Saturday, August 22, 2020

कविता…..:- बाप्पाशी गप्पा----सौ.रुपाली मावजो किर्तनी

 

बाप्पाशी गप्पा

 

स्वप्नात आले बाप्पा अन

मला बघून लागले हसू

म्हणाले,

'चिंता कसली लागलीये एवढी?

चल उठ, गप्पा मारत बसू'

 

'कसलं आलंय संकट हे

असं हसताय का तुम्ही?

ह्या वर्षी चतुर्थी साजरी

करायची कशी हो आम्ही?

एकमेकांकडे जाऊ शकणार नाही

आरत्यांना लोकं जमणार नाही

आरास केलेली बघणारा नाही

सण असल्यासारखा वाटणारच नाही'

 

म्हणाले,

'हजारो असे आहेत ज्यांना 

घरी जाताही येणार नाही

शेकडो असे आहेत ज्यांना 

सण येतोय जाणीवही नाही

निस्वार्थ पणे झुंजतायत काही

सणाचा विचारही येत नाही

स्वतःला विसरून कामं करणारे

'उफ' सुद्धा करत नाही

ठरवलंय मी ह्या वर्षी,

घरोघरी मीच जाईन

विसर्जन गाजवून नका करू

तुमच्यातच मी विलीन होईन

आलेलं संकट निवारायला

तुमची मदत लागेल मला

प्रत्येकाने ठरवलं तर 

मात देऊ कोरोनाला

वाटतच असेल तर माझ्या नावाने 

एक एक मोदक द्या गरजवंताला

तेव्हाच नेवेद्य पोचू शकेल

तुमच्या प्रिय गणरायाला

नको अशी करुस चिंता

पुढचं वर्ष लांब नाही

मनापासून केलेली सेवा

गजानन कधी विसरत नाही'

 

काय बोलू समजेना मला

शब्द कानात वाजत होते

बाप्पा मात्र शांत बसून 

मला बघून हसत होते

जय देव जय देव जय गणराया

सर्वां आधी तुम्हा पडते मी पाया

इच्छा तुमची पूर्ण कराया

स्फूर्ति आम्हा सर्वांना द्या

सणाचा आनंद लुटायला

पुढच्या वर्षी लवकर या

पुढच्या वर्षी लवकर या

----सौ.रुपाली मावजो किर्तनी

No comments:

Post a Comment