Saturday, August 22, 2020

आमच्या घरचा गणपती उत्सव.....:- डॉ. प्रसाद बारटके

 

आमच्या घरचा गणपती उत्सव



मंडळी ह्यावर्षी कोरोना च्या प्रादुर्भावामुळे, सुट्टी व इच्छा असूनही घरच्या गणपतीला जाता येत नसल्याची हुरहुर मनात असतानाच ‘बहर’च्या निमित्ताने घरच्या गणपतीच्या गोड आठवणींना या लेखातून उजाळा देता आला.

 

माझं मूळ गाव कोकणात, मुंबईपासून चार तासांच्या अंतरावर, रोहा, जिल्हा रायगड. माझं बालपण व शिक्षण मुंबईतच गेलं. मात्र आपल्या आवडत्या गणपतीबाप्पाला रोह्याला भेटायला जायची उत्सुकता दरवर्षी असे. मग त्याची पूर्वतयारी गणपती यायच्या दोन दिवस आधीपासून चालू होई. नवीन कपडे घेणे, मुंबईतल्या दादर टीटीच्या D.दामोदर मधून त्यांच्याकडचे सर्वोत्तम असे काजूचे पेढे घेणे, सिटीलाईट मार्केटमधून उत्कृष्ट प्रतीची फळांची टोपली करून घेणे वा  नवीन काहीतरी सजावटीचे सामान घेणे, अशी सगळी लगबग असे आणि हे सर्व झाल्यावर आमचा चालू व्हायचा रोह्याला जायचा प्रवास. कधी कधी चार तासांच्या प्रवासाला सात ते आठ तास सुद्धा लागलेले आहेत आणि गणेशभक्त कोकणाकडे रवाना ही वृत्तपत्रातील नुसतीच बातमी न राहता प्रत्यक्षात अनुभवता आली आहे.

 

घरच्या गणपतीची खरी तयारी सुरु होते दोन दिवस अगोदरपासूनच, ते म्हणजे, आमच्याकडचे जवळ-जवळ शंभर वर्षापूर्वीचे “मखर” लावण्यापासून. आमच्याकडील हे मखर म्हणजे चित्रकलेचा अद्भुत नमुनाच होय. काचेच्या फ्रेम्सवरती सुप्रसिद्ध प्राचीनकालीन चित्रकार “राजा रवि वर्मा” यांची पेंटिंग्स अत्यंत जिवंत रंगात व आकर्षक स्वरूपात  चितारलेली आहेत. हे मखर लाकडी सांध्यापासून बनवलेले असून ह्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातील एक जरी लाकडी सांधा आपल्या जागी अचूक बसला नसेल तर संपूर्ण मखरच लागत नाही. जणू काही पूर्वजांचं म्हणणं असावं की सर्व कामे शिस्तीत व आपल्या दिलेल्या पद्धतीनेच करावीत, कारण गणपती बाप्पा हा शिस्तीचा भोक्ता आहे, नाही का?

 

मंडळी आमचं घर हे शंभर वर्षापूर्वी म्हणजेच 1920 साली बांधण्यात आलेलं असून ते इंग्रजकालीन वाड्याच्या स्वरुपात आहे. घराच्या मुख्य दरवाजानंतर आहे प्रशस्त अशी 24 खिडक्यांची खोली ज्याला दुकान म्हणण्यात येतं व जिथून आमचे पूर्वज सावकारी व गावाची खोती चालवीत असत. मखर लावण्याबरोबरच रात्रभर चालू असते गणपती बाप्पा जिथे विराजमान होणार आहेत  त्या ठिकाणाची सजावट. त्या ठिकाणाला म्हणतात “गणपतीचा खण”. गणपतीच्या खणाचा वापर केवळ गणपती उत्सवासाठी संपूर्ण वर्षभरातून एकदाच केला जातो आणि त्या खणात एकाचवेळी 50 माणसे आरामात बसू शकतील इतका तो भव्य आहे आणि मग त्यानंतर आहे 25 खोल्यांची राहायची, स्वयंपाकाची आणि देवघराची जागा इत्यादी.

 

अशारितीने चालू झालेल्या उत्साही वातावरणात वेळ येते गणपती बाप्पाच्या आगमनाची.

आमच्या घरच्या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीचा साचा व मूर्ती ही संपूर्ण पंचक्रोशीत एकमेव  असून तिचे प्रारूप हे गेली शंभर वर्ष सारखेच आहे. दुसरे म्हणजे आमच्या गणपती बाप्पांचे आगमन हे अत्यंत सुबक व कोरीव काम केलेल्या साग लाकडापासून बनवलेल्या लाकडी पालखीतून होते.

अशा अनेक वैशिष्ट्यांनी भरलेल्या बाप्पांचे आगमन ढोल ताशाच्या गजरात अत्यंत दिमाखात करण्यात येतं. गणपती घरी आल्यानंतर साग्रसंगीत पूजा होत असतानाच संपूर्ण सात दिवसांच्या नैवेद्याचे पदार्थ ठरलेले असतात. हो म्हणजे पहिला नैवेद्य असतो उकडीच्या मोदकांचा आणि शेवटचा बासुंदी पुरी.

 

पूजा, आरती, नैवेद्य आणि त्यानंतर एकत्र जेवणाच्या पंगती मध्ये दिवस कसा मावळतो हेच समजत नाही. मग रात्रीच्या जेवणानंतर वेळ येते मस्तपैकी धमाल मस्तीची म्हणजे रात्रीच्या जागरणाची.

 

जागरण म्हणजेच अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन भजन म्हणणे, गाणी म्हणणे, विविध बैठे खेळ खेळणे, पत्ते खेळणे. बऱ्याच वेळेला बदाम सात किंवा झब्बू खेळत असताना चार ते पाच पत्त्यांचे कॅट सुद्धा अपुरे पडतात. त्यानंतर रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास रात्रीचा स्नॅक्स खाणे. ‘मध्यरात्री स्नॅक्स’ हा एक मोठा बेत असतो, कधी सामोसे, कधी वडापाव तर कधी इडली सांबर, आणि तेही थोडेथोडके नव्हे ..एका वेळेस 3०० नग देखील कमी पडतात. एकदा तर कच्छी दाबेलीसाठी आमच्या बाहेरच्या ‘दुकानात’ गाडीच लावली होती. आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणात पहाट झाली हे तांबडं फुटल्यावरच कळते.

असे मंतरलेले सात दिवस, गौरी आगमन, सत्यनारायणाची पूजा, सकाळ-संध्याकाळ आरती आणि रात्रीचे जागरण ह्यात कसे भुर्रकन उडून जातात हेच समजत नाही आणि मग वेळ येते गणपती विसर्जनाची.

गणपती बाप्पांचे विसर्जन फुलांनी सजवलेल्या पालखीतून, आळीतील पाच घरांना सोबत घेऊन आरतीच्या जयघोषात मिरवणूक काढत कुंडलिका नदीच्या किनारी करण्यात येतं.

 

जाता जाता अजून एक पालखी संदर्भात वैशिष्ट्य सांगावसं वाटतं ते म्हणजे विसर्जन झाल्यानंतर पालखी परत घरी घेऊन जात असताना  खरंतर पालखीत असतो फक्त गणपतीचा बाप्पाचा पाट आणि त्यावर  नदीकिनारची वाळू. तरीसुद्धा पालखीचा भार, मूर्तीशिवाय काकणभर सुद्धा कमी वाटत नाही. जणू काही गणपती बाप्पा हे आपल्यातच असतात आणि विसर्जन झालेलं असतं ते फक्त आणि फक्त मूर्तीचं.

अशा वैशिष्ट्यपूर्ण घरात, पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतीसह, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये गणपती उत्सव साजरा करण्याची मजा काही औरच आणि ती आम्हाला दरवर्षी न चुकता अनुभवता येते हे आम्ही आमचे भाग्य समजतो. 

 

                                                                                                                        डॉ. प्रसाद बारटके 

 


No comments:

Post a Comment