गणपतीची सजावट - कोरीव शिल्प कला
एक
दिवस मी कॉलेज मधून घरी आले तर थर्माकोलच्या मोठमोठ्या शीट्स ने बाहेरची खोली
भरलेली. मागून आईची कुरकुर, “काहीतरी
खूळ घेतो दरवर्षी. आता एवढ्याशा घरात चार महिने हा पसारा कसा सांभाळायचा?”
आणि मग विवेक ची तक्रार, “माझ्याकडच्या कलेचे कौतुकच नाही या घरात”.
विवेक
मधील कलेच्या अभिव्यक्तीची ती सुरुवात होती. 1993 चा मे महिना असेल. संध्याकाळी ऑफिसमधून
घरी येऊन जेवण झालं की रात्री नऊ साडेनऊ वाजता त्याचा हा एक हाती अविष्कार सुरू
होई. विवेक माझा सख्खा मोठा भाऊ. तो उपजतच कलाकार. चित्रकला, हस्तकला, फोटोग्राफी सगळ्यात
निष्णात, आणि मला या कशातच थोडीही गती नाही. त्यामुळे माझी
लुडबुड पाणी दे कॉफी दे इतपतच. थर्माकोलच्या शीट्स एकावर एक चिकटवून त्या हव्या त्या
जाडीचा झाल्या की फक्त अर्ध्या ब्लेडच्या टोकाने तो थर्माकोल मधून नक्षी किंवा
मूर्ती अक्षरशः कोरुन काढत असे. ही त्याची कल्पना आणि तंत्र अगदी नवीन आणि त्याचे स्वतःचे
असल्याने अर्थातच एक हाती कारभार. सगळी मेहनत त्याची एकट्याची. गणपतीच्या दोन दिवस
आधी इकडे तिकडे घरभर पडलेले सगळे भाग सलग एकत्र करून जेव्हा त्याने ते मखर उभे
केले तेव्हा आम्ही खरं तर आश्चर्य करायचे सुद्धा विसरलो होतो. एक भव्य संगमरवरी
शिल्प थर्माकोल च्या रूपात आमच्या घरात साकार झालं होतं. वेगवेगळ्या कोनातुन
लावलेल्या दोन-तीन साध्या बल्ब्सनी मखर अजूनच उजळून निघाले. गणेश चतुर्थीला
गणपती मखरात बसल्यावर अर्थातच त्याला खरी शोभा आली. या सजावटीचा खूप
बोलबाला झाला. आमचा गणपती दहा दिवसांचा. त्या दहा दिवसात
कुठून कुठून आणि किती लोक दर्शनाला आणि सजावट बघायला येऊन गेले. तेव्हा घरातल्या
गणपती सजावटीसाठी लोकसत्ता स्पर्धा वगैरे नव्हत्या. असत्या तर पहिलं
बक्षीस चुकणं शक्यच नव्हतं. माझ्याकडे तर सगळे फोटोही नाहीत. तीन आहेत ते
नमुन्यादाखल दिले आहेत.
मग प्रत्येक वर्षी विवेक गणपती साठी नवनवीन
सुंदर शिल्प साकारत राहिला. प्रत्येक मखर आधी पेक्षा सरस. त्याचं आणि त्याच्या
या कलेचं खूप कौतुक झालं. मला वाटतं की ही कोरीव देखणी सजावट बाप्पाला फारच आवडली
असावी.. कारण नंतर चारच वर्षांनी त्याने विवेकला स्वतःकडेच बोलावलं. वयाच्या अवघ्या 27
व्या वर्षी विवेकचा एका जीवघेण्या अपघातात अंत झाला. माझी खात्री आहे, प्रत्येक
गणेशोत्सवात दहा दिवस तिकडे स्वर्गात गणपती बाप्पा विवेकने केलेल्या मखरातच
विराजमान होत असेल.
- मंजुषा जोशी.
No comments:
Post a Comment