कोरोनातील गणेशोत्सव
दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी नेहमीप्रमाणे
8-15 दिवस आधी येणारे बापट काकांचे त्यांच्या घरी गणपती दर्शनाला येण्याचे आमंत्रण
अजून आले नाही म्हणून अरुण चिंतीत होता. यावर्षी काकांनी लिस्ट मधून आपले नाव रद्द
केले की काय? असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. सहज गेल्या वर्षभरातील काकांच्या
भेटीगाठी त्याने आठवून बघितल्या. त्यात असे काही न बोलावण्यासारखे प्रसंग,वाद,गैरसमज
झाल्याचे त्याला काही स्मरत नव्हते. मग नेहाचे बापटकाकूंशी काही बिनसले की काय अशी शंकाही त्याच्या
मनात डोकावून गेली. पण तसेही काही नेहाच्या बोलण्यावरून दिसले नाही. संक्रांतीच्या
हळदीकुंकवाला दोघींनी
एकमेकींना बोलावले होते. म्हणजे तिथेही गैरसमज होण्याचा चान्स नव्हता.
मग अजून आमंत्रण कसे नाही आले? या विचारात असताना व्हाट्स अप वर बापटकाकांचे आमंत्रण एकदाचे आले आणि अरुणचा जीव भांड्यात
पडला. पण यावेळेस चे आमंत्रण हे दरवर्षी पेक्षा वेगळे होते हे ते वाचताना त्याच्या
लक्षात आले. अरुण ने मोठ्याने
बापटकाकांचे आमंत्रण
वाचायला सुरुवात केली.
नमस्कार, आमच्या इथे श्री
कृपेकरुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीची स्थापना होणार आहे. आमच्याकडे दीड दिवसाचा
गणपती असतो. सध्या कोरोनाचे दिवस असल्याने स्थापनेच्या दिवशी संध्याकाळी फक्त निवडक
भक्तांना आमंत्रित करण्यात येणार आहे. आमच्या सर्व जवळच्या (म्हणजे आम्ही ज्यांना जवळचे मानतो त्यांच्या,
ते आम्हाला जवळचे मानतात की नाही माहीत नाही😊) मित्र
परिवाराच्या नावाची एक लिस्ट परवा बनवण्यात आली. त्यांच्या नावाच्या चिठ्या टाकून आमच्या
धाकट्या चिरंजीवांच्या हस्ते त्यातील निवडक 25 जणांना आमंत्रण देण्याचे ठरले. त्या
सुदैवी आमंत्रीतात आपला 24 वा नंबर आला म्हणून सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. तर या संदेशा
द्वारे आम्ही आपल्याला गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी आमंत्रित करत आहोत.
गणेश दर्शनाला येताना पाळायच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत. कृपया
त्या नीट वाचून घ्याल आणि त्याचे स्ट्रिक्टली पालन कराल अशी आशा आहे. या सूचना न पाळणाऱ्यास
गणेश दर्शन घेऊ न देण्याचा वा घरात न घेण्याचा हक्क कमिटी स्वतःकडे राखून ठेवत आहे.
(बापटकाका गेल्या वर्षी मंडळाच्या कमिटीवर होते, त्यामुळे ही भाषा त्यांच्या तोंडी
सतत येत असे.) या कमिटीवर मी, माझी
पत्नी
आणि आमची दोन मुलं आहोत.
सूचना आणि नियमावली👇
1. आमच्याकडे गणेश दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक
गणेश भक्ताने घरून निघताना त्यादिवशी धुतलेले स्वच्छ कपडे घालून येणे आवश्यक आहे.
2. स्वतःच्या घरून निघाल्यावर डायरेक्ट आमच्या
घरी या. आणखीन दोन ठिकाणी गणपतीला जाऊन मग आमच्याकडे येऊ नये. (आमच्याकडून आणखीन दोन
ठिकाणी काय चार ठिकाणी गेलात तरी आमचे काहीही ऑब्जेकशन असणार नाही).
3. सध्याच्या सोशल डिस्टनसिंग च्या नियमात
कोणताही बदल नसल्याने येताना मास्क आणि ग्लोव्हज घालून यालच अशी आशा आहे. या नियमात
कुठलाही बदल अपेक्षित नाही.
4. आमच्या एरियात तुमच्या गाडीला पार्किंग
मिळण्यात अडचण येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो याची पूर्वकल्पना असल्याने आणि दर्शनाला
लागणारा वेळ हे सर्व गृहीत धरून मवाकिफ चे तिकीट काढा. नाहीतर दरवर्षीप्रमाणे माझे
तासाचे मवाकिफ संपते आहे लवकर प्रसाद द्या असली कारणे विचारात घेतली जाणार नाहीत.
5. लिफ्ट मधून येताना फक्त दोन भक्तांना एकावेळी
प्रवेश दिला जाईल. आम्ही सर्व एकत्र आहोत असा वेगळा सूर तिथे कोणी काढून भांडू नये.
6. लिफ्ट मध्ये शिरण्यापूर्वी आमच्या बिल्डिंगच्या
वॉचमन कडून तुम्हाला एक टूथ पीक दिली जाईल ती तुम्ही लिफ्टचे बटण दाबण्यासाठी वापरायची
आहे आणि परत जाईपर्यंत शर्टाच्या खिशात जपून ठेवायची आहे. कुठल्याही परिस्थितीत ती
हरवल्यास दुसरी टूथपीक दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
7. आमच्या मजल्यावर आल्यावर कृपया आपली पादत्राणे
आमच्या समोरच्या फ्लॅटच्या दरवाजासमोर ठेवावी.सध्या तिथे कोणी राहात नसल्याने पूर्ण
कॉरिडॉर आपल्या बापाचा आहे असे समजण्यास हरकत नाही.
8. आमच्या घरात शिरल्यावर प्रथम डायरेक्ट डावीकडे
असलेल्या आमच्या बाथरूम मध्ये शिरावे आणि साबणाने आपले हात पाय स्वच्छ धुवून, ते टिशू
ला पुसून, टिशू कचरापेटीत टाकून मगच बाहेर यावे.
9. बाथरूम मधून बाहेर आल्यावर आमचे जेष्ठ चिरंजीव
रौनक एका पळीतून सॅनिटाईझर आपल्या हातावर देतील, ते तीर्थ समजून प्राशन न करता फक्त
हात चोळण्यासाठी वापर करावा.
10. त्यानंतर आमचे धाकटे चिरंजीव शौनक तुम्हाला
कॉरिडॉर मधून बेडरूममध्ये घेऊन जातील. तिथे तुमचे टेम्परेचर आणि ऑक्सिमीटर च्या साहाय्याने
ऑक्सिजन टेस्ट चेक करून मग दर्शनाच्या रांगेत उभे राहण्याची अनुमती देण्यात येईल.
11. दर्शनासाठी रांगेत असताना तुमच्या पुढे
उभा असलेला भक्त तुमच्या कितीही ओळखीचा असला तरी त्याच्याजवळ जाऊन गप्पा छाटत बसू नये.
दोघां मध्ये कमीतकमी एक मीटर चे अंतर राहील याची काळजी घ्यावी.
12. रांग पुढे सरकत असताना वाटेत डावीकडे किचन
लागेल तिथे आमच्या सौ. आणि तुमच्या आवडत्या बापट काकू एका ट्रे मध्ये आयुष काढा चे
कागदी कप घेऊन उभ्या असतील. तो प्राशन केल्यावरच तुम्हाला पुढे गणेशजी चे दर्शन घेण्याची
अनुमती देण्यात येईल.
13. हॉल मध्ये गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना
झाली असेल त्या ठिकाणा पासून तुम्ही एक मीटर दूर राहून दर्शन घ्यावे. क्रुपया गणेशमूर्तीला
हात लावण्याचा प्रयत्न करू नये. मखमली कापडाचा एक मास्क बाप्पाना पण चढवलेला असणार
आहे.
14. त्यानंतर तुम्हाला दिलेला तीर्थप्रसाद हा
घरी जाऊन खायचा आहे हे लक्ष्यात घ्यावे.
15. बाप्पासाठी तुम्ही आणलेला प्रसाद हा पेढे
बर्फी, मोदक या स्वरूपात असला तर त्याचा नेवैद्य दाखवून तुम्हाला त्वरित परत केला जाईल.
जर फळं असली तर ती तिथेच ठेवून घेण्यात येतील आणि त्यांना व्हिनेगर, सोडा मध्ये स्वच्छ
धुवून मग दोन दिवसांनी इतर भक्तांच्या घरी पोहोचवली जातील.
16. संध्याकाळच्या आरती साठी थांबणे हे बंधनकारक
नसून, त्यासाठी गर्दी न केल्यास उपकारकच ठरेल.
17. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अथर्वशीर्ष
पठण केले जाईल पण ते प्रत्येकाने स्वतःच्या घरी ऑनलाइन स्वरूपात करायचे आहे. त्याची
लिंक पाठवली जाईल. पठणा नंतरचा प्रसाद आणि सुग्रास भोजनही तुम्हाला ऑनलाइन दाखवले जाइल.
वरील सूचनांचे आपल्याकडून पालन केले जाईल आणि नेहमीच्या उदंड उत्साहाने
तुम्ही दर्शनाला याल याची आम्हाला खात्री आहे. परत एकदा गणरायाच्या दर्शनाचे हे आमंत्रण
तुम्ही आनंदाने स्वीकारावे आणि अगत्याने येण्याचे करावे ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाशी
बापट परिवार
अरुण हे आमंत्रण बघून डोक्याला हात लावून बसलाय. बापटांनी घातलेल्या
सतरा(शे) अटी कशा काय लक्षात ठेवायच्या या विवंचनेत तो सध्या पडलाय. आमंत्रण स्वीकारावे
की न स्वीकारावे या बाबतीत त्याची द्विधा मनःस्थिती झाली आहे. त्याला कोणाच्या तरी
सल्ल्याची गरज आहे. तुमच्यापैकी कोणाला जर अशा प्रकारचे आमंत्रण आले असेल आणि तुम्ही
त्या 25 भाग्यवंता मध्ये असाल तर कृपया अरुणशी संपर्क साधा. त्याला तुमच्या मदतीची
गरज आहे.
धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment