अंतर राहील याची काळजी घ्यावी.

12.  रांग पुढे सरकत असताना वाटेत डावीकडे किचन लागेल तिथे आमच्या सौ. आणि तुमच्या आवडत्या बापट काकू एका ट्रे मध्ये आयुष काढा चे कागदी कप घेऊन उभ्या असतील. तो प्राशन केल्यावरच तुम्हाला पुढे गणेशजी चे दर्शन घेण्याची अनुमती देण्यात येईल.

13.  हॉल मध्ये गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना झाली असेल त्या ठिकाणा पासून तुम्ही एक मीटर दूर राहून दर्शन घ्यावे. क्रुपया गणेशमूर्तीला हात लावण्याचा प्रयत्न करू नये. मखमली कापडाचा एक मास्क बाप्पाना पण चढवलेला असणार आहे.

14.  त्यानंतर तुम्हाला दिलेला तीर्थप्रसाद हा घरी जाऊन खायचा आहे हे लक्ष्यात घ्यावे.

15.  बाप्पासाठी तुम्ही आणलेला प्रसाद हा पेढे बर्फी, मोदक या स्वरूपात असला तर त्याचा नेवैद्य दाखवून तुम्हाला त्वरित परत केला जाईल. जर फळं असली तर ती तिथेच ठेवून घेण्यात येतील आणि त्यांना व्हिनेगर, सोडा मध्ये स्वच्छ धुवून मग दोन दिवसांनी इतर भक्तांच्या घरी पोहोचवली जातील.

16.  संध्याकाळच्या आरती साठी थांबणे हे बंधनकारक नसून, त्यासाठी गर्दी न केल्यास उपकारकच ठरेल.

17.  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अथर्वशीर्ष पठण केले जाईल पण ते प्रत्येकाने स्वतःच्या घरी ऑनलाइन स्वरूपात करायचे आहे. त्याची लिंक पाठवली जाईल. पठणा नंतरचा प्रसाद आणि सुग्रास भोजनही तुम्हाला ऑनलाइन दाखवले जाइल.

 

वरील सूचनांचे आपल्याकडून पालन केले जाईल आणि नेहमीच्या उदंड उत्साहाने तुम्ही दर्शनाला याल याची आम्हाला खात्री आहे. परत एकदा गणरायाच्या दर्शनाचे हे आमंत्रण तुम्ही आनंदाने स्वीकारावे आणि अगत्याने येण्याचे करावे ही नम्र विनंती.

 

आपला कृपाभिलाशी

बापट परिवार

 

अरुण हे आमंत्रण बघून डोक्याला हात लावून बसलाय. बापटांनी घातलेल्या सतरा(शे) अटी कशा काय लक्षात ठेवायच्या या विवंचनेत तो सध्या पडलाय. आमंत्रण स्वीकारावे की न स्वीकारावे या बाबतीत त्याची द्विधा मनःस्थिती झाली आहे. त्याला कोणाच्या तरी सल्ल्याची गरज आहे. तुमच्यापैकी कोणाला जर अशा प्रकारचे आमंत्रण आले असेल आणि तुम्ही त्या 25 भाग्यवंता मध्ये असाल तर कृपया अरुणशी संपर्क साधा. त्याला तुमच्या मदतीची गरज आहे.

 

धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻