शिमगोत्सव
गणपती नंतर कोकणात नवचैतन्य
आणणारा सण म्हणजे होळी. होळी म्हटलं की अंगात एक वेगळंच वारं संचारतं. कोकणी माणूस
कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप
गावाकडे वळतात. पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते, बोंबा कानात घुमायला लागतात.
चांद्यापासून बांद्यापर्यंत
पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातली
होळी ही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजते. संपूर्ण महाराष्ट्रात होळी म्हणत असले तरी
कोकणात तो शिमगा असतो. तो एक किंवा दोन दिवसांचा कधीच नसतो. गावागावानुसार तो ५ पासून
१५ दिवसांपर्यंत असतो.
वर्षभर शहराच्या गर्दीत
पिचलेल्या, ट्रेनचे धक्के खात संसार गाडा रागडणाऱ्या चाकरमान्याला गावी जाण्याच्या
विचाराने नवी उभारी आलेली असते. चार पैसे कनवटीला बांधून बायका-पोरांसकट तो गावी जायला
निघतो. शिमग्याच्या दिवसात देवसुद्धा गावकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकायला राहते देऊळ सोडून
मांडावर आलेले असतात.
प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला
गावापासून दूर जंगलात असलेल्या ग्रामदेवतेच्या देवळात पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या
उत्सवमूर्ती) ठेवून ढोल ताशांच्या गजरात देवाला होळीच्या मांडावर आणले जाते. संध्याकाळी
माडा-पोफळीची, आंब्याची होळी तोडली जाते. वाजत गाजत मांडावर आणली जाते. आणता आणता मध्येच
रेटारेटीचा खेळ सुरु होतो. बुंध्याकडचे लोक मागे शेंड्याकडे ढकलतात तर शेंड्याकडचे
बुंध्याकडे. रस्सीखेचच्या अगदी उलट. बराच वेळ या खेळात होळी पुढे सरकत नाही. आहे तिथेच
राहते. कोणीही माघार घेण्यास तयार नसतात. अशात मग जाणती मंडळी मध्यस्ती करतात आणि पुढे
चाल होते. होळी उभी केली जाते. त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते, आणि मग
होम जाळला जातो. मूठ आवळून तोंडावर नेत "व्हळयो व्हळयो बो बो ....... !!!"
च्या बोंबा आणि ज्वाळा गगनाला भिडतात.
दुसऱ्या दिवशी गावभर फिरून
धुळवड मागितली जाते.
ऐनाका बायना, घेतल्या बिगर
जायना,
पेटीको चावी लगता है
हमको पैसा मिलता है
चोर चोर कामाठी,
उंदरानं पळवली लंगोटी,
उंदराची आय कवट खाय,
पेटीत पैसे ठेवले हाय...
पालखी घरोघरी जायला सज्ज
असते. पालखी उचलायची कुणी, कोणत्या मानकऱ्यांच्या घरी आधी जाणार त्यानंतर मग पुढचा
क्रम हे परंपरेनुसार ठरलेले असते. खेळे तयार झालेले असतात. दुपारचे जेवण कुठे हे सुद्धा
आधीच कळवलेलं असतं.
पालखी निघाली की लहान थोर
सर्वजण मागून तिच्या मागे चालू लागतात. एक एक घर घ्यायला सुरुवात होते. यजमान घरी आलेल्या
देवाचे मानकऱ्यांचे स्वागत करतात. देवाची पूजा होते. देवीची खणा नारळाने ओटी भरली जाते.
गूळ खोबरं, कडक बुंदीच्या लाडूंचा प्रसाद वाटला जातो. बलुतेदारांना वर्षभराच्या कामाच्या
मोबदल्यात बलुतं दिले जाते. हल्ली ते पैशाच्या रूपात दिले जाते. खेळ्यांचा खेळ रंगतो.
स्त्रीच्या वेशातील पुरुष, राधा, गोप-गवळणी मृदूंगाच्या तालावर फेर धरतात.
गोमू चल जाऊ गो चौपाटी बंदराला,
तिथे उभा आहे ग यशोदेचा
कान्हा,
कान्हा मारू नको रे रंगाच्या
पिचकाऱ्या,
आमच्या भिजतील रेशमी लाल
साड्या.
गावोगावचा शिमगा साजरा करण्याच्या
पद्धती, रूढी-परंपरा, प्रथा वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. दोन ग्रामदेवतांच्या
पालख्यांची गळाभेट डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. संगमेश्वरातील वांद्रे आणि उक्षी
गावाच्या पालख्यांची भेट दोन्ही गावांच्या मधून जाणाऱ्या बावनदीत होते. जणू दोन बहिणी
वर्षभरानंतर भेटत आहेत. देवळे या गावात तर चक्क सहा पालख्यांची एकत्र भेट होते.
आणि तो पालखीने
शोधून काढायचा. खुल्या मैदानात पालखीच्या नाचाला उधाण येते... खांदेकरी अशा काही किमयेने
पालखी नाचवतात की एक क्षण आपल्याला वाटते की ती निसटणार तर नाही, पण हवेत हलकाच झोक
घेत ती पुन्हा खांद्यावर स्थिरावते तेव्हा काळजात कुठेतरी धस्स झालेलं असतं. अचानक
मोराच्या पिसासारखी भासणारी पालखी जड जड होत जाते आणि खांदेकरांच्या तालावर नाचण्याऐवजी
तीच त्यांना घुमवायला सुरुवात करते. खेचत खेचत खांदेकऱ्यांनाच पालखी नारळ पुरलेल्या
ठिकाणी घेऊन जाते आणि तिचा खूर आपटला जातो... पुरलेला नारळ सापडतो!
एक ना अनेक सांगाव्या
तेवढ्या कमी आणि अचंभित करणाऱ्या प्रथा.
शेवटचा दिवस
म्हणजे शिंपणे. देवाजवळ जुने नवस फेडले जातात. नवीन बोलले जातात. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत,
गावापासून परदेशात राहणाऱ्या सर्वांचे आरोग्य टिकावं, रोगराई दूर व्हावी, हाताला यश
दे, पोटाला अन्न दे. वंशाला दिवा दे. पहिला पोरगा होऊ दे.
वंशावळ वाढू
दे..म्हणून गाऱ्हाणी घातली जातात.
रे म्हाराजा!
बारा ऱ्हाटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा!!
व्हय म्हाराजा!!
म्हणून जड अंतःकरणाने देव भंडारले जातात.
कोकणी माणसाने
निसर्ग टिकावा म्हणून त्याला देव मानला. भीतीच्या रूपाने का होईना तो निसर्गाचा आदर
करू लागला. आदिष्टी, ईठलाई, नवलाई, पावणाई, सातेरी, माऊली, रामेश्वर, वेताळ, रवळनाथ,
वेतोबा या देवांचा धाक अजूनही कमी झालेला नाही. आणि त्या निमित्ताने संस्कृतीचेही रक्षण होऊ लागले. शेती उत्तम सुरु होती तोपर्यंत सर्व काही सुरळीत
होतं. कुणबी आणि बलुतेदारी हातात हात घालून नांदत होती, तोपर्यंत गावकुसाला महत्त्व
होतं. पण औद्योगिकरण वाढले, व्यवहार पैशात होऊ लागले. शेतीला उतरती कळा आली. माणसाला
शहराचा आधार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पोटासाठी दाहीदिशांना पसरलेल्या कोकणी माणसाला
आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडीक झालेल्या जमिनीची ओढ लागते ती याच शिमगा
गणपती जत्रांच्या निमित्ताने. आणि हे सणच आज त्याच्या उरल्या सुरल्या आशांचे आधारवड
बनून राहिले आहेत.
व्हय म्हाराजा!!
अजय पडवळ
No comments:
Post a Comment