तारुण्यात
पदार्पण. ते आकर्षण, ती ओढ, ती शिरशिरी. कळीचे फुलात होणारे रूपांतर. तो काळ स्वप्नवत
असतो. त्यावेळच्या भावना नंतर शब्दात पकडता येत नाहीत. पण कविमन तरल असते. या भावना
कवयत्री शब्दबद्ध करू शकते. प्रेम ही अवीट आणि कालातीत भावना आहे म्हणून मी इंदिरा
संतांची ही कविता निवडली आहे. ती मला जशी भावली तशी तुमच्या समोर मांडतो.
देतां घेतां -
इंदिरा संत
पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.
मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.
असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.
पुस्तकातही
खूण म्हणून वापरायला पीस जेंव्हा दिले तेंव्हा त्या पिसाहूनही कोमल असे काहीसे (हृदय,
मन) थरारले. मेजावर वजन म्हणून दिलेल्या नाजूक शिंपल्यावरची नक्षी मनात घर करून गेली.
एकदा ताजा मरवा दिला तर त्याचा गंध मनाला हिरवे (ताजे, तरुण) करून गेला. पीस अतिशय
हलके असते. हलवले की ते थरारते. पण या पिसाहूनही सुकुमार आहे ते आपले मन किंवा हृदय.
हे नाजूक हृदय साध्या संपर्कानेही थरारून जाते. भावना उचंबळतात. जशी शिंपल्यावर नक्षी
असते तशी नक्षी शिंपला देताना मनावर उमटून जाते, घर करते. आणि जेंव्हा ताजा मरवा दिला
जातो तेंव्हा त्याचा हिरवा गंध (चिरतारुण्य) आपल्यात सामावून जातो.
या कवितेत कवयत्री आपल्याला खूप काही सांगून जाते. पहिल्या कडव्यात तारुण्यात पदार्पण करतानाचे उत्सुक प्रेम आहे. दुसऱ्या कडव्यात तारुण्याच्या बहरातील उत्कट प्रेम आहे आणि तिसऱ्या कडव्यात उतारवयातील शांत प्रेम आहे पण यात देखील हिरवेपणा (मनातील तारुण्य) टिकून आहे.
कवयित्रीने उपमा देखील विचारांती निवडल्या आहेत. नाजूक आणि नाशवंत पीस पौगंडा साठी. नाजूक पण टिकाऊ शिंपला तारुण्यासाठी. इतरांना
सुगंध देत देत आपले जीवन संपवणारा मरवा उतारवायला. कवयित्रींच्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. या १२ ओळीत जीवन सामावले आहे.
या कवितेत कवयत्री तरल भावना शब्दबद्ध करते. ही प्रेमाची तरल भावना चिरंतन आहे. त्याला वयाचे, जन्माचे, स्थानाचे कसलेही बंधन नाही. ती नितळ आहे. ही कविता या प्रेम भावनेचा उत्सव साजरा करते.
No comments:
Post a Comment