खेळताना
रंग
-मंजुषा
जोशी
टळटळीत दुपारची वेळ. आम्हा मैत्रिणींचा चमू
रमत-गमत कॉलेजमधून घरी यायला निघालेला. रेल्वे
स्टेशन पासून घरा पर्यंतचे लांब लचक अंतर आमच्या गप्पांमध्ये चुटकीसरशी संपायचं.
अखंड बडबडीत ना ऊन जाणवायचं, ना अंतर.
कुठल्यातरी अत्यंत बिन-महत्त्वाच्या विषयावर आमच्या अति-गहन चर्चा कम गप्पा चालू
असतात. आसपासचं भान अर्थातच नसतं. एवढ्यात उजव्या बाजूने, वरून,
आमच्या दिशेने वायुवेगाने एक टम्म फुगलेला फुगा झेपावतो आणि उजव्या
गुडघ्याच्या वर असा खळ्ळकन् फुटतो. होळी-धुळवड-रंगपंचमी
जवळ आल्याचे कालनिर्णयच्या आधी तो फुगा सांगतो. थोडं हसू, थोडा
राग, ओल्या स्कर्ट मुळे झालेली थोडी फजिती अशा संमिश्र भावना चेहऱ्यावर
घेऊन आता काही दिवस फिरावे लागणार असतं. या नंतरचे दिवस लगबगीचे. मुख्य काम-
घोळक्या बरोबर फिरणे. घोळक्याचं काम म्हणजे वर्गणी गोळा करणे,
न देणाऱ्यांची नावं टिपणे, आपापल्या
घरातले लाकडी सामान, रद्दी
यांची राखण करणे, माळ्यावरच्या पिचकाऱ्या
शोधणे, फुगे, रंग, लाकडं
हे साहित्य गोळा करणे.
होळीची वाट बघायची ती पुरणपोळीसाठी,
पण डोळे लागलेले असायचे रंगपंचमीवर, म्हणजे
पंचांगाप्रमाणे धुळवडीवर. कारण मुंबईत धुळवड म्हणजेच रंगपंचमी. रात्री होळी पेटली
की बायका पूजेला यायच्या. होळीत
बार्बेक्यू झालेल्या नारळाचं खोबरं खायला मज्जा यायची. पुरणपोळीच्या पोटभर
जेवणानंतरचा तो मुखवास अगदी खास वाटायचा. रात्री झोपेपर्यंत दुरून दुरून कुणीतरी
कुणाच्या तरी नावाने मारलेल्या बोंबा कानावर यायच्या. होळीत जळलेल्या सरपणाचा एक
धुरकट खमंग वास सगळीकडे दरवळत असायचा.
दुसऱ्या दिवशी सकाळी रंगपंचमी साठी तयार होणे
एकदम सोप्प काम. सगळ्यात जुने, गडद
रंगाचे, विटलेले कपडे घालायचे. रंग, बादल्या,
फुगे, पिचकाऱ्या अशा सामानानिशी सज्ज होऊन बाल वर्ग आणि तरुण वर्ग बाहेर
पडायचा. काल ज्या काकांच्या नावाने बोंबाबोंब केली
त्याच काकांना आग्रहाने बोलावून बोलावून रंगवलं जायचं. “काय गोंधळ घालायचा
तो घराबाहेर घाला” अशी सक्त ताकीद ज्या आईने दिलेली, तिलाच
मेहरा आंटींनी घरात घुसून लालेलाल केलेलं असायचं. भांग
युक्त आणि भांगे शिवाय अशा दोन्ही प्रकारच्या थंडाई आंटींकडे तयार असायच्या.
त्यांच्या गुजियांची आणि आमच्या पुरणपोळीची देवाण-घेवाण व्हायची. चेहरे ओळखू न
येण्याइतपत रंगल्यावर आणि मुंबईच्या उकाड्यातही हुडहुडी भरण्या इतपत चिंब
भिजल्यावर दुपारी उशिरा आंघोळबिंघोळ करून माणसात यायचं. त्यातही आंघोळ करताना
चेहऱ्यावरचा, काना मागचा कपाळाजवळचा रंग मुद्दाम तसाच ठेवायचा. किती रंग खेळलो
याचा पुरावा चार-पाच दिवस तरी मिरवायला हवा ना.
सहा-सात
तासांची ही रंगारंग धमाल हळूहळू संपते आणि संध्याकाळपर्यंत वातावरण शांत नेहमी
व्हायला लागतं. दुकाने उघडतात. रंगलेले रस्ते कोरडे होऊन वर्दळीला तयार होतात.
आम्ही सगळे दिवसभराच्या रंगीत गप्पात बुडालेलो असतो. निवांत विसावलेल्या बाबांनी
रेडिओ लावलेला असतो. शोभा गुर्टूंचे “आज बिरज मे होली रे रसिया” चे कमाल सूर ऐन
गप्पांमधे ही मनाचा ठाव घेतात.
होळी जवळ आली की हे सगळं आठवतं. साध्या
साध्या पद्धती, ढीगभर आनंद देऊन जाणाऱ्या सरळ साध्या गोष्टी. काळाच्या ओघात
बरीच वाळू निसटून गेली असली तरी हाताला चिकटलेले कणही कमी नाहीयेत. धूळ
मातीत माखायला हात कचरत असले तरी रंग-अगदी सैंद्रिय रंगही आहेत,
घरची किंवा विकतची पुरणपोळी जगात कुठेही मिळण्याची सोय आहे आणि
मुख्य म्हणजे युट्युब वर एका क्लिकसरशी ऐकायला मिळणारी शोभा गुर्टू यांची होरी
आहे. – “आज बिरज मे होली रे रसिया”.
No comments:
Post a Comment